वाचन संस्कृती जपण्यासाठी एका दिव्यांगाची धडपड!

133

हळूहळू वाचन संस्कृती नष्ट होत आहे, असे आजकाल सर्रास म्हणले जात आहे.नवी पिढी वाचनापासून दूर होऊ लागली आहे. वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळेही काही प्रमाणात का होईना वाचकवर्ग दुरावत चालला आहे. काही अंशी अशी परिस्थिती सगळीकडेच आहे. तरीही एक ध्येयवेडे दिव्यांग दांम्पत्य वाचन संस्कृती जपण्यासाठी एका छोट्या गावात आजही धडपडत आहेत. कारण त्यांना वाचनाची,पुस्तकाची महती समजलेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे दोघेही मुक्त वाचनालय चालवत आहेत. मुक्त वाचनालय चालवताना येणाऱ्या अडचणी पाहून एखादी धडधाकट व्यक्तीही मागे फिरली असती, परंतु ज्यांना समाज घडवायचा आहे, बदलायचा आहे. ती व्यक्ती आलेल्या सर्व अडचणींना तोंड देत राहते. याचेच एक आदर्श म्हणावे असे उदाहरण आहे ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावचे दिव्यांग रहिवासी दिनकर शिवाजी चवरे आणि त्यांच्या दिव्यांग पत्नी मनीषा दिनकर चवरे.

दिनकर चवरे यांनी २००१ साली वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पेनूर गावी शिवाजी सार्वजनिक मुक्त वाचनालय चालू केले आहे.आपल्या गावी या माध्यमातून सुसंस्कृत पिढी घडण्यासाठी त्यांची ही सगळी धडपड गेली वीस वर्षे अहोरात्र चालू आहे. उभयता प्रसंगी पोटाला चिमटा काढून हे मुक्त वाचनालय चालवत आहेत. दिनकर शिवाजी चवरे हे वाचनालयाचे सचिव म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नी मनीषा दिनकर चवरे तिथेच ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वाचनालयातली ग्रंथसंपदा वाढवण्यासाठी चवरे महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात.याच भ्रमंतीतून साहित्यप्रेमी नागरीकांनी वाचनालयाला आजवर सुमारे पाच हजार ग्रंथ भेट म्हणून दिलेले आहेत.

यामध्ये मराठी ग्रंथ, शब्दकोष, अध्यात्मिक,प्रबोधनपर,शैक्षणिक, कथा,कादंबऱ्यां यांचा समावेश आहे. रोजची २२ दैनिके,दहा मासिके,वीस दिवाळी अंक अशी साहित्यसंपदा या वाचनालयास दिनकर यांच्या प्रयत्नांमुळे लाभली आहे. तरुणाईमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत रस निर्माण व्हावा, वाढावा यासाठी त्यांनी वाचनालयात स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे. प्रचंड आळसावलेल्या आणि स्क्रीनसॅव्ही झालेल्या धडधाकट लोकांना दिनकर यांचे हे कार्य म्हणजे एक प्रकारची चपराकच आहे.

सधन, सुबत्तापूर्ण गावात दिनकर यांचे हे लाख मोलाचे कार्य तसे आजवर उपेक्षित आणि दुर्लक्षितच राहिलेले आहे. याचे कारण सर्वाना माहीत आहे,ते म्हणजे जिथं पिकतं तिथं विकत नाही. निस्वार्थी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या चवरे दांम्पत्याच्या पदरी हेटाळणी,कुचेष्टाच आलेली आहे. त्यांनी पै पै जोडून चालू केलेल्या वाचनालयाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन त्यांना भाडेतत्त्वावर मिळेल त्या जागी काही काळाने स्थलांतर करावे लागत आहे.अथक प्रयत्नांनी चालू असणारे हे ग्रंथालय कायमस्वरूपाच्या जागेच्या प्रतिक्षेत आहे. मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानात भाडेखर्च व ग्रंथालयासंबंधी इतर खर्च भागवताना दिनकर यांची फार ओढाताण होत आहे.तरीदेखील साहित्य सेवेची ही दिंडी ते स्वतः मोठया तळमळीने वाहत आहेत.त्यांनी प्रामुख्याने पुस्तकरूपी देणगी स्वीकारून आजवर हे ग्रंथालया जोपासले आहे.साहित्यप्रेमींकडून सढळ हाताने मदत मिळावी अशी दिनकर यांची माफक इच्छा आहे. यामुळे आपोआप वाचन संस्कृतीचे जतन केले जाईल.शिवाय विविध उपयुक्त पुस्तके वाचनालयात दाखल होतील. याचा फायदा गावातील सर्वांना होईल.विशेषतः युवकांना जास्त प्रमाणात होईल.यामुळे आपोआप सर्वांचाच सर्वांगीण विकास साधला जाईल हे निश्चित आहे.

दिनकर यांचा उजवा पाय लहानपणापासूनच पूर्णपणे निकामी झालेला आहे. काही कारणाने तो कापलेला आहे.या विशेष व्यक्तीने आपल्यासारख्याच विशेष असणाऱ्या मनीषा यांच्याशी विवाह केला आहे.मनीषा उजव्या हाताने व उजव्या पायाने संपूर्णत: दिव्यांग आहेत. दिनकर यांच्या अनुपस्थितीमध्ये मनीषा शिवाजी सार्वजनिक मुक्त वाचनालयाची संपूर्ण जबाबदारी पार पाडतात. या विशेष जोडप्याचे तितकेच विशेष कार्य खरेच वाखाणण्याजोगेच आहे. आजवर विविध गावातील विविध मान्यवरांनी दिनकरांना मदतीचा हात दिलेला आहे.ज्या कोणाला वाचनालयासाठी मदत,देणगी द्यायची इच्छा आहे,तसेच त्यांच्या कामाची माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी या नंबरवर +91 9665478818 दिनकर चवरे यांच्याशी जरूर संपर्क साधावा. दिनकर यांनी ग्रामीण भागात वाचनालयामार्फत समाजाला सकस, निकोप साहित्य वाचनास उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर वेळोवेळी थोर महापुरुषांची जयंती साजरी करून आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे काय हेही ते आपल्या कृतीतून सांगतात. राजगुरूनगर येथील स्वराज्य शिक्षण संस्थेने दिनकर चवरे यांचे समाजभिमुख कार्य पाहून त्यांना स्वज्योत पुरस्काराने सन्मानित केले आहे. समाजभिमूख काम करणाऱ्या साधारण व्यक्तीच असाधारण कार्य करत असतात.

✒️स्वाती गांधी(पुणे)मो:-9325956090