GSA स्कुलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा….

37

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)

धरणगाव(दि.28फेब्रुवारी):- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आज मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय – क्रांतीसूर्य महात्मा फुले – राजर्षी छत्रपती शाहू महाराज – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने गुड शेपर्ड स्कुलमध्ये मराठी भाषा, तिचा इतिहास, प्रगल्भता आणि व्यापकता याचे महत्व सांगण्यात आले. मराठी भाषेचा विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी यासाठी वाचनसंस्कृती वाढली पाहिजे.

भाषा आपल्यावर आईसारखे प्रेम करते, आपण देखील पुत्रवत प्रेम करून भाषेच्या उपकारांची परतफेड केली पाहिजे. १५०० ते २००० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेली मराठी ही खऱ्या अर्थाने शिवराय – फुले – शाहू – आंबेडकरांच्या महाराष्ट्राची मायबोली आहे. महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, छत्रपतींचे स्वराज्य, पुरोगामी महाराष्ट्र या सर्वांच्या जडणघडण मध्ये मायमराठीचे मौलिक योगदान आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी यासाठी मराठी विषय शिक्षकाने आपली मांडणी प्रभावी करणं क्रमप्राप्त आहे. आ – आई पासून प्रारंभ होणारी मराठी आपल्याला ज्ञ – पर्यंत आणून ज्ञानी बनविण्याचे काम करते. आपल्या भाषेवर प्रेम आणि इतर भाषांचा आदर करणं हेच आपल्या मायमराठीचे संस्कार आहेत, असे प्रतिपादन शिक्षक लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजूका भदाणे, सपना पाटील, सुनिता भालेराव, पुष्पलता भदाणे, लक्ष्मणराव पाटील हे शिक्षकवृंद तसेच इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख, वैशाली पाटील, शितल सोनवणे शाळेतील सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी – विद्यार्थीनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गायत्री सोनवणे यांनी केले.