जनावराच्या लंपी स्किन आजारांवर उपाययोजना शिबिरे आयोजित

16

🔹खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

हिंगोली(दि.29ऑगस्ट):- संपूर्ण देशाला कोरोना आल्यानंतर आता जनावरांना लंपी स्किन नावाच्या त्वचा रोगाने हैराण केले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघासोबतच नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात या रोगाची चाहूल लागताच खासदार हेमंत पाटील यांनी या पार्श्वभूमीवर पशुधन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आजाराबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या आणि संपूर्ण जिल्हाभर जनजागृती मोहीम राबवून बाधित जनावरांना औषध उपचार करण्यात यावेत याकरिता शिबिरांचे आयोजन करावे अशा सूचना दिल्यानंतर तात्काळ यावर अंमलबजावणी होऊन उपचारांना सुरुवात करण्यात आली आहे.

पावसाळ्यात जनावरांना लाळ्या, खुरकूत, फऱ्या, घटसर्प या सारखे आजार होत असतात पण यंदाच्या पावसाळ्यात मात्र लंपी स्किन या आजाराने भर टाकली आहे. संपूर्ण जग कोरोना आजाराने मागील सहा महिन्यापासून हैराण झाला असताना भारतात जनावरांना सुद्धा आजारांची लागण होत आहे. प्रामुख्याने बैल आणि गाय यांच्यामध्ये लंपी स्किन या आजाराचे प्रमाण जास्त दिसत आहे.

या आजाराचा शिरकाव हिंगोली लोकसभा मतदारसंघात झाल्याच्या घटना समोर येऊ लागताच खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ मतदारसंघातील हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांना संपर्क साधून या आजाराबाबत परिपूर्ण माहिती घेऊन कशामुळे संसर्ग होत आहे याचा शोध घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्या आणि संपूर्ण मतदारसंघातील पशु पालकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने यंत्रणा कामाला लावावी असे आदेश दिले. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्यामुळे पशुंची काळजी घेण्याबाबत ग्रामीण भागापर्यंत जनजागृती करावी, आजाराची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ पशुधन अधिकाऱ्यांशी किंवा पशु पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा यासाठी उपाययोजना म्हणून मतदार संघातील ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखाने संपूर्ण सुविधा आणि औषधांनी सुसज्ज करावीत आणि यंत्रणा गतिमान करावी असेही खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. यावर हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांचा पशुधन विभाग कामाला लागला आहे. ग्रामीण भागात रोगांचा फैलाव रोखण्यासाठी जनावरांना औषधी फवारणी, गोठा जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली असून पशुपालकांना रोगांची माहिती आणि त्यावरील उपाय योजना यांची माहिती देण्यात येत आहे.

अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी हैराण झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला आहे आणि आता जनावरांना रोगाची लागण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे या घटनेला गांभीर्याने घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वेग वाढवावा असेही खासदार श्री. हेमंत पाटील यांनी सांगितले.