मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची पुसद तालुक्यातील विविध गावांना भेटी!

296

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद : यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी गुरुवारी पुसद तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन ग्रामविकासाचा आढावा घेतला.

यवतमाळ जिल्हा परिषदेचे तरुण व तडफदार मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.मंदार पत्की यांनी जि.प. बांधकाम यवतमाळ क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता प्रमोद उपाध्ये यांच्या समवेत पुसद तालुक्यातील बान्सी गावातील सरपंच गजानन टाले व गावातील उपस्थित जनसमुदायासमोर पाण्याची टाकी बांधकाम व जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा याबाबत मुख्य स्थळावर जाऊन कामाच्या प्रगती बाबत आढावा घेतला. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामार्फत गरोदर माता व स्तनदा माता यांना देण्यात येणारा पोषण आहार याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच शाळास्तरावर व्यवस्थापन समितीची बैठक, विद्यार्थी गुणवत्ता, शिक्षकांच्या समस्या याबाबत शिक्षकांना विचारण्यात आले. बान्सी गावातील स्मशान घाटातील वृक्षारोपण, ग्रामपंचायत या विषयी सविस्तर विचारणा करण्यात आली तसेच महिला बचत गटामार्फत चालणारा निंबोळी अर्क निर्मीती प्रकल्पाला भेट देऊन महिलांशी संवाद साधला.

यांनंतर चोंढी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची व्यक्तिशः पाहणी करुन तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांशी संवाद साधून समस्यांची माहीती जाणून घेतली. यावेळी ग्रामपंचायतने केलेल्या विकास कामाचा आढावा ग्रामसेवकांकडून घेण्यात आला व पुढील कामासाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. त्यानंतर गौळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी केली.

यावेळी त्यांचेसमवेत गटविकास अधिकारी संजय राठोड,तालुका आरोग्य अधिकारी जय नाईक, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी माने साहेब,विभागातील विभाग प्रमुख, कृषी पंचायत विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी टि. डी. चव्हाण, अमित बोजेवार, पाणी पुरवठा विभाग अभियंता सुनिल चव्हाण, शाखा अभियंता,ए.पी.ओ. (न.रे.गा.) रवि जाधव,उमेद तालुका व्यवस्थापक गौरवकुमार कांबळे,आकांक्षीतच्या तालुका समन्वयक पायल पारधी, व इतर गाव स्तरावरील कर्मचारी उपस्थित होते.