अँड.बाळासाहेबांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

17

✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697

पंढरपूर(दि.3सप्टेंबर):- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह बाराशे कार्यकर्त्यांवर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईचा वंचित बहुजन आघाडी तसेच वारकरी सांप्रदाय व अन्य संघटनांनी तीव्र विरोध करीत नाराजी व्यक्त केली. हे गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल पंढरपुरात जाऊन आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाचे लोक तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. विठ्ठल रखुमाई मंदिर उघडल्या शिवाय पंढरपूर सोडणार नाही अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतल्याने प्रशासनाला नमते घ्यावे लागले. पर्याय म्हणून बाळासाहेब व अन्य पदाधिकाऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. मुखदर्शन झाल्यानंतर येत्या आठ ते दहा दिवसात राज्यातील सर्व मंदिरांबाबत नियमावली तयार करून मंदिर उघडली जातील, असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन तूर्त स्थगित केल्याची घोषणा केली.

कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेने आंदोलन पार पडले असे असतानाही रात्री उशिरापर्यंत प्रकाश आंबेडकर अन्य पदाधिकारी तसेच वारकरी संप्रदायाच्या लोकांसहित वंचित बहुजन आघाडीच्या बाराशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी करण्यात आले. या कारवाईचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत असून सूडबुद्धीने कारवाई केल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे हे गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.