दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध!

840

(देहविक्री, वेश्यावृत्ती आणि वेश्याव्यवसाय विशेष)

वेश्याभगिनी ही कलंकित समजली जात असली, तरी देखील या पेशासंबंधी परस्परविरोधी व संदिग्ध मतप्रणाल्या प्रचलित आहेत. स्त्रियांचे अपहरण करणे, कुंटणखाने चालविणे अशा कायद्याने निषिद्ध ठरविलेले असले, तरी या कायद्यांचा अंमल मर्यादित प्रमाणात आढळतो. सन १९६०नंतरच्या स्त्रीमुक्तिवादी चळवळीच्या प्रवर्तकांनी वेश्याव्यवसाय अत्यंत हीन व स्त्रियांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व व आरोग्य यांस बाधक ठरलेला धंदा असे म्हटले आहे. पितृसत्ताक विचारसरणीमुळे ही विदारक वस्तुस्थिती समाजात मान्यता पावते व केवळ कायद्याने तिचे निर्मूलन होऊ शकत नाही, या बाबीला या चळवळीच्या नेत्यांनी प्राधान्य दिले. चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल.

पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात अनिर्बंधित स्वैर स्वरूपाचे कायमचे अथवा तात्पुरते लैंगिक संबंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वेश्याव्यवसाय होय. वेश्याव्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी देहविक्रय करतात. पण पुरुषांनी पुरुषांबरोबर सामान्यत: समलिंगी संबंधात केलेल्या वेश्याव्यवहाराची काही उदाहरणे आढळतात. स्त्रियांनी पैसे मोजून पुरुषवेश्यांकडून लैंगिक सुख घेण्याचा प्रकार अस्तित्वात असला, तरी तो अत्यल्प प्रमाणात आढळतो. वेश्याव्यवसायातील व्यक्तीची मोबदला देणाऱ्या अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवण्याची तयारी असते. पण क्वचित आपल्या ग्राहकाची निवड त्याचे वय, आरोग्य, वंश वा जात असे निकष लावून करणाऱ्या वेश्याही आढळतात.

वेश्याव्यवसाय हा जगातील सगळ्यात पुरातन व्यवसाय मानला जातो. ग्रीक व रोमन काळांतील ग्रंथांमध्ये वेश्यावृत्तीचे उल्लेख आढळतात. भारतीय समाजातही वेश्याव्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. इतर अनेकविध कारणांप्रमाणेच काही अनिष्ट अशा धार्मिक व सामाजिक रूढी-परंपरांतूनही या व्यवसायाला चालना मिळाली. मानवसमाज जेव्हा वसाहती करून स्थिर, सामुदायिक जीवन जगू लागला, तेव्हा लैंगिक संबंधांवर अनेक प्रकारचे नीतिनियम व निर्बंध लादण्यात आले. प्रस्थापित कुटुंबसंस्था व त्यासाठी रूढ अशी विवाहसंस्था ही सामाजिक स्थैर्यासाठी आवश्यकच होती. त्यामुळे काही प्रकारचे लैंगिक संबंध हे समाजमान्य व प्रतिष्ठेसाठी अनिवार्य ठरले. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील निकटवर्ती नात्यागोत्यांतील व्यक्तींना परस्परांत लैंगिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त करण्यासाठी कठोर नियमने अस्तित्वात आली. उदा.आर्इ-मुलगा, वडील-मुलगी, बहिण-भाऊ अशा निकटच्या नात्यांतील अगम्य आप्तसंभोग सर्वच समाजांत निषिद्ध मानला जातो.

प्रत्येक समाजात विवाहसंस्था भक्कम राखणे, औरस संततीचे संगोपन व कुटुंबसंस्थेचे संवर्धन करणे, ही सामाजिक व्यवस्थेची अविभाज्य अंगे मानली जात. मात्र अनिर्बंध लैंगिक संबंध ठेवण्याबाबत सामाजिक नियम नेहमी संदिग्ध राहिले. विशेषत: पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रीकडे उपभोगाचे साधन म्हणून पाहिले जाते. या प्रवृत्तीमधून वेश्याव्यवसाय हा प्रत्येक समाजात निर्माण झाला. वेश्यावृत्तीला एका बाजूने निषिद्ध मानले जाते व वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कलंकित व हीन समजली जाते. तरीदेखील वेश्याव्यवसाय प्रत्यके समाजव्यवस्थेत, प्रत्येक काळात पाय रोवून उभा राहिलेला आढळतो.

