थोर समाज क्रांतिकारक संत शिरोमणी गुरू रविदास महाराज

132

मानवता धर्माचे पुरस्कर्ते,संत कबीरांचे समकालीन,समविचारी, मीराबाईचे गुरू,सामाजिक क्रांतीचे प्रणेते,मानवता धर्माचे पुरस्कर्ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या माघ पौर्णिमेला असलेल्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन . चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर भारतातील मध्ययुगीन संत पुरुषांमध्ये संत गुरु रविदास महाराज एक महान संत झाले . त्यांचा जन्म इ.स.१३९८ या वर्षी म्हणजे ६२६ वर्षांपूर्वी माघ पौर्णिमेला रविवारी काशी जवळील गोवर्धनपूर येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव रघुराम, आईचे नाव रघुराणी तर पत्नीचे नाव लोनाबाई होते.आजोबांचे नाव हरिनंदन आणि आजीचे नाव चित्रातकौर होते.

ते बारा वर्षाचे असतानाच साधुसंतांचा आदर करीत.स्वतः कष्ट करून कुटुंबाचे पालन पोषण करीत आणि उर्वरित वेळी समाजसेवा,समाजजागृती,समाजप्रबोधन व समाज परिवर्तनासाठी सतत कार्य करीत.त्यांचे मानवतावादी तत्त्वज्ञान संपूर्ण मानवजातीला सुखी करण्यासाठी आवश्यक आहे .

गुलामी नष्ट करण्याचा संदेश : -गुरु रविदास महाराज रविदास दर्शन मधील १९३ व्या दोह्यात म्हणतात की ,
पराधीन कौ दीन क्या ,
पराधीन बेदीन ॥
रविदास दास प्राधीन ,
सबहि समझै हीन ॥
जो व्यक्ती पराधीन आहे, गुलाम आहे तो स्वतंत्रपणे वागू शकत नाही.दुसऱ्याच्या आज्ञांचे पालन करण्यातच त्यांचे जीवन संपते.गुलामाला सर्वच हिन समजतात म्हणून गुलामीतून बाहेर पडून सर्वांनी स्वतंत्र राहण्याचा प्रयास केला पाहिजे . गुलामी नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने संघर्ष केला पाहिजे . गुलामीच्या विरोधात प्रत्येकाने विद्रोह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा संदेश गुरु रविदास महाराज यांनी समाजाला दिला .

गुरु रविदास महाराज रविदास दर्शन मध्ये १९४ व्या दोह्यात म्हणतात की ,
ऐसा चाहो राज मै ,
जहाँ मिलै सबन कौ अन्न ॥
छोटो बडो सब सम बसै,
रविदास र है प्रसन्न ॥
गुरु रविदासांच्या मते,जेथे सर्वांना अन्न मिळेल,ज्या राज्यात कोणी उपाशी राहणार नाही,जेथे लहान – मोठा ,उच्च – नीच असा भेदभाव नसेल तर बंधुभाव असेल अशा समतावादी राज्याचे गुरु रविदासांनी ६२६ वर्षांपूर्वी मांडलेले वैचारिक तत्त्वज्ञान आजही तेवढेच महत्वपूर्ण आहे जेवढे त्यांच्या काळात होते .गुरु रविदासांच्या या विचारतत्त्वांचे शासन आज निर्माण झाल्यास संपूर्ण भारतीय समाज आनंदाने जगू शकेल कोणीही दुःखी राहणार नाही. समाजामध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुता निर्माण करावयाची असेल तर जाती व्यवस्थेचे उच्चाटन होणे आवश्यक आहे असे गुरु रविदास महाराजांचे तत्वज्ञान त्यांच्या दोह्यातून दिसून येते. ते १२८ व्या दोह्यामध्ये म्हणतात की ,
जात जात में जात है ,
ज्यों केलन मे पात ॥
रविदास न मानुष जुड सकै,
जौं लौं जात ना जात ॥
गुरु रविदास महाराज म्हणतात की , केळीच्या झाडासारखी जातीव्यवस्था आहे.जशी केळीच्या झाडात पानानंतर पान नंतर पुन्हा पान आणि शेवटपर्यंत पानच पान तशीच अवस्था समाजामध्ये जातीची आहे .ज्यात जातीनंतर जात त्यानंतरही जात अशा प्रकारे शेवटपर्यंत जातीचे दर्शन होत राहते . या जातीव्यवस्थेमुळेच समाजात बंधुभाव निर्माण होत नाही म्हणूनच जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे व समताधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे  असे गुरु रविदास महाराज म्हणतात .

