जळगाव येथे पर्यावरण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

50

🔸निसर्ग संवर्धन आणि निसर्ग लेखन ही एक आनंदानुभूती ! – केटी बागली

✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

जळगांव(दि.26फेब्रुवारी):-‘निसर्ग संवर्धन करणे आणि त्यावर लेखन करणे यासारखे दुसरी आनंदानुभूती कोणतीही नाही,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण लेखिका श्रीमती केटी बागली यांनी येथे केले.त्या जळगाव येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसरे राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीच्या दरम्यान बोलत होत्या.त्यांची मुलाखत काशिनाथ पलोड विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण सोनवणे आणि शारदाश्रम शाळेच्या उपमुख्याध्यापिका अर्चना उजागरे यांनी केली.

            याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव येथील प्रसिध्द उद्योजक व समाजसेवक प्रकाश चौबे उपस्थित होते.सदरील पर्यावरण साहित्य संमेलनाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले.

               बागली यांनी मुलाखतीमध्ये कीटकांचे भावविश्व या मुलाखतीतून उलगडून सांगितले. त्याचबरोबर निसर्ग हा मानवाला भरभरून देत असतो,याविषयी सोदाहरण स्पष्ट केले.आजच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती लोप पावली असून वाचनसंस्कृती विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे पालकांच्या आपल्या वर्तणुकीतून मुलं शिकत असतात, त्यांनी मुलांसह वाचन आणि लेखन केल्यास वाचन संस्कृतीचा विकास निश्चितच होऊ शकतो,असेही त्यांनी स्पष्ट केले.वन्यजीवन आणि पक्षांचे संवर्धन करून वनसंरक्षण करण्यासाठी आपण व्यापक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला विद्यार्थ्यांच्या बहुविध प्रश्नांची यथोचित व समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. 

ग्रंथपूजन व उद्घाटन समारंभानंतर “ कशी फुलते कविता ” या विषयावर कवी अशोक कोळी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी निसर्ग कविता निर्मित कशी होते याविषयी सांगितले. प्राध्यापक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी अनुभवावर आधारित बोधपूर्ण कथा सांगितल्या आणि कथा कशी लिहावी याविषयी मार्गदर्शन केले.

              कवी संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वलिखित आणि संकलित कवितांचे सादरीकरण केले. संमेलनामध्ये १२० कवितांचे सादरीकरण करण्यात आले, त्याचप्रमाणे ४० कथा सादर करण्यात आल्या.त्याचप्रमाणे ‘ पर्यावरण संरक्षणामध्ये विद्यार्थ्यांचे योगदान ’ या विषयावर मोठा गट आणि ‘ विकासासाठी होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ’ छोटागट या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. सौ. माधुरी पाटील,सौ.अर्चना पाटील व सौ.नयना पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

            संमेलनात श्रीमती.सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय,श्रीमती.ब.गो.शानबाग विद्यालय,विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल,ए.टी. झांबरे विद्यालय, नवीन माध्यमिक विद्यालय,के.के. इंटनॅशनल,बालनिकेतन विद्यालय,एस.एस. मणियार महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,या विद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाला समर्पण संस्थेचे संचालक अनिल भोळे,सावित्री सोळुंके सदस्य सविता भोळे, विजय नन्नवरे, श्री भागवत सपकाळे यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे या संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यावरणस्नेही,शालेय शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदाश्रम विद्यालयाचे शिक्षक, विद्यालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.