शिक्षक दिन

33

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू पुढे हा वारसा”

जीवनातील प्रथम गुरू आपले आईवडील. त्यांची करंगळी सोडून जेव्हा आपण घरच्या व्यतिरिक्त नव्या जगस्ट प्रवेश करतो ते नवे जग म्हणजे शाळा. त्या जगाचे शिल्पकार म्हणजे आपले शिक्षक. रडणाऱ्या मुलाला हसवण्याचे सामर्थ्य, आईच्या मायेने जवळ घेऊन घडवण्याचे सामर्थ्य कोणात असेल तर फक्त आपल्या शिक्षकांकडे.पूर्वीच्या काळी गुरुकुल पध्दती होती.मुल गुरुच्या आश्रमी जाऊन ब्रम्हचर्य आश्रमात शिकत असे.जीवनाला आवश्यक कौशल्ये गुरूकडून शिकुन घेत व जबाबदार नागरिक घडून आपल्या जीवनातील कर्तव्याची धुरा वाहत.

शिक्षक दिन हा प्रत्येक देशात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.आपल्या भारतात ५सप्टेंबर ला आपण साजरा करतो.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण भारतात शिक्षकांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.१९६२ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती.देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव आहे असे त्यांनी म्हटले होते.

शून्यातून स्वर्ग निर्माण करण्याची ताकद फक्त शिक्षकांकडे असते.शिक्षकांमुळे देशातील डॉक्टर, शास्त्रज्ञ,लेखक, वकील, शिक्षक,अभियंते उद्योजक यांची पिढी तयार होते.चांगल्या संस्काराची शिंपण करून यशाची फुले फुलवणारा शिक्षक हा एक माळी आहे.जगासमोर आपले निर्भीड विचार मांडणारा वक्ता हा शिक्षकच घडवत असतो.शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या उपजत क्षमतांचा,अंगभूत गुणांचा विकास होतो.
तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात वाढला,परंतु शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही.शिक्षकांचे स्थान काल, आज व उद्या समाजात व देशात अढळ राहील.प्रत्येक शिक्षकाने खऱ्या अर्थाने सुशिक्षित, सुसंस्कृत, विज्ञाननिष्ठ व उद्यमशील भारत घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे. वर्तमानकाळात शिक्षक हे अध्यापनकर्ता न राहता ते मार्गदर्शक,समुपदेशक देखील आहेत.तंत्रज्ञान कितीही बदलले अध्ययन अध्यापनाशिवाय शिक्षणात पर्याय नाही.विद्यार्थी हा परीक्षार्थी असता कामा नये,तसेच शिक्षक ही निव्वळ अर्थार्जनाचे साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहणारे असू नये.शिक्षक विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करतो.आत्ताचा विद्यार्थी पुर्वी सारखा पूर्णपणे शिक्षकांवर विसंबून राहिलेला नाही.सुसज्ज वाचनालयापासून तर आंतरजालापर्यंत विविध साधने आज त्याच्याकडे आहेत.त्या साधनांची योग्य ती दिशा त्यांना दर्शविली पाहिजे.

सर्व शिक्षक वर्गाचे आदर्श, भारतीय तत्वज्ञानाचे भाष्यकार, जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, मानवतावादी विचारवंत, लेखक, कुशल वक्ते, राजकारण व धर्मकारण यांचे समन्वयक भारताची प्रतिमा विदेशात उंचावणारे थोर तत्त्वचिंतक अशा विविधांगी व्यक्तिमत्वाचे धनी ‘भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ हे आम्हा शिक्षकांसाठी उत्तुंग प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे.

✒️लेखिका:-सौ.शामल शंकर मांजरेकर/पिळणकर
                     प्राथमिक शिक्षिका
                    वेंगुर्ला, सिंधुदुर्ग

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
          (अहमदनगर विशेष प्रतिनिधी)
                 मो:-9404322931