वेध निवडणुकांचे!

133

२०२४ हे वर्ष निवडणूक वर्ष म्हणून इतिहासात गणले जाईल कारण या वर्षी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि काही गावांच्या ग्रामपंचायती अशा सर्वच निवडणुका होणार आहे म्हणजेच यावर्षी मतदार गल्ली ते दिल्लीपर्यंत आपला प्रतिनिधी निवडणार आहे. सर्वप्रथम एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणुका होतील त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तर अधिसूचनाही निघाली असून साधारणपणे पुढच्या म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे केवळ राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांनाच नव्हे तर देशातील ऐंशी कोटीहून अधिक मतदारांना देखील लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यावेळी होणारी लोकसभा निवडणूक ही देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे कारण आगामी २० वर्षाच्या राजकारणाची बीजे या निवडणुकीत पेरली जाणार आहे एकूणच देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही निवडणूक ठरेल मानले जात आहे त्यामुळेच या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही कंबर कसली आहे.

लोकसभा निवडणुकीचे नगारे आतापासूनच वाजू लागले असून सत्ताधारी भाजपने अब की बार ४०० पार…. अशी घोषणा दिली आहे तर काहीही करून भाजपला आणि त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळू द्यायचे नाही असा चंग काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने बांधला आहे. अर्थात एनडीएच्या तुलनेत इंडिया आघाडी कुमकुवत असून इंडिया अघाडीला आतापासूनच गळती लागली आहे. आजवर इंडिया आघाडीत असणारे आणि इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून स्वतः ला प्रोजेक्ट करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचानक पलटी मारून एनडीएत सामील झाले.

त्यांच्या या पलटीमुळे इंडिया आघाडीला चांगलाच धक्का बसला असला तरी इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष अजूनही एनडीएला टक्कर देण्याच्या मानसिकतेत आहे. काही झाले तरी हार मानायची नाही असे इंडिया आघाडीतील पक्षांनी ठरवले आहे दक्षिणेकडील राज्ये आणि महाराष्ट्र, गोवा, हरियाणा, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल तसेच ईशान्ये कडील राज्य आपल्याला लोकसभा निवडणुकीत साथ देतील अशी आशा विरोधकांना आहे तर मागील दहा वर्षांच्या कामगिरीवर आणि मोदी गॅरंटी वर आपण ४०० चा आकडा सहज पार करू असा विश्वास एनडीएला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही इलेक्शन मोडमध्ये पोहचले असून लोकसभा निवडणुकीचे वेध दोघांनाही लागले आहेत. इंडिया आघाडीने एनडीएला आव्हान दिले असले तरी सद्यस्थितीत एनडीए आघाडीवर आहे.

दोन महिन्यापूर्वी झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत तेलंगणा सोडल्यास उर्वरित तीन राज्यात भाजपला मोठा विजय मिळाला. शिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगड, या राज्यात लोकसभेच्या सदस्यांची संख्या जास्त आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये ७५ खासदार आहेत तिथे भाजपची स्थिती अत्यंत भक्कम आहे. त्यात निवडणूकी आधीच मोदींनी राम मंदिराचे उदघाटन उरकून घेतले त्याचाही लाभ भाजपला होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपलाच बहुमत मिळेल असा सर्व्हेही अनेक संस्थांनी केला आहे. मात्र इंडिया आघाडीच्या बाजूने असणाऱ्या मतदारांची संख्याही कमी नाही त्यामुळे विरोधकही तितक्याच ताकदीने मैदानात उतरतील हे नक्की. या लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार कोणाचा पराभव होणार हे समजायला अद्याप दोन ते तीन महिने बाकी असले तरी या निवडणुकीचे वेध मात्र आत्तापासूनच लागले आहेत.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)