डी.एड. वेतनश्रेणीतील शिक्षकांचे 5 सप्टेंबर शिक्षकदिन रोजी लाक्षणिक उपोषण

18

🔹सेवाजेष्ठता व पदोन्नती बाबत मागणी

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वर्धा(दि.27ऑगस्ट):- महाराष्ट्र माध्यमिक डी.एड.शिक्षक महासंघाची ऑनलाईन मीटिंग संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष पद्मा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या मिटिंगमध्ये सेवाजेष्ठता व पदोन्नती या विषयावर लढ्याची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
कार्यकारिणीच्या ऑनलाइन मिटिंग मध्ये 9 ऑगस्ट रोजी केलेल्या निषेध आंदोलनावर महासचिव बाळा आगलावे यांनी विस्तृत चर्चा घडवून आणली. या आंदोलनाचा अहवाल शासन दरबारी पोहोचलेला आहे. आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे पत्र शासन प्रशासनाकडून प्राप्त झालेले नाही. म्हणून तीव्र आंदोलनाशिवाय संघटनेपुढे पर्याय उरलेला नाही, असे मत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडले.
खाजगी शाळेतील सेवाशर्ती नियमावली 1981 शेड्युल ‘फ’ कायम आहे. शाळा न्यायाधिकरण, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे निकाल शेड्यूल ‘फ’ ग्राह्य धरून देत आहेत. त्यानुसार रयत शिक्षण संस्थेला दिलेले मार्गदर्शन आणि माहिती अधिकारातील प्राप्त माहिती असताना डी.एड. वेतनश्रेणीत लागलेल्या प्रशिक्षित शिक्षकांच्या सेवाजेष्ठता व पदोन्नतीविषयी प्रशासनामध्ये असलेली उदासीनता पाहून माध्यमिक विद्यालयातील डी.एड. वेतनश्रेणीत लागलेल्या सर्व शिक्षकांविषयीचा दुजाभाव प्रशासन दरबारी स्पष्टपणे दिसतो आहे. तेव्हा आपल्या अधिकार व हक्काविषयी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. यावर कार्यकारिणीतील उपस्थित सर्वांचे एकमत झाले. संघटनेचे कार्याध्यक्ष आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील संघटनेचे उमेदवार नंदकिशोर गायकवाड यांनी आंदोलनाची रूपरेषा व दिनांक याविषयी ठराव मांडला आणि त्यामागील भूमिका स्पष्ट केली.
5 सप्टेंबर शिक्षक दिन याच दिवशी लाक्षणिक उपोषण करण्याचा ठराव संघटनेच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये सर्वांनुमते पारित झाला. या मिटींगला ‘सत्यमेव जयते शिक्षक संघटनेचे’ अध्यक्ष व महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक दिलीप गव्हाळे, संघटनेचे महासचिव बाळा आगलावे,कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड उपाध्यक्ष विश्वनाथ मघाडे, राजेंद्र मसराम, बंडू भाऊ धोटे, प्रशांत सपकाळ, विभागीय सचिव आर डी पाटील, लक्ष्मण राठोड, काळूराम धनगर, निमंत्रीत सदस्य प्रशांत बोर्डे,विजया गायकवाड, देविदास जांभुळे, शांताराम खांबे इत्यादी उपस्थित होते.