वसंतोत्सव

30

आला वसंंतऋतू आला वसूंधरेला हसवायाला,सजवित,नटवित लावण्याला..आला आला”सर्व ऋतुंचा राजा म्हणजेच वसंत आला सुद्धा.शिशिराची पानगळ संपत…हवेतला गारवा कमी होवू लागतो…अन् होळीनंतर ऋतू कुस बदलतो अन् आगमन होते नितांतसुंदर वसंताचे!आयुष्यात कित्येक वसंत आलेत अन् गेलेत पण प्रकर्षाने आठवण होते त्या वसंताची जेव्हापासून वसंत अनुभवण्याची दृष्टी लाभली.

तिनेक वर्षापूर्वीची गोष्ट.एका हाफ डे च्या दिवशी लेकाने माझ्या शाळेत येण्याचा हट्टच धरला.सोबत विशेष गरजा आसणाऱ्या मुलांसाठी शिकवायला आलेल्या शिक्षिका होत्या.शाळेच्या वाटेने दूतर्फा पळसाची झाडं दाटीवाटीन वाढलेली.होळीच्या सुमारास ही झाडे केशरी रंगाच्या फुलांनी भरभरुन फुलतात.ही झाडे जसजशी नजरेच्या कक्षात आली तेव्हा बोबड्या बोलात….”अले वा! काय सुंदर दिसतंय मम्मा हे झाडं!अच्छ वाटतंय जणू आग लागलीय आग….लाललाल!”सकाळी इच्छा असूनही वेळेअभावी न थांबता आल्याने परतीच्या प्रवासात त्याला डोळे भरून बघण्यासाठी मी गाडी थांबवली.बाळाचे बोबडे बोल ऐकून मॕडम म्हणाल्या'” अजून काय काय दिसतंय रे.तूझं वर्णन ऐकून मलाही बघण्याचा मोह झाला.”हे वाक्य कानावर पडले अन् माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले कारण मॕडमच्या अंधपणातलं रितेपणं काळीज पोखरणारं होत. पळसाची काही फूले मी मॕडमच्या ओंजळीत दिली तर त्यांनी फूलांचा गंध मनात साठवत फूलांवरुन प्रेमळ हात फिरवला.संपूर्ण प्रवासात मॕडम आता कायं दिसतंय असं विचारत मनाच्या अंतःपटलावर या अलौकिक निसर्गाचे चित्र रेखाटत होत्या.कसे असतील त्यांच्या कुंचल्यातील रंग

मिळालेलं आयुष्य अधिक बहारदारपणे कसं जगावं याचं प्रात्यक्षिक मॕडम देत होत्या.आपण अनेकदा प्रवासात डोळ्यांनी मोबाईलमधील जग न्याहाळतो किंवा अगदीच डोळे मिटून ध्यानस्थ जणू अवघ्या विश्वाचे दुःख आपल्याच वाटेला आशा मुद्रेत!ह्या चराचर सृष्टीचे सौंदर्य डोळे भरुन बघण्यासाठी हा अनुभव समृद्ध करणारा ठरला.निसर्गाच्या सौंदर्याचा परमोच्च बिंदू…वसंत बघण्यासाठी जरा खिडकीच्या तावदानातून नजर तर टाकायलाच हवी.

वसंत हा फाल्गून,चैत्र आणि वैशाख या तिन महिन्यांत विभागून येतो.झाडांची सगळी जीर्ण पालवी कात टाकल्यागत गळून पडते.हिरव्या कोंबातून फुटून दोन लुकलुकणारी पानं हळूच बाहेर येतात. कोवळी कौवळी …चैतन्याची तुकतुकीत पालवी अंगभर मिरवतात. मोगरा,रातराणी,जुई,निशिगंध,मधुमालती आपल्या मादक सुगंधाची बरसात मुक्तहस्ते करतात.हे सौंदर्य अनुभवण्यासाठी रानावनात गेल्यावर तिथे भेटतो मोठाल्या फुलांचा काटेसावर…जणू वन्य पक्षांचे रसवंतीगृहच!पळस अर्थात fire of forest लाल,केशरी रंगाने निष्पर्ण होऊन रखरखत्या उन्हात फुलण्याचे धाडस करुन जगण्याचा उत्सव करावा हीच शिकवण देतो.बहिणाबाई चौधरी कवितेत म्हणतात.

.’पयसाची लाल फूलं
हिरवे पान गेले झडी
विसरले चोची मिठू
गेले कोठे उडी”

पांगारा,मोह,करवंदी अशा कितीतरी रानझाडे मादक,उन्मत्त गंधाने दूरुनच खुणावतात.लालगर्द फुलांच्या पायघड्या घालून रस्त्याच्या दूतर्फा गुलमोहर विसावतो.वर्षभर आतुरतेने वाट बघायला लावणारा फळांचा राजाला मोहर फुटण्याचा हाच कालावधी.त्याचा गोड सुगंध कोकीळेला सुमधूर गीत गायला भाग पाडतो.पाऊस नसतांनाही ही चराचर सृष्टी केवढी नटलीय…वर्षातून एकदाच भरभरुन फुलण्यासाठी ही झाडे आसूसलेली असतील का?

प्रेमभावना परमोच्च टोकाला पोहोचोवणारा ऋतू म्हणजे वसंत!चहुकडे प्राणी,पक्षी एकमेकांना साद घालताय.पाखरे या विनिच्या हंगामात आपल्या जोडीदाराला साद घालत निर्मितीची आस पूर्ण करतात.निसर्ग अगाध आहे सुख दुःखाच्या पल्याड जावून विचार करण्याची शक्ती देतो.राग,लोभ या अवगुणांवर मात करत अंगी असलेल्या क्षमतेने.. मुक्तपणे भरभरुन फुलण्याची शिकवण माणवाला देतो.कोणतंही झाडं कुणाशीही स्पर्धा न करता निरामय भावनेने पूर्णत्वाला येते.आपल्या मनातील मरगळ आपसूक गळून पडते.एक नवं चैतन्य येतं.निसर्ग आपल्याला भरभरुन देत आसतो…अगदी निर्व्याजपणे…ही निसर्गाची रंगपंचमी अनुभवून हे गुण आत्मसात करायलाच हवीत.

या ऋतूत शेतातील कामेही जवळजवळ संपलेली असतात.बहुतांशी लग्नांची जुळवाजुळव करण्याचा हाच कालावधी असतो.जणू दोन जीव निसर्गाच्या वसंतात एकरुप व्हावेत.बायकांची उन्हाळी कामांची लगबग असते.साहजिकच मैत्रीणींसोबतच्या गुजगोष्टीतून मनातली सल आलवारपणे निघून जाते.आदीवासी समाजात होळीच्या सणाला खूप महत्त्व असते.नाच,गाणे यांचा सर्वत्र जल्लोस असतो.गावोगावच्या यात्रांना बहर आलेला असतो.जणू आनंदाची विविध रुपे बघायला मिळतात. भौतिक श्रीमंतीच्या थिटेपणाची जाणीव वसंतातील नटलेल्या आवनीकडू बघून झाल्याशिवाय राहत नाही.संवेदनशील मनाने या नटलेल्या सृष्टीचे…वसंताचे आगमन टिपावे…व मनाशी संकल्प करु….येत्या पावसाळ्यात किमान पाच तरी झाडे लावूयात भावी पिढीसाठी….अन्यथा आला वसंत देही मज ठाऊकेच नाही….असं होवू नये.

✒️लेखिका:-श्रीमती ज्योती थोटे-गुळवणे(9850211943 )
अंबड,जि.जालना

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