मानवाचे लैंगिक जीवन हे साधारणत: संस्कार व रूढी यांनुसार आकारित होते. स्त्री-पुरुष संबंधांना सहज प्रवृत्तीनुसार किंवा वैयक्तिक इच्छेनुसार व्यक्त करण्याची पूर्ण मुभा प्रगत मानवी समाजांत नाही. कायद्याने व सामाजिक रूढींमुळे विवाहाखेरीज लैंगिक संबंध ठेवणे अमान्य ठरते, तरी देखील वेश्याव्यवसायाचे प्रचलन टाळता येत नाही; याला विविध कारणे संभवतात. लैंगिक संबंध केव्हाही व वेगवेगळ्या रूपांत ठेवणे फक्त मानवालाच शक्य असते. वैयक्तिक शारीरिक सुखासाठी तसेच विशिष्ट हेतू साधण्याच्या दृष्टीनेही लैंगिक संबंधांचा उपयोग होऊ शकतो. जेव्हा लैंगिक संबंध आर्थिक मोबदल्याकरिता अथवा शारीरिक गरज व प्रजनन सोडून इतर प्रकारचे हेतू साध्य करण्याकरिता ठेवले जातात, तेव्हा वेश्यावृत्तीची व वेश्याव्यवसायाची सुरुवात होते.

मानवी व्यवहार हे सहज प्रवृत्तीपेक्षा बुद्धिपुरस्सरतेवर अवलंबून असल्याचा हा परिणाम आहे. विशेषत: ज्या समाजात लैंगिक संबंधांवर फारशी बंधने नाहीत, तेथे वेश्याव्यवसायाची सामाजिक प्रश्न म्हणून तीव्रता कमी असते; तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या समस्याही सौम्य असतात. उदा.नेदर्सलँडमध्ये वेश्याव्यवसायाला कायद्याने संमती दिलेली आहे. तेथील वेश्यांना उत्पन्नावर कर भरावा लागतो, त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा व इतर कल्याणकारी सोयी उपलब्ध करण्यास सरकार बांधील आहे. विवाहबाह्य लैंगिक संबंध स्वखुषीने ठेवण्याच्या व्यवहाराला जरी समाजमान्यता नसली, तरी त्यात आर्थिक मोबदल्याची देवाणघेवाण नसल्याने ती वेश्यावृत्ती ठरत नाही. वेश्याव्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बहुतांश समाजामध्ये हेटाळणीचा असला, तरीदेखील एक सामाजिक वस्तुस्थिती या दृष्टीने ते मानवी व्यवहाराचे अविभाज्य अंग बनले आहे, असेही मत आढळते. मात्र व्यक्तिगत कल्याणाच्या दृष्टीने हे चुकीचे आहे.

प्राचीन काळातील ग्रीक व सायप्रसमधील संस्कृतींमध्ये विवाहयोग्य स्त्रियांना हुंड्याची रक्कम जमविण्यासाठी वेश्याव्यवसाय पतकरावा लागे. बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये विवाहपूर्वी मुलींना इश्तार या देवतेला अपेण करीत व तेथील राजपुरोहिताबरोबर संबंध आल्यानंतर ती विवाहयोग्य समजली जाई. इश्तार ही सुफलतेची देवता मानली होती व तिच्या मंदिरात धार्मिक मान्यतेने वेश्याव्यवसाय चाले. प्राचीन काळात चीनमध्ये वेश्यांची वस्ती अलग व विशिष्ट ठिकाणी असे. त्यांना विवाह समारंभात विशेष महत्त्व असे व नवविवाहित दांपत्याबरोबर अनेक रखेल- काँक्यूबाइन्स पाठवल्या जात. रूढी व परंपरेमुळे ही प्रथा समाजात दृढमूल झाली. जपानी संस्कृतीमध्ये कुटुंबसंस्थेच्या संवर्धनाला अतिशय महत्त्व होते. आपल्या मातापित्याचे व भावंडांचे पालनपोषण करण्यासाठी जी स्त्री शरीरविक्रय करी, तिला जोरो असे संबोधले जाई, मात्र तिची प्रतिष्ठा कमी होत नसे. प्राचीन ग्रीक समाजात हेटीअरी- चांगल्या मैत्रिणी हा उच्चवर्गीय वेश्यांचा प्रकार होता.

