डॉ. राजेखान शानेदिवाण यांचे साहित्य वास्तवाला भिडणारे : संजय आवटे

65

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.26फेब्रुवारी):- सध्याचे राजकारण, समाजकारण दिशाहीन झाले आहे. धर्माच्या पायावर देश उभा राहू शकत नाही. त्यामुळे साहित्यिकांनी भूमिका घेणे गरजेचे आहे. डॉ. राजेखान शानेदिवाण यांचे साहित्य मानवतावाद जोपासणारे असून ते वंचित समूहाची नातं सांगते. त्यामुळे त्यांचे साहित्य सत्याची बाजू घेत वास्तवाला भिडणारे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.

ते निर्मिती प्रकाशन, प्रकाशित ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण लिखित, संपादित आणि अनुवादित ‘मराठी कादंबर्‍यांतील मुस्लीम समाजजीवन’, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण यांचे विचार’, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर : व्यक्ती आणि विचार’, ‘भारतीय मुसलमान’ या महत्वपूर्ण संशोधनपर सैद्धांतिक अशा चार ग्रंथांचा राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी झालेल्या प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी ग्रंथ लिहण्यामागील भूमिका स्पष्ट करताना भारतातील मुस्लीम व हिंदू यांचे जगणे एक सारखेच आहेत, त्यांना भारतीय परिप्रेक्षात वेगळे करता येणार नाही. भारतीय मुसलमान समजून घेण्यासाठी मुस्लीम होणे गरजेचे आहे असे मत मांडले.डॉ. गिरीश मोरे म्हणाले, धर्माच्या नावाने समाजात निर्माण केलेले गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. लोकशाहीमधील धर्मांधता नष्ट केली पाहिजे.डॉ. रफिक सुरज म्हणाले, समकालीन साहित्यामध्ये डॉ. राजेखान शानेदिवाण यांचे साहित्य अस्सल साहित्य आहे. मुस्लीम समाज मन विचार करणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.

डॉ. नंदकुमार मोरे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ. चंद्रकुमार नलगे, शर्मिला शानेदिवाण, डॉ. शोभा चाळके, माजी आमदार राजीव आवळे, ॲड. करुणा विमल, डॉ. जी. पी. माळी, गणी आजरेकर, डॉ. जे. के. पवार, प्रा. टी. के. सरगर, प्रा. किसनराव कुराडे यांच्यासह कवी, लेखक, साहित्यिक व विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रकाशक अनिल म्हमाने यांनी स्वागत व प्रास्ताविक यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. स्वप्निल बुचडे यांनी केले. आभार डॉ. अविनाश वर्धन यांनी मानले.