अहिंसेचे प्रतीक भगवान महावीर

58

 

जैन धर्माचे चोविसावे तीर्थांकर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक भगवान महावीर यांची आज जयंती. भगवान महावीर यांचा जन्म वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व ५९९ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला असे होते. त्यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना असे होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. भगवान महावीर आठ वर्षाचे असताना त्यांना शिक्षण आणि शस्त्र विद्येचे प्रशिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवण्यात आले. भगवान महावीरांचे कुटुंब जैनांचे तेविसावे तीर्थांकार भगवान पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते. भगवान महावीर २८ वर्षाचे असतानाच त्यांच्या आईवडीलांचे निधन झाले त्यानंतर त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यांनी १२ वर्ष मौन पाळले. हटयोग्याप्रमाणे त्यांनी शरीराला कष्ट दिले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरुवात केली त्यासाठी त्यांनी त्याकाळी प्रचलित असणारी अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. इंद्रिय व विषय वासनेचे सुख दुसऱ्याला दुःख देऊनच मिळवता येते असे त्यांचे मत होते त्यामुळेच त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह याबाबींमध्ये ब्राम्हचर्याचाही समावेश केला. त्याग संयम, प्रेम, करुणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार होते. त्यांनी चतुर्वेध संघाची स्थापना करुन समता हेच जीवनाचे लक्ष असल्याचे सांगितले. देशात ठिकठिकाणी फिरून भगवान महावीरांनी या पवित्र संदेशाचा प्रसार केला. इसवी सन पूर्व ५२७ मध्ये बिहार मधील पावापुरी येथे वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांच्या जन्म आणि निर्वाण दिनादिवशी घराघरात दिवे लावले जातात. भगवान महावीर म्हणतात की, जाणते किंवा अजाणतेपणातून कोणाची हिंसा करणे योग्य नाही. याशिवाय दुसऱ्याच्या मार्फतही कोणाची हिंसा घडवून आणू नये कुठल्याही जीवांना मन, शरीर किंवा बोलण्याने दंडित करू नये. सर्वांच्या आत एकच आत्मा आहे. आपल्या प्रमाणेच प्रत्येक प्राण्यांना आपापले प्राण प्रिय आहे त्यामुळेच कोणत्याही प्राण्यांप्रति हिंसा करू नये. स्वतः हिंसा करणारा, दुसऱ्यांकडून हिंसा घडवून आणणारा व दुसऱ्याने केलेल्या हिंसेचे समर्थन करणारा स्वतःप्रति द्वेष वाढवत असतो असे तेच मत होते. कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे हीच ज्ञानाची खरी परिभाषा आहे. अशाप्रकारे त्यांनी ज्ञानाची व्याख्या केली आहे. आपल्या आत्म्याविषयी असणारा भाव इतर प्राण्यांविषयी असू द्या. सर्व प्राणिमात्रांविषयी अहिंसेचा भाव राखा मन, वाणी आणि शरीराने कोणाचीही हिंसा न करणारा खरा संयमी म्हणून गणला जातो अशी संयमी माणसाची व्याख्या त्यांनी केली. चालताना, बसताना, बोलताना, जेवण करताना असावध असणारा, स्वतःची पूर्ण खात्री झाल्याशिवाय, पहिल्या व विचार केल्याशिवाय कृती करणारा हिंसा करत असतो असे त्यांचे मत होते. दुःखास सर्वच जीव घाबरत असतात हे लक्षात घेऊन कोणत्याही जीवास कष्ट पोहचवणे टाळावे असे ते आपल्या प्रवचनात नेहमी सांगत.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५