“आपले दिव्यांग,आपली माणसं ” याप्रमाणे दिव्यांग बांधवांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी राबविण्यासाठी पुढे यावे – राजेंद्र लाड

17

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.21सप्टेंबर):- राज्य शासन माझे कुंटुंब माझी जबाबदारी ही योजना राबवित असून राज्यात यशस्वीपणे राबवतांना प्रत्येक कुंटुंबाचं सर्वेक्षण करुन त्या कुंटुंबातील प्रत्येक व्यक्तीची पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे.राज्यातील दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी “आपले दिव्यांग,आपली माणसं ” याप्रमाणे या शासनाच्या मोहिमेत सहभागी होवून प्रत्येक दिव्यांग बंधू – भगिनींची व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घेण्यासाठी पुढे यावे.

या मोहिमेपासून एकही दिव्यांग वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिव्यांग हितार्थ केले आहे.या मोहिमेमुळे महाराष्ट्र राज्यात कोरोनाची लागण झालेल्या दिव्यांग व्यक्तींची ओळख होईल व त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींना या आजारापासून टाळता येण्यास मदत होईल.या मोहिमेचा व्हाॕटसअप, फेसबुक व इतर सर्व प्रसारमाध्यमातून प्रचार व प्रसार करावा.

असेही राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने माझे कुटुंब,माझी जबाबदारी अशी खास नवी मोहीम राबण्यात येत आहे.१५ सप्टेंबरपासून मोहिमेला सुरूवात झालेली आहे.या मोहिमेअंतर्गत आरोग्य स्वयंसेवक राज्यातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन ताप आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी करणार आहेत.
आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक घरोघरी जाऊन लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे,संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह,हृदयविकार, किडनी विकार,लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा देणार आहेत.

विशेष बाब म्हणजे बहुविकलांग व मतीमंद दिव्यांग बांधवांनी