गेवराईत अवैध वाळू साठ्यावर छापा, शंभर ब्रास वाळू जप्त

10

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.5सप्टेंबर):-तालुक्यातील संगमजळगाव याठिकाणी अवैध वाळू साठ्यावर धाड टाकून शंभर ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. तसेच गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या दोन केन्या जप्त करुन साहित्य नष्ट करण्यात आले. शुक्रवार दि.4 रोजी तहसीलदार सुहास हजारे यांनी ही सिंघम कारवाई केली. गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैद्यरित्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे.

याविरोधात महसूल तसेच पोलिस प्रशासन सातत्याने कारवाई करत असले तरी वाळू माफिया या कारवायांना न जुमानता राजरोसपणे वाळू उपसा करुन वाहतूक करत आहेत.दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील संगमजळगाव याठिकाणी नदीपात्रातून केनीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सुहास हजारे यांना मिळताच त्यांनी सदरील ठिकाणी धाड टाकली. यावेळी महसूल पथक आल्याची कुणकुण लागताच केन्या सोडून माफिया पळून गेले.

या कारवाईत दोन केन्या जप्त करुन उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य अधिकार्‍यांनी जाळून नष्ट केले. तसेच 100 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. हि कारवाई तहसीलदार सुहास हजारे, अव्वल कारकुन नामदेव खेडकर, मंडळ अधिकारी अंगद काशिद सह आदींनी केली.