?जिल्हयातील पशुचिकीत्सालयातील डॉक्टर्सची रिक्त पदे त्वरीत भरावी
✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
चंद्रपूर(दि.16ऑगस्ट):-जिल्हयात पशुधनावर आलेले रोगांच्या संकटासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असून दृष्टीने जिल्हयात प्रत्येक गावस्तरावर जनावरांच्या तपासणीसाठी शिबीरे आयोजित करावी तसेच जिल्हयातील पशुचिकीत्सालयातील डॉक्टर्सची रिक्त पदे त्वरीत भरावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्हयात जनावरांवर लिम्पी या त्वचेच्या तसेच चौखुरी या रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्हयातील पशुधन धोक्यात आले आहे. शेतक-यांनी संबंधित पशुचिकीत्सालयाशी व पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे तसेच योग्य उपचार मिळत नसल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांसमोर हे नवे संकट उभे ठाकले आहे. जनावरांना झालेल्या या रोगांच्या लागणीवर तातडीने प्रतिबंध घालण्याची आवश्यकता आहे. यादृष्टीने जिल्हयात प्रत्येक गावस्तरावर जनावरांसाठी तपासणी शिबीरे करून लसीकरण व उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. यादृष्टीने शासन स्तरावरून जिल्हयातील यंत्रणांना तातडीचे आदेश देण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जिल्हयातील अनेक पशुचिकीत्सालयांमध्ये डॉक्टर्स उपलब्ध नाहीत, पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकर-यांना संपर्क व संवाद साधण्यात अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हयातील सर्वच पशुचिकीत्सालयांमध्ये नियमित डॉक्टर्स उपलब्ध होणे गरजेचे आहे. विशेषतः जनावरांना झालेल्या रोगांच्या लागणीसंदर्भात तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन अधिका-यांना त्यांनी मागणीची पत्रे पाठविली आहेत.