त्यांची राहणी विलासी असे. डिमॉस्थिनीझ- इ.स.पू. ३८४-३२२ या अथेनियन वक्त्याचे उद्‌गार असे होते, “हेटीअरी या आपर सुखाच्या अपेक्षेने पदरी बाळगतो, रखेल्या या आपल्या दैनंदिन व्यक्तिगत देखभालीसाठी असतात, तर पत्नी वैध संतती देण्यासाठी व इमानेइतबारे कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी असते.” रोममध्ये वेश्याव्यवसायाला प्रतिष्ठा होती, परंतु त्यांना विशिष्ट कपडे वापरावे लागत आणि केस तांबूस, पिंगट रंगात रंगवावे लागत. तसेच या भगिनींना गावातील विशिष्ट भागात वास्तव्य करावे लागे, वेश्याव्यवसायासाठी परवना घ्यावा लागे व त्यांच्या या उत्पन्नावर कर आकारला जाई.
वेश्याव्यवसायावर सामाजिक प्रतिबंध घालण्याविषयी बायबलच्या जुना करारमध्ये निर्देश आढळतात. पेगन वेश्याभगिनी ज्यू समाजाला धोकादायक असल्याची समजूत होती. ज्यू पित्यांनी आपल्या मुलींना वेश्याव्यवसायापासून परावृत्त करावे, असे निर्बंध होते.

आद्य ख्रिस्ती लेखकांनी वेश्याव्यवसाय हे अनिवार्य असे दुष्कृत्य मानले. सेंट ऑगस्टीनने इ.स.३५४-४३० दरम्यान म्हटले आहे, की मानवी वासनेला वेश्याभगिनींनी वाट काढून दिली नाही, तर समाजात बलात्कारासारख्या दुर्घटना घडतील. मध्ययुगात यूरोपमध्ये सर्वच मोठ्या नगरांतून सार्वजनिक वेश्यागृहे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. त्यांना कायद्याचे संरक्षण व आधार होता आणि वेश्याव्यवसायाला परवानाही दिला जात असे. सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये वेश्याव्यवसायापासूनच्या उत्पन्नाचा वाटा मोठा होता. सोळाव्या शतकात गुप्तरोगाची संसर्गजन्य साथ सर्वत्र पसरली; तेव्हा वेश्याव्यवसायावर कडक नियंत्रणे लादली गेली. सोळाव्या शतकात धर्मसुधारणा आंदोलनामुळे लैंगिक वर्तनासंबंधीचे नवे नीतिनियम प्रस्थापित झाले व त्यातूनही वेश्याव्यवसायाला पायबंद बसला. परिणामी यूरोपमधील अनेक वेश्यागृहे बंद पडली. गुप्तरोगाच्या बळींची संख्या जशी वाढत गेली, तसे या व्यवसायावरचे निर्बंध जास्तच कडक झाले. स्त्रियांच्या व मुलींच्या अनैतिक व्यापाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धापर्यंत यूरोप व अमेरिकेत कुंटणखाणे व वेश्यावस्ती प्रत्येक मोठ्या शहरात होती. युद्धकाळात वेश्याव्यवसायाला चालना मिळाली.

मात्र युद्धोत्तर काळात बदलत्या नीतिमूल्यांमुळे तेथील समाजांतील लैंगिक निर्बंध हळूहळू सैल होत गेले आणि स्वैर, अनिर्बंध व मुक्त लैंगिक संबंधांचे प्रमाण खूपच वाढले. विवाहपूर्व तसेच विवाहबाह्य संबंध, कुमारी मातांचे वाढते प्रमाण, कुटुंबसंस्थेचे विघटन या सर्व घडामोडींमुळे वेश्यावृत्तीचे स्वरूप पालटले. उच्चवर्गीय, नोकरदार स्त्रियांमध्येही कॉलगर्ल्स म्हणून पैसे कमावण्याची प्रवृत्ती काही प्रमाणत वाढीस लागली. तसेच वेश्याव्यवसायाशी निगडित इतर अनैतिक व्यवहार व अंमली पदार्थांच्या व्यापारासारखी गुन्हेगारी कृत्ये वाढीस लागली. मद्यपानगृहाच्या माध्यमातून वेश्याभगिनी पुरवल्या जाऊ लागल्या. एड्‌ससारख्या भयंकर रोगाचा फैलाव झाला. पश्चिमी जगातल्या बहुतेक मोठ्या शहरांतून वेश्याव्यवसाय खपवून घेतला जात असला, तरी या व्यवसायाशी निगडित असलेल्या गुन्हेगारीवर मात्र कायद्याने कडक कारवाई केली जाते. ब्रिटिश संसदेने सन १९५९मध्ये केलेल्या कायद्यानुसार त्यांना उघडपणे खुल्या जागी गिऱ्हाईक पटवण्यावर मनाई आहे; मात्र त्यांना घरबसल्या हा व्यवसाय चालवता येतो. तथापि ज्यांना या व्यवसायातून बाहेर पडावयाचे आहे, त्यांना पुनर्वसनासंबंधी योग्य प्रशिक्षण दिले जाते.

