फुले एज्युकेशन तर्फे पेटकुले आणि वाढई यांचा तेलंगाणा मध्ये 25 फेब्रुवारी रोजी होणार 47 वा सत्यशोधक विवाह सोहळा !!!

264

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18फेब्रुवारी):- फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी दु.12.30 वा. तेलंगाणा, आदिलाबाद येथील पद्मनायका फंक्शन हॉल ,मावाला मध्ये अखिल भारतीय माळी महासंघ, तेलंगाणा राज्याचे अध्यक्ष प्रा.सुकुमार पेटकुले यांची मुलगी सत्यशोधिका सुहर्षा राणी, बी.टेक. आणि समाजसेवक पुंडलीक वाढई, राजुरा ,चंद्रपुर यांचा मुलगा सत्यशोधक ललीत, बी .टेक या उच्चशिक्षिताचा 47 वा .सत्यशोधक सोहळा मोफत संपन्न होणार आहे.

या वधू वरांची रजिस्टर नोंदणी करून संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक व हुमन राईटस असो. ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवदास महाजन शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट देण्यात येणार आहे.तर आई वडील ,मामा मामी यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले जाणार आहे. यावेळी अक्षता म्हणून तादूळ ऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरण्यात येणार आहे तर महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन आणि सर्व विधी गडचिरोलीचे सत्यशोधक सुनील कावळे आणि रघुनाथ ढोक हे नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांचे वेशभुषेत करणार आहेत. या विवाहासाठी सिक्कीम चे माजी राज्यपाल ,खासदार श्रीनिवासजी पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी संरक्षण मंत्री ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आवर्जून शुभ संदेश आणि या सत्यशोधक विवाह सोहळ्यास शुभेच्या दिलेल्या आहेत.

आयोजक सुकुमार पेटकुले या प्रसंगी सत्यशोधक विवाह विधीचे मराठी आणि तेलगु भाषेतील पुस्तक फुले एज्युकेशन संस्थेचे वतीने मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करून विवाहास येणाऱ्या सर्व मंडळीना मोफत वाटप करणार आहेत सोबत सर्व मान्यवरांना फुले दांपत्य फोटोफ्रेम देखील भेट देणार आहेत.. या पुस्तकाने विवाह कोणीही लावू शकतील आणि याला कोणा मध्यस्थीची गरज नसून मुहुर्थ ,अंधश्रद्धा कर्मकांड याला मूठमाती दिली पाहिजे हे देखील याने प्रबोधन होणार आहे असे प्रा.पेटकुले म्हणाले.

तर सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सांगितले की या पुर्वी प्रा.सुकुमार पेटकुले यांनी 7 मे 2022 रोजी प्रथम उच्चशिक्षित मुलाचे सत्यशोधक विवाह चंद्रपुर, मुल येथे लावला तर आता उच्चशिक्षित मुलीचे लावत आहेत. एका कुटंबात दुसरा विवाह लावून ते स्वतः तेलांगणा राज्यात सर्वत्र महात्मा फुले यांच्या जीवनावर तेलगु भाषेत एकपात्री प्रयोग सादर करीत असतात ते एक कृतीशील सत्यशोधक समाजसेवक असून त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली असून महात्मा फुले समग्र वाड्मय हा ग्रंथ देखील तेलगु भाषेत लवकरच प्रकाशित करणार आहेत. नुकतेच त्यांनी नागपूर येथे 5 जानेवारी रोजी सत्यशोधक चित्रपटाचा शुभारंभाचा शो 40 कार्यकर्त्यांना घेऊन पाहिला तर त्यांचे प्रयत्नाने सध्या 2 फेब्रुवारी पासून तेलांगणा राज्यात ,आसिफाबाद येथे के.बी.सिनेमा गृहात रोज 4 शो प्रबोधन करीत चालू आहे. पुढे ढोक यांनी सांगितले की हा संस्थेच्या वतीने तेलांगणा राज्यात चौथा मोफत सत्यशोधक विवाह पेटकुले यांचे सहकार्याने होत आहे.