नगरपालिका प्रशासनाला “धरणगाव विकास मंच” तर्फे निवेदन देऊन घातले साकडे धरणगावातील मुलभूत समस्या तत्काळ सोडवा; अन्यथा आंदोलन

91

 

धरणगाव प्रतिनीधी -पी डी पाटील

धरणगाव : शहरातील विविध समस्यांबाबत धरणगाव विकास मंचातर्फे आज लेखी निवेदन पालिका कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी यांना देण्यात आले. शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा तत्काळ पुरविण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचे संकेत मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
धरणगाव विकास मंचने सर्वसामान्य धरणगावकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. किंवा रस्त्यावर वाहन चालवताना अनेक छोटे-मोठे अपघात होतात. धुळीमुळे नागरिकांना आणि विशेषत: वृद्धांना श्वसनाचा त्रास होत आहे. उखडलेले रस्ते आणि अशुद्ध पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गावातील गटारींची स्वच्छता नियमित केली जात नाही. त्यामुळे रोगराई पसरत आहे. मलेरीया सारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. गावातील पथदिवे बंद असल्याने चोरांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. शहरातील रस्त्यांवर वाहनांची सतत गर्दी होत असल्याने पादचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावात विविध ठिकाणी मनमानी पध्दतीने चालक वाहने लावतात, त्यामुळे रहदारीची गैरसोय होत आहे. शहरातील सर्वसामान्य जनतेला वाटर मीटर, गटार या पायाभूत सुविधा ही मिळत नसतील तर मग नगर परिषदेच्या माध्यमातून घरपट्टी आणि नळपट्टी वसुलीचा अट्टाहास का केला जातो. तसेच वृक्षकर, शिक्षणकर अशा अनेक करांची वसुली करण्यात येते. परंतु त्याचा नेमका विनियोग कोठे होतो, याबाबत माहिती द्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

*समस्या सोडवा नाही तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.*

गावातील रस्ते, पाणी, पथदिवे आदीबाबत दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली नाही तर धरणगाव विकास मंचतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांचा वाढता रोष प्रशासनाला परवडणारा नसेल. त्यामुळे समस्या सोडवा नाहीतर नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा निवेदनाद्वारे आबासाहेब राजेंद्र वाघ, अरविंद ओस्तवाल, राहुल जैन, लक्ष्मणराव पाटील, धर्मराज मोरे, प्रमोद पाटील, गोरख देशमुख, विक्रम पाटील, अविनाश बाविस्कर, सुधाकर मोरे, परमेश्वर माळी, दिनेश भदाणे, रमेश चव्हाण, ललित मराठे, भूषण भागवत, ॲड. सागर वाजपेयी, प्रफुल्ल पवार, विनोद पाटील, सागर पाटील, अरुण शिंदे, रामचंद्र माळी, नंदलाल माळी, भरत शिरसाट, मयुर भामरे, अशोक महाजन, संतोष सोनवणे, राहुल माळी, राहुल पाटील आदींनी दिला आहे.