स्कँडिनेव्हियन मुख्यत: डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडन देशांतले या व्यवसायावरचे निर्बंध हे मुख्यत्वे आरोग्यविषयक बाबींसंबंधी आहेत. अमेरिकेत सर्व राज्यांत कायद्याने वेश्याव्यवसाय निषिद्ध ठरविला असला, तरी देखील वेश्यावृत्तीला बांध घालणे तेथेही अशक्य ठरले आहे.
वेश्याव्यवसायाचे काही सामाजिक दुष्परिणाम संभवतात. वेश्याव्यवसायाच्या आडोशाने संघटित गुन्हेगारीचे एक अधोविश्व फोफावण्याचीही शक्यता असते. महानगरांतील भरमसाट वाढत जाणारी लोकसंख्या, नोकरी धंद्यानिमित्ताने शहरांकडे धाव घेणाऱ्या बेकार व एकाकी तरुणांचे तांडे, त्यांच्या लैंगिक गरजा भागविण्यासाठी व दारिद्र्यापोटी वेश्याव्यवसाय पतकरणाऱ्या असहाय्य, अनाथ, दीनदुबळ्या तरुणींची वाढती संख्या आदी कारणांस्तव संघटित गुन्हेगारी फोफावते व अनैतिक व्यवहारांचे जाळेही पसरत जाते. वेश्यावृत्तीला संघटित स्वरूप आल्यामुळे अनेक प्रकारच्या गुन्हेगारी व्यवहारांचा तो अड्डा बनतो. अंमली पदार्थांचा व्यापार, हातभट्टीचे व मद्यपानाचे अड्डे, नृत्यशाला, मसाज पार्लर आदी व्यवहार या व्यवसायाच्या अवकाशात चालतात. सर्व पुरुषप्रधान समाज व्यवस्थांमध्ये नैतिक व सामाजिक मूल्यांबाबत दुटप्पी धोरण आढळून येते.

स्त्रियांचे पावित्र्य व चारित्र्य यांसंबंधी काटेकोर नीतिनियम असले, तरी पुरुषांच्या बाबतीत मात्र नैतिक मूल्ये शिथिल होतात. या भेदभावामुळे वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कलंकित ठरते आणि समाजातून बहिष्कृत होते; परंतु वेश्यांभगिनींची विक्री करणारे दलाल व कुंटणखाना चालविणारे चालक यांच्यावर मात्र सहसा कारवाई केली जात नाही. अनेक गुप्तरोगांची तसेच एड्‌ससारख्या जीवघेण्या रोगांची लागण- फैलाव वेश्यांमध्ये आणि त्यांच्यामार्फत समाजात होतो. वेश्यांभगिनींचे वय वाढल्यावर त्यांना विपन्नावस्था येऊन आधार उरत नाही. कलंकित व शारीरिक व्याधींनी आणि विकृतींनी पछाडलेल्या स्त्रियांचा एक वेगळाच उपवर्ग तयार होतो. एकमेकींना आधार देऊन त्या जगतात, कारण बाह्य जगाशी त्यांचा संबंध तुटून जातो. मुंबई, पुणे, कोलकाता यांसारख्या महानगरांत वेश्यावस्तीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अशा वस्तीमध्ये अनेक प्रकारचे अनैतिक व बेकायदेशीर व्यवहार चालतात. बँकॉकसारख्या जागतिक पर्यटनकेंद्र असलेल्या शहरामध्ये वेश्याव्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालतो. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये दलाली चालते व गिऱ्हाईकांना मुली पुरवण्याचा जोडधंदा चालतो. विकसनशील व गरीब असलेल्या देशांमधील बेकारी, दारिद्रय व गुन्हेगारी यांचे वाढते प्रमाण, तसेच भोगवादी संस्कृती व स्त्रियांचा कनिष्ठ दर्जा हे घटक वेश्याव्यवसायाच्या वाढीला कारणीभूत ठरतात.

या प्रश्नाच्या मुळाशी दारिद्रय व शोषण आहे. जोपर्यंत मागणी तसा पुरवठा, हे तत्त्व लैंगिक संबंधांबाबत राबविले जाते तोपर्यंत या व्यवसायाला पूर्ण आळा घालणे कठीण आहे. वेश्याव्यवसायात अनेक व्यक्तींचा व संस्थात्मक रूढींचा सहभाग असतो. देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, कुंटणखाने चालविणाऱ्या कुंटिणी, दलाल इत्यादींचा मिळून एक भिन्न प्रकारचा गट तयार होतो. सर्वसाधारण समाजापासून हा समुदाय विलग्न असतो आणि उपेक्षा व शोषण यांचे लक्ष्य ठरतो, हे मात्र नक्कीच!

✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार गो. निकोडे गुरुजी(मराठी व हिंदी साहित्यिक)मु. एकता चौक, रामनगर- गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३