पोस्टाने आता ईमानदारी सोडली बरं का? (भारतीय टपाल सेवा निषेध विशेष.)

447

 

_भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत- डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स- इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या १ लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे मानले जाते. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रही येथे मिळते. मात्र आज पत्र-पत्रिका, डाक पाहिजे तेथे पोहचविण्यात कमालीची दिरंगाई व हयगय केली जात आहे. पूर्वी अगदी कानाकोपर्‍यात जेथे प्रवासाचे कोणतेही साधन नसतानाही प्रामाणिकपणे हमखास पत्र-चिठ्ठी पोहोचविल्या जात होती. आज मात्र या सेवेने अशी सेवा पायदळी तुडविणे सुरू केले आहे, अशा बेईमान सेवेचा श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या सदर लेखाद्वारे निषेध व्यक्त होत आहे… संपादक._

जबरदस्त सेवेचे श्रेय लाटण्याच्या हेतूने भारतीय टपाल कार्यालयाद्वारे दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. सध्याच्या टपाल व्यवस्थेची सुरुवात सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. सन १६८८मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉरन हेस्टिंग्ज हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना त्याच्याकडे मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या देखरेखीचे अधिकार होते. त्याकाळात सन १७७४मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने टपालासोबत वापरायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सीं अंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी, असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा- १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला व त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. सन २०११पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने मागे पडून दि.१ ऑक्टोबर १८५४ पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकिटे वापरात आली. आज समाजमाध्यमांची चलती असली तरी टपालसेवेवर सामान्य जनता अधिकच विश्वास ठेवून आहे, हे विशेष!
आजही बरेच लोक पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, लिफाफा खरेदी करून पत्र लिहून पाठवितात. संस्था, कंपनी, मुद्रणकार्यालय, मिशन आपल्या वाचकवर्गास साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक पत्रिका तिकिटे चिकटवून पोस्टेड करतात. या सेवेचे पैसे त्या त्या पत्रप्रेषकांनी आधीच डाककार्यालयाला पेड केलेले असतात. तरीही त्या सेवेच्या- पत्र पोहोचविण्याच्या कामात टाळाटाळ केली जात आहे. दोन तीन वर्षांपासून एकही पत्र-पत्रिका वाटप करण्यात आली नाही. ज्यात धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, मनोरंजक, कृषी, वैज्ञानिक, कलाकौशल्य विषयक पुस्तकांचा- ग्रंथांचा समावेश असतो, हे नाईलाजास्तव सांगावे लागत आहे. आज पोस्टमन येईल, पत्रिका देईल, म्हणून रोज वाट पाहणारे डोळे शेवटी पांढरे फट्ट पडत आहेत, परंतु स्वारीचे नुसते दर्शन होणे, दुरापास्त झाले आहे. एखाद्याने विनोद म्हणून बैरंगपत्र पाठविले, तर ते पोचते करून पैसे उकळून नेले जात आहे. सही घेऊन पोचपावती न्यावयाची डाक- जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक हे बरोबर वितरीत केले जातात. यावर हसावे की रडावे असे होत आहे. पूर्वी पत्रखर्च पेड केलेल्यांची गय करून इमानदारीने ते पत्र ईच्छित स्थळी लागलीच पोचते केले जात असे. त्यामानाने आज संबंधीत खात्यांतील कर्मचाऱ्यांचे पगार दसपटीने वाढले म्हणून की काय? असले हलके काम करण्याची लाज वाटत असावी किंवा सदर काम कमीपणाचे, अपमानास्पद नक्कीच वाटत असावे, असे आम्हास वाटते.
पूर्वी निरक्षर लोक पोस्टमनकडूनच पत्र वाचून घेत, त्यावेळी कोणतीच कुरबूर नसायची. आता मात्र खुपच बहाणे केले जात असल्याचे कळते. उदा. गावरस्ता, घर, गल्ली, वॉर्ड, आदी माहित नाही. पत्रिकांवर पूर्ण पत्त्यासह संपर्क क्र. अर्थात मोबाईल नंबर दिलेला असतो. कामाच्या व्यापामुळे, अतिव्यस्ततेमुळे, इतर अतिमहत्त्वाच्या कामामुळे पत्रिका पोहोचवू शकत नाही, म्हणून संबंधित व्यक्तीला आपल्या घरी किंवा पोस्टात बोलावून त्याची डाक त्याच्या स्वाधीन करण्याची साधी तसदीही का बरं घेतली जात नाही? गडचिरोली शहरात मासिक पत्रिका सुरू असलेले बरेच वाचक आहेत. असेच मागील फेब्रुवारी-२०२४मध्ये एकत्र येऊन यावर चर्चा केली. नेहमीच्या पत्रिका मिळणे बंद पडल्याने वाचनाची सवय सुटत चालल्याची खंत प्रत्येकांनीच व्यक्त केली. पोस्टाच्या या गलथान कारभारामुळे आपली वाचनसंस्कृतीही आता धोक्यात आली आहे, पोस्टखातेच वाचनसंस्कृतीला मारक ठरत असल्याचे खापर टपालसेवेवर फुटू लागले आहे. पत्रिका कार्यालयाकडे याबद्दल चौकशी केली असता त्यांनी ठराविक वेळीच तुमच्या पत्रिका नेहमीप्रमाणेच पोस्टेड केल्या आहेत, पोस्टात चौकशी करा, असे सांगत असतात. मग प्रत्येक वाचक पोस्टात येऊन खऱ्या-खोट्या सुनावत भांडण करून जावे का? पत्रपत्रिक पाठविण्याची सेवा-सुविधा चांगल्याप्रकारे इमाने इतबारे पोस्ट खात्याकडून पुरवली जावू शकत नाही, म्हणून सोडून देण्यास काय हरकत राहील? आजवरच्या एवढ्या मोठ्या पुस्तकांना, पत्रिकांना पोस्टाने बेमूर्वतपणे कचरापेटी दाखवली. पोस्टाच्या या निंदनीय कृत्याचा आज समस्त वाचकवर्ग या लेखातून तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आहे.
!! बेईमान पोस्टखाते, पत्रिकांना कचरापेटी देते !! निषेध, निषेध, निषेध !!

– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.