मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

68

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.19फेब्रुवारी):-तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सत्यफुलाबाई चव्हाण व शारदाबाई गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.याप्रसंगी योगेश मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

१६व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव ‘जाणते राजे’ होते की त्यांच्या राज्यातील प्रजा सुखी होती, आनंदी होती. शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून, रयतेच्या उत्पन्नाचे स्रोत आहे. “शेती पिकली तर रयत सुखी, रयत सुखी तर राजा सुखी’ हे सूत्र महाराजांना समजले होते. त्यामुळे महाराजांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन रयतेला मजबुती देणारा होता.

म्हणूनच शिवाजी महाराज ‘शेतकरी हितकर्ते राजे’ होते.छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये शौर्य, धैर्य, सकारात्मकता, मुत्सद्देगिरी, युद्धनीती, दूरदृष्टी, व्यावहारिकता आणि चातुर्य असे अनेक गुण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व धर्माचे, पंथांचे, जातीचे मावळे होते.

जातीधर्माच्या मर्यादा ओलांडून स्वराज्यात सर्वांना शिवाजी महाराजांनी सामावून घेतले. त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे अशा शब्दात मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. याप्रसंगी पोलीस पाटील हेमंत गजभिये, आशिक रामटेके,विलास मेश्राम, नीलकंठ बांबोडे,प्रेमजीत चव्हाण, सूरज गजभिये,धम्मादीप गजभिये,शकुंतलाबाई मेश्राम, शोभाबाई चव्हाण,तृप्तीताई ठवरे,मिलनताई मेश्राम आदी मान्यवर व गावातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम यांनी केले.व आभार प्रदर्शन प्रदीप मेश्राम यांनी मानले.