सौ. वेणूताई चव्हाण यांचे जीवनचरित्र महिलांसाठी आदर्श: डॉ. बाबुराव गुरव

89

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि. 2फेब्रुवारी):-” देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत यशवंतराव चव्हाण जे यशस्वी झाले त्यामध्ये वेणूताई चव्हाण यांचे योगदान महत्वाचे आहे. वेणूताई चव्हाण म्हणजे ममत्व, वात्सल्य, त्याग, आपलेपणा आणि सोज्वळता अशा सद्गुणांचा खळाळता झरा होत्या. त्यांच्या ठिकाणी देशप्रेम आणि स्वातंत्र्य चळवळ याविषयी आदर होता. आयुष्यात आलेल्या खडतर परीस्थितीला तोंड देत वेणूताईंनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा संसार समर्थपणे सांभाळला.

वेणूताईंचे वागणे-बोलणे कर्मयोग्यासारखे होते. त्यांना कसलाही मोह नव्हता. आचार, विचार व संस्कार यातूनच सौ. वेणूताईंनी बालवयातच सुशीलता व शालीनता या गोष्टींना महत्त्व दिले. समस्त महिलांनी आदर्श घ्यावे असे वेणूताई यांचे जीवन होते.” असे प्रतिपादन मा. प्रा. डॉ. बाबुराव गुरव (जेष्ठ साहित्यिक व विचारवंत) यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे  सौ. वेणूताई चव्हाण यांच्या ९८व्या जयंती निमित्ताने आयोजित व्याख्यान प्रसंगी “‘वेणूताई चव्हाण: एक मुक्त चिंतन” या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री नंदकुमार बटाणे (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराड उच्च शिक्षण मंडळ) हे होते.  ते म्हणाले की, “एकविसाव्या शतकातील कुटुंबव्यवस्थेची अवस्था पाहता वेणूताई ह्या खरोखरच वात्सल्यमुर्ती होत्या. संपूर्ण कुटुंबावर मायेची पाखर घालणाऱ्या व येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांच्या सेवेत त्या दंग होत्या. दातृत्व व धार्मिक वृत्तीबरोबरच ज्ञानसंपन्न तसेच विचारसंपन्नही होत्या. आपल्या पतीच्या पदाला साजेसे असे आपले आचरण पाहिजे. यासाठी त्या शांत, संयमी, सौजन्यशीलपणे पतीव्रतेचे जीवन जगत होत्या. आजच्या महिलांनी वेणूताईंचे गुण घ्यावेत.”

       प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री अल्ताफहुसेन मुल्ला( जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) तसेच मा. श्री अरुण पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) उपस्थित होते.

          सदर कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे स्वागत व  प्रास्ताविक महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. (डॉ) श्रीमती एस. आर. सरोदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. आर. ए. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. पी. जाधव यांनी केले.

या समारंभास संस्थेचे विश्वस्त व सदस्य  मा. श्री भास्करराव कुलकर्णी तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार हे आवर्जून उपस्थित होते.या व्याख्यान समारंभास दोन्ही महाविद्यालयाचे पर्यवेक्षक, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.