समाज प्रबोधनासाठी एकवटल्या २५ आदिवासी संघटना: शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सवाला यंदा नवा आयाम

229

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6मार्च):-क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या १९१ व्या जयंती समारोहाला यंदा कालानुरूप समाज समाज प्रबोधनासाठी एकवटल्या २५ आदिवासी संघटना: शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सवाला यंदा नवा आयामप्रबोधनाची जोड देण्याचा एकमुखी निर्णय चंद्रपुरातील २५ आदिवासी संघटनांनी घेतला. मंगळवारी (दि. १२) सकाळी ११ वाजता शहीद भूमी चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरात होणाऱ्या यंदाच्या नावीन्यपूर्ण सोहळ्यासाठी सर्व संघटना संयुक्तरीत्या जय्यत तयारी करीत आहेत.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चंद्रपूर जिल्ह्याचे आद्य क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या तेजस्वी कार्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी यंदा पहिल्यांदाच राजकीय पक्षातील नेत्यांना या सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आले. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील २५ संघटनांनी एकत्र येत या कार्यक्रमाचे नियोजन केले. सकाळी शहीद भूमी ते बिरसा मुंडा चौक ते शहीद भूमी अशी भव्य मिरवणूक काढण्यात येईल.

दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत प्रबोधनाचा मुख्य सोहळा होईल. सामाजिक कार्यकर्ते हरीश उईके यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रमुख वक्ते म्हणून प्रबोधनकार व बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष तथा अभ्यासक सतीश पेंदाम हे विचार पुष्प गुंफतील. अध्यक्षस्थानी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अशोक उईके व सत्कारमूर्ती गोंडराजे केशवशाह आत्राम आणि प्रमुख पाहुणे म्हणून संयुक्त आदिवासी कृती समितीत सहभागी संघटनांचे सर्व अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

ऐतिहासिक शिलालेखाचेही लोकार्पण

भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध विद्रोह पुकारल्याने शहीद बाबुराव शेडमाके यांना कारागृहात परिसरात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तत्कालीन न्यायाधीश कॅ. डब्लू.एच. क्रिक्टन यांनी २१ ऑक्टोबर १८५८ रोजी दिलेला फाशीचा आदेश एका शिलेवर कोरण्यात आला असून, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून मान्यवरांच्या हस्ते शहीद भूमी परिसरात त्याचेही लोकार्पण करण्यात येणार आहे.

नृत्य, गायन व पथनाट्याचे सादरीकरण

पारंपरिक आदिवासी नृत्य, गायन, वादन तसेच प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम विशेष सत्रात होईल. यावेळी ‘बिरसा- बाबुराव क्रांतिकारी संवाद’ या पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती समितीचे सार्वजनिक उत्सव समारोह समितीचे अध्यक्ष अशोक उईके, क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेसूर शेडमाके समितीचे अध्यक्ष विठ्ठल कुमरे, युवा अध्यक्ष कमलेश आत्राम, महिला अध्यक्ष ॲड. स्नेहल कन्नाके भोला मडावी,राजेंद्र धुर्वे व पदाधिकाऱ्यांनी दिली.