जागतिक दर्जाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

112

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातीलच नाही तर जगातील एक नावाजलेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. म्हणजे आज या विद्यापीठाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. डॉ एम आर जयकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. स्थापनेनंतर राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षणाच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी पुणे विद्यापीठावर होती. १९६४ मध्ये कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पुणे, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचे कार्य सुरू झाले. १९९० साली जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांसह दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील महाविद्यालये या विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत.

२०१४ साली या विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य संकुल आहे. विद्यापीठाची मुख्य इमारत पुणेकरांसाठी शैक्षणिक अस्मितेचे प्रतीक आहे. ही इमारत ब्रिटिश गव्हर्नरांच्या पुण्यातील मुक्कामासाठी एकोणिसाव्या शतकात बांधण्यात आली होती.इटालियन शैलीत बांधण्यात आलेली ही इमारत म्हणजे पुण्याला मिळालेला ऐतिहासिक वारसा आहे.

विद्यापीठाचा परिसर सुमारे ४९० एकराचा असून त्यात अनेक सुंदर, दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे त्यामुळेच येथील वातावरण अतिशय मनमोहक झाले आहे. घनदाट जंगल, शोभिवंत हिरवळ, दुर्मिळ ब्रिटिशकालीन कारंजे व ऐतिहासिक अशी ब्रिटिशकालीन भव्य इमारत यामुळे हा परिसर निसर्गप्रेमी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शन यांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. पुणे विद्यापीठात दुर्मिळ तसेच सावली देणारे वृक्ष आहेत. या वृक्षांची छाया, सौंदर्य आणि उत्साह निर्माण करणारे वातावरण विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधन करण्यास प्रोत्साहित करते. विद्यापीठातून विविध पदव्युत्तर विभाग व प्रशासकीय कार्यालयाचे कामकाज चालते. या विभागातून आज जवळपास ६ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ४२ शैक्षणिक विभाग, १२ आंतरविद्या शाखा व सेवा युनिट, २० अध्यासने, ८ राष्ट्रीय व प्रादेशिक केंद्र आहेत. ६९६ संलग्न महाविद्यालये, २८७ मान्यताप्राप्त व्यवस्थापन संस्था, १२१ मान्यताप्राप्त, संशोधनकेंद्र, विद्यापीठाशी संलग्न आहेत.

विद्यापीठातील विविध विभागात ६० हून अधिक देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठातील अभ्यासक्रमाचेही फायदे व्हावेत यासाठी गेल्या काही काळात विद्यापीठाने परदेशातील नामांकित विद्यापीठासोबत सामंजस्य करार केले आहेत. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ जयकर यांच्या नावाने नावाने ओळखले जाणारे डॉ जयकर ग्रंथालय केवळ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाच नाही तर विद्यापीठाबाहेरील संशोधक आणि अभ्यासकांनाही. खेचून आणते. डॉ जयकर ग्रंथालय हे माहिती आणि संदर्भ ग्रंथासाठी भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालयांपैकी एक आहे. जयकर ग्रंथालयात भारतीय व परदेशी मासिके घेतली जातात तसेच ग्रंथालयात काही मासिके व नियतकालिके मोफत मिळतात. जयकर ग्रंथालयात ५ लाखांहून अधिक पुस्तके, ग्रंथ तसेच विविध विषयांवरील मासिके उपलब्ध आहेत. अशा सुविधांमुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यातीलच नव्हे तर देशातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीचे विद्यापीठ आहे. पुणे विद्यापीठ ज्ञानाची निर्मिती, संरक्षण आणि प्रसारण करणारे जागतिक दर्जाचे विद्यापीठ आहे.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५