लोकशाही वाचविण्याचा ठेका एकट्या वंचीतलाच दिला आहे काय ?

1266

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

सध्या वंचीत बहूजन आघाडीच्या आणि महा विकास आघाडीच्या युतीची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे सगळे समर्थक आणि पुरोगामी विचारांच्या बहूतेकांनी वंचीत बहूजन आघाडीच्या नावाने बोटं मोडण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला आहे. त्यांचा प्रकाश आंबेडकरांना व्हिलन ठरवण्याचा खटाटोप चालू आहे. या सर्वांचा असा समज असावा की लोकशाही वाचविण्याचा ठेका एकट्या वंचीतलाच दिला आहे. भाजपेतर पक्षांना प्रकाश आंबेडकर हवे आहेत पण फक्त प्रचारक म्हणून हवे आहेत. वंचीतचे मतदार त्यांना हवे आहेत. पण त्यांना त्यांचे स्वतंत्र राजकारण आणि अस्तित्व नको आहे. रामदास आठवले ज्या पध्दतीने बाहूले झाले आहेत तसेच बाहूले प्रकाश आंबेडकरांनीही व्हावे. अशी या लोकांची इच्छा आहे. मुख्य पक्षांचे राजकारण सोडले तर इतर सगळे छोटे त्यांना बाहूले म्हणूनच हवेत. बर आजवर जे जे छोटे छोटे लोकशाहीवादी पक्ष या लोकांनी सोबत घेतले ते संपवले.

त्यांच्यात फुट पाडली. त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला. गत लोकसभेला राजू शेट्टी आणि त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटणेचे काय केले ? त्याच पक्षांची रिकामी झालेली जागा (स्पेस) भाजपाला व्यापायची संधी मिळते त्याचे काय ? प्रकाश आंबेडकरांनी या तथाकथित लोकशाहीवाद्यांच्या सोबत यावे. त्या बदल्यात त्यांनी एखाद-दुसरी जागा व शक्य झाले तर मंत्रीपदाचा तुकडा घ्यावा. इतक्यावरच प्रकाश आंबेडकरांनी गप्प बसावे, समाधान मानावे. उगीचच स्वत:चा पक्ष, स्वत:चे राजकारण उभे करण्याचा खटाटोप करू नये अशीच या लोकांची मानसिकता आहे. याच मानसिततेने सगळे वंचीतकडे पाहत आहेत. वंचीतवर भाष्य करत आहेत.

वंचीतने स्वत:चे अस्तित्व, स्वत:चा स्वतंत्र पक्ष आणि स्वतंत्र राजकारण का उभे करू नयेे ? दरवेळी कॉंग्रेसी व भाजपेतर छोट्या छोट्या पक्षांनी या लोकांच्या वळचणीलाच उभे रहायला हवे ही मानसिकता सरंजामी व जातीयवादी आहे. या भूमिकेतूनच वंचीतवर तोंडसुख घेतले जात आहे. प्रकाश आंबेडकर या लोकांच्यासोबत न आल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसतो, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांचा पराभव होतो. त्याचा भाजपाला फायदा होतो हे खरं आहे. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर अशी दिवाळखोरीची वेळ का आली ? दलित-वंचीत जो त्यांचा मतदार होता तो का सटकला त्यांच्या पासून ? त्या लोकांनी या तथाकथित महान लोकशाहीवाद्यांना का झिडकारले ? याचं आत्मचिंतन हे लोक करणार का ? समाजातले व माध्यमातले विचारवंत असा प्रश्न कॉंग्रेसी व राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारणार का ?

आज लोकशाही संकटात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या अजगराने संविधानाला विळखा घातला आहे.

आज तेच अजगर मोदी-शहाच्या रूपाने लोकशाहीला गिळंकृत करू पाहत आहे. गेल्या पंच्चाहत्तर वर्षात आर एस एस नावाचे बांडगुळ कुणी पोसले ? कॉंग्रेसच्याच अंगा-खाद्यावर हे बांडगुळ वाढले ना ? आर एस एस ने आपली अंडी-पिल्ली कॉंग्रेसच्याच घरट्यातच मोठी केली ना ? आज लोकशाही वाचली पाहिजे आणि त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सोबत आले पाहिजे असे मोठ्या थोबाडाने बोलणारे हे विसरतात काय ? कॉंग्रेसमधले-राष्ट्रवादीतले बहूतेक नेते आजही संघी विचारांचे आहेत. पुरोगामी शब्दाची आणि विचारांची झुल पांघरलेल्या राष्ट्रवादीच्या फक्त ओठात फुले-शाहू आणि आंबेडकर असतात. अजूनही त्यांच्या ओठांच्या आत फुले, शाहू आणि आंबेडकर उतरलेले नाहीत. त्यांच्या मस्तकातला संघी विचार आणि भटशाही अजूनही ताजी आहे. केवळ पुरोगामीत्वाची झुल पांघरून संघ आणि संघाचा विचार वाढविण्याचे व जोपासण्याचे काम चालू आहे.

