कौशल्य आधारित शेतमजुरांना प्रशिक्षनाचे आयोजन

27

🔸5 ऑगस्ट पर्यंत तालुका कृषी कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक

🔹प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3ऑगस्ट):- शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या पीक पद्धतीमध्ये कीटकनाशक फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी इ. सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण दिल्यास कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास निश्चित मदत होऊन शेतकऱ्यांना सुध्दा मोठा फायदा होणार आहे. कृषी विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे.

कीटकनाशकाच्या असुरक्षित व अनियंत्रित हाताळणीमुळे काही शेतकरी आणि मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. शिवाय कीटकनाशकांच्या अवाजवी वापरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्याचप्रमाणे मानवी आरोग्य व पर्यावरणावर कीटकनाशकांचे दुष्परिणाम होताना स्पष्टपणे दिसून येत आहे.या बाबींचा विचार करून कौशल्यावर आधारित काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राज्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी, शेतमजूर व पर्यावरण संवर्धन यासाठी अत्यंत आवश्यक आहे शेतमजुरांची कुशलता व कार्यक्षमता वाढल्यामुळे शेती उत्पादन व गुणवत्तेमध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे त्यामुळे या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गरजू शेतमजुरांना तज्ञ शिक्षकांकडून प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षित करून त्यांची कुशलता वाढावी हा या मागचा उद्देश आहे.

हे आहेत उद्देश:

स्थानिक पातळीवर कौशल्यावर आधारित प्रशिक्षित मजुरांची उपलब्धता करणे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे. अचूक, गतिमान, कार्यक्षम आणि व्यवसायिक सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे. उपलब्ध निविष्ठांचा कार्यक्षम वापर आणि त्याद्वारे उत्पादन खर्चात बचत करणे. मानवी आरोग्य आणि पर्यावरण पूरक कृषी पद्धतीस प्रोत्साहन देणे. गुणवत्तापूर्ण उत्पादन करणे. पर्यावरण आणि आरोग्य संरक्षण करणे. प्रशिक्षणार्थींना नोंदणीकृत प्रशिक्षण फवारणी मजूर म्हणून मान्यता देणे.

शेतकऱ्यांना कुशल मजुरांची यादी सर्व माध्यमातून उपलब्ध करून देणे.

प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कीटकनाशके बुरशीनाशके व तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी आणि त्यांचा प्रभावी व कार्यक्षम वापर हा उपक्रम राबविला जात आहे. कीटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा उपक्रम प्राधान्याने राबविला जात आहे. जेणेकरून कीटकनाशकांचा योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाईल.

अशी केली जाणार प्रशिक्षणार्थ्यांची निवड :

संबंधित क्षेत्रात सध्या कार्यरत असलेल्या शेतकरी मजूराची निवड प्रशिक्षणासाठी केली जाईल. प्रशिक्षण झाल्यानंतर गरजू शेतकऱ्यांना सेवा देण्याची तयारी आणि क्षमता असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

या योजनेअंतर्गत एका विषयाचे प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुराची पुन्हा कौशल्य आधारित इतर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार नाही.

हे असणार प्रशिक्षणामध्ये समाविष्ट विषय :

या प्रशिक्षणामध्ये फवारणीची गरज, पिकाच्या वाढीनुसार फवारणीची वेळ व पद्धती, किडींची ओळख व आर्थिक नुकसान पातळी, फवारणीसाठी स्प्रे पंपाची निवड व स्प्रे पंपांची निगा, लेबल क्‍लेम कीटकनाशकांची वर्गवारी, कीटकनाशक द्रावण तयार करण्याची पद्धत व माहिती, कीटकनाशकांमुळे विषबाधा झाल्यास प्रथमोपचार व सुरक्षा साधनांचा वापर, फवारणीनंतर किटकनाशकाचा रिकाम्या बाटल्या, डबे वा पाकिटे याची सुरक्षित विल्हेवाट लावणे तसेच पाण्याचे स्त्रोत विहीर, नदी, नाले, तळे सुरक्षित ठेवणे इत्यादी विषय समाविष्ट असणार आहेत.

कौशल्याधारित कामे करणारे शेतमजूर प्रशिक्षण घेण्यास उत्सुक असल्यास त्यांनी आपली कार्यक्षेत्रातील कृषी सहाय्यक, बीटी एम, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दिनांक 5 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.