ज्येष्ठ नागरिकासाठी गंगाखेड, पालम, पूर्णा येथे तपासणी शिबिराचे आयोजन

140

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8फेब्रुवारी):-गंगाखेडचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आ. गुट्टे यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकास कामे सुरू असून मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान गंगाखेड च्या माध्यमातून आ.डॉ. रत्नाकर गुट्टे विविध सामाजिक कार्य करीत असतात. आत्ताच काही दिवसांपूर्वी मतदार संघातील दिव्यांगाना आवश्यक साहित्य साधनांचे वितरण करण्यात आले होते.

आ.गुट्टे यांनी मतदारसंघातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्य साधने निःशुल्क उपलब्ध व्हावेत याकरिता गंगाखेड तालुक्यातील नागरिकांकरिता दि.१० फेब्रुवारी शनिवार रोजी संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथे, पूर्णा तालुक्यातील नागरिकांकरिता दि. ११ फेब्रुवारी रविवार रोजी राजाराम बापू सभागृह पूर्णा येथे तर पालम तालुक्यातील नागरिकांकरिता दि.१२ फेब्रुवारी सोमवार रोजी महात्मा गांधी विद्यालय नवा मोंढा पालम येथे सकाळी १० ते सायंकाळी ०५ या वेळेत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

या अनुषंगाने मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून या शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार नंबरचा चष्मा, चालण्यासाठी काठी, कोपर काठी, तीन पायांची काठी, चार पायांची काठी, वॉकर, ॲल्युमिनियम कुबड्या, श्रवण यंत्र, घडीचे वॉकर, चाकांची खुर्ची, कमोड व्हीलचेअर, कमोड खुर्ची, कृत्रिम दात, संपूर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, सिलिकॉन कुशन इत्यादी साहित्य आवश्यकतेनुसार ज्येष्ठ नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला कारागृहातून भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यामुळे या मायबाप जनतेचे माझ्यावर अनेक उपकार आहेत. या उपकारांची परतफेड करणे शक्य नाही. परंतु त्यांचा एक सेवक म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. गंगाखेड, पालम व पूर्ण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केलेल्या तपासणी शिबिरात आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी गंगाखेड ता. करीता ८७६६६४४१२३, पालम ता. करीता ८४२११५१७७७ आणि पूर्णा ता. करीता ९९७०७२६०८० या मोबाईल नंबरवरती आपण संपर्क साधावा असे आवाहन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले आह.