या भामट्यांना लोकशाहीशी काही देणेघेणे नाही. केवळ सत्ता हाती येत नाही म्हणून त्यांना लोकशाहीचे भांडवल करावयाचे आहे. या नौटंकीवरच सत्ता हस्तगत करावयाची आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर साठ-पासष्ठ वर्षे सत्ता तुमच्याकडेच होती. मग दिल्लीत बसलेला हिटलर वाढला आणि रूजला कसा ? इतका बलशाली झालाच कसा ? इतकी वर्षे सत्ता तुमच्या बुडाखाली असताना हे हिटलरवादी वाढलेच कसे ? २०१४ च्या निवडणूकीत शरद पवारांनी बिनशर्त भाजपाला पाठींबा दिला तेव्हा लोकशाही धोक्यात येईल असे कुणाला का वाटले नाही ? बाळासाहेब ठाकरेंच्या काखेत बसून हे विषारी पिल्लू महाराष्ट्रात वाढत होतं तेव्हा माध्यमातल्या विचारवंतांना हा लोकशाहीचा धोका वाढतोय ? असं का वाटलं नाही ? “कंसा तुझा काळ मथुरेत वाढतोय !” या प्रमाणे, “बाळासाहेबांच्या काखेत किंवा कॉंग्रेसच्या अंगा-खांद्यावर लोकशाहीचा काळ वाढतोय !” अशी आकाशवाणी कुणीच का केली नाही ? या सगळ्यांनीच आळीपाळीने एकमेकांचे मुके घेतले आहेत. शरद पवारांनी महाराष्ट्रात संघाची पाळमुळं खणून काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. बाकी कॉंग्रेसच्या बाजल्यावरच संघ बाळत झाला. त्याची अनेक पिल्ली तिथेच वाढली, मोठी झाली, तिथेच फळली व फुलली.

संघाचा विस्तार कॉंग्रेसच्या अंगा-खांद्यावरच झाला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे की आमचे पक्ष व आम्ही खरच पुरोगामी आहोत, लोकशाहीवादी आहोत ? स्वत: शरद पवारांनीही सांगावे की त्यांचा राष्ट्रवादी पक्ष फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारधारेवरच चालतो. त्यांचे नेते, कार्यकर्ते त्याच विचारधारेला प्रमाण मानतात. माध्यमातल्या विचारवंतांनी यावर करावे भाष्य. आज एकटे राहूल गांधी सोडले तर कॉंग्रेसी प्रवाहातलं दुसरं कुणीच संघाला भिडतं नाही. दक्षिण भारतात भटशाहीला माती चारता येते, तिथं संघाचंं विषारी रोपटं वाढत नाही, मग असे महाराष्ट्रात का घडले नाही ? याचं आत्मचिंतन आज लोकशाही वाचिविण्याची भाषा करणा-या सगळ्याच लोकांनी करायला हवे. भाजपेतर पक्ष केवळ सत्तापिपासू आणि सरंजामी आहेत. त्यांना लोकशाही जळाली तर चालेल पण बुडाखालची सत्ता आणि हरामीने मिळवलेली संपत्ती वाचली पाहिजे असच वाटतं. या भावनेनेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपाच्या छत्रछायेत जात आहेत. शरद पवारांच्या घरातला माणूस भाजपाच्या मांडीवर जाऊन बसतो याला काय म्हणावं ? तामिळनाडूत बाप गेल्यावर स्टॅलिनने मोदींना पायघडया घालायला हव्या होत्या ना ? पण तिथे असे होत नाही. का होत नाही ? याचा विचार करायला हवा.

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभर आर एस एस वाले दंगलीचे राजकारण करू पाहत होते. अनेकांना मारहाण करत होते तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीतला एकही महान लोकशाहीवादी नेता पुढे आला नाही. आर एस एस च्या कट-कारस्थानावर बोलला नाही. त्यांच्या झुंडशाहीला सामोरा गेला नाही. त्यांना भाजपला रोखण्यासाठी व लोकशाही वाचविण्यासाठी वंचीतने महाआघाडीकडे यावे यासाठी बहूतेक सगळेच वंचीतवर दबाव येईल असे बोलत आहेत. प्रकाश आंबेडकर स्वाभिमानी नेते आहेत. ते अशा दबावाला भिक घालणार नाहीत किंवा प्रस्थापित पक्षांच्या झुटींगशाहीसमोर झुकणार नाहीत हे तितकच खरं आहे. खरेतर लोकशाही वाचविण्याचा ठेका एकट्या वंचीतलाच दिला आहे की काय ? बाकीच्या पक्षांची व त्यांच्या नेत्यांची लोकशाही वाचविण्यासाठी काही जबाबदारी आहे की नाही ? त्यांनीही वंचीतला सन्मानाने सोबत घ्यावे. त्यांचेही स्वतंत्र अस्तित्व मान्य करावे.

त्यांची त्यांना स्पेस द्यावी ना. आजवर लोकशाहीवर, संविधानावर ज्या ज्या वेळी हल्ले झाले त्या त्या वेळी या सर्व पक्षातले किती लोक रस्त्यावर आले ? दिल्लीत काही गोडसेवाद्यांनी संविधान जाळले तेव्हा या तथाकथित लोकशाहीवादी व भाजपविरोधी पक्षांनी किती विरोध केला ? याचे चिंतन करावे लागेल. लोकशाही केवळ सत्तेच्या राजकारणापुरतीच वाचवायची असते का ? देशभरात रोजचे अराजक माजवले जात आहे. देवा-धर्माच्या नावाने दंगलसदृष्य परस्थिती निर्माण केली जात आहे. देशात दहशत निर्माण केली जात आहे. रामाचे नावाने देशभर धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे तेव्हा हे लोकशाहीवादी पक्ष कुठल्या बिळात लपलेले असतात ?