मनुष्य कर्मानेच उच्च – नीच : –
गुरु रविदास महाराज १२६ व्या दोह्यात म्हणतात की , रविदास जन्म के कारनै ,
होत न कोऊ नीच ॥
नर कू नीच करि डारि है ॥
ओछे करम को कीच ॥
समाजाला जाती व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी संत गुरु रविदासांनी खूप प्रयत्न केले . कोणताही व्यक्ती जन्मामुळे नीच होत नाही तर मनुष्याला त्याचे कर्मच उच्च व नीच बनवित असतात.त्यासाठी प्रत्येक मनुष्याने उच्च म्हणजे चांगले अर्थात सत्कर्मच केले पाहिजे . जातीव्यवस्थेतून समाजाला मुक्त करण्यासाठी गुरु रविदासांच्या या विचारांची समाजामध्ये पेरणी करणे आज अत्यंत आवश्यक आहे .
हिंदू मुस्लिम भाई भाई : –
हिंदू आणि मुसलमान सर्व
एकच आहेत.हे सांगताना रविदास दर्शन मधील १४८ व्या दोह्यामध्ये गुरु रविदास महाराज म्हणतात की ,
जब सभ करि दोउ हात पग ,
दोउ नैन दोउ कान ॥
रविदास पृथक कैसे भये
हिंदू -मुसलमान ॥
गुरु रविदासजी म्हणतात की, शरीर सारखेच असलेले हिंदू – मुसलमान वेगळे असू शकत
नाहीत कारण दोघांनाही दोन हात,दोन पाय,दोन डोळे,दोन कान तर मग ते दोघे एक दुसऱ्यापासून वेगळे कसे असू शकतील.वास्तवात हिंदू – मुसलमान समसमान आहेत . त्यांच्यात भेदभाव करू नये .आज गुरु रविदासांच्या ” हिंदू -मुस्लिम भाई – भाई ” या विचाराची किती आवश्यकता आहे , हे आपणा सुज्ञ वाचकांना सांगणे न लगे .

मन चंगा तो कठौती मे गंगा :-
गुरु रविदास महाराजांनी मानवी मनाला खूप महत्त्व दिलेले आहे . ते म्हणतात की,
“मन चंगा तो कठौती मे गंगा” माणसाचे मन चंगा म्हणजे चांगले असेल ,पवित्र असेल,सम्यक असेल,समतावादी असेल तर त्याला गंगाजलाची पवित्रता पाण्याच्या साध्या कुंडातही दिसू शकते.पापी म्हणजे अशुद्ध मनाने कितीही वेळ व कोणत्याही नदीत स्नान केले तर त्याचे पाप नष्ट होत नाही तर संसार सुखी करण्यासाठी शुद्ध मनाचीच आवश्यकता असते . मनाची पूजा प्रत्येकाने केली पाहिजे,यासाठी गुरु रविदास म्हणतात की ,
“मन ही पूजा मन ही धूप ॥
मन ही सेऊ सहज सरूप ॥ ” शरीरातील मन हेच सर्वात उच्च आहे,श्रेष्ठ आहे.प्रत्येक मानवाने स्वतःच्या मनाची पूजा केली पाहिजे म्हणजे जीवन जगत असताना शुद्ध पवित्र मनाने आचरण केले पाहिजे.मनावर नियंत्रण ठेवणाराच सर्व विकारांवर नियंत्रण ठेवून शीलवान बनू शकतो व शीलवान म्हणजे सदाचारी बनल्यामुळे त्याचे स्वतःचे जीवन तर आनंदी व सुखी होतेच सोबतच इतरांचे जीवनही तो आनंदी करू शकतो . ही शक्ती मानवात फक्त शुद्ध पवित्र मनामुळेच निर्माण होते,असे गुरु रविदासजी म्हणतात .
समाधानी मनाचे मोल १६४ व्या दोह्यात सांगताना गुरु रविदास म्हणतात की ,
“जो कोई लोरै परम सुख,
तउ राखै मन सन्तोष ॥
रविदास जहां सन्तोष है ,
तहां न लागे दोष ॥ “
ज्याला सुखी व्हायचे आहे तर त्याचे मन संतोषी,समाधानी पाहिजे आणि ज्याचे मन समाधानी आहे त्याच्या जीवनात दोष निर्माण होत नाहीत त्यामुळे त्याचे जीवन आनंदी होते .आनंदी जीवनासाठी प्रत्येकाने स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे तेव्हाच समाजातही शांतता निर्माण होईल कारण मनावर नियंत्रण ठेवल्यामुळे समाजात भांडण – तंटे ,अन्याय . अत्याचार होणार नाहीत कारण शुद्ध मन मनुष्याला अशी पापकर्मे करूच देत नाही .

सत्यवर्तन सुखी जीवनाचा मंत्र : –
रविदास दर्शन मधील १३१ व्या दोह्यात सत्यवर्तनाचे महत्त्व सांगताना गुरु रविदास महाराज म्हणतात की,
रविदास सत्त करि आसरे ,
” सदा सत्त सुख पाय ॥
सत्त इमान नहीं छोडिये ,
जग जाय जउ जाय ॥ “
गुरु रविदासजी म्हणतात की ,सत्य प्रामाणिकपणे जो मनुष्य जीवन जगतो तो मनुष्य जीवनामध्ये सुखी होतो म्हणूनच मनुष्याने सत्याच्या – प्रामाणिकपणाच्या मार्गावरूनच सतत मार्गक्रमण केले पाहिजे . मनुष्याने सत्याचा मार्ग कधीच सोडू नये .जगातील इतरांनी सत्याचा – सदाचाराचा मार्ग जरी सोडला असेल तरी आपण सत्य मार्ग सदाचरणाचा मार्ग कधीच सोडू नये .तुमचा सत्यवर्तनाच्या व सदाचाराच्या मार्गाचे गोड व मधुर परिणाम बघून जगातील मनुष्य सत्य मार्ग स्वीकारून संपूर्ण जग सदाचारी बनेल,असे गुरु रविदास महाराज म्हणतात .थोर समाजक्रांतिकारक , सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या माघपौर्णिमेला असलेल्या ६२६ व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो .

✒️गुरु रविदास राष्ट्रीय समाजसेवा गौरव पुरस्कार प्राप्त(प्राअरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर ,अमरावती)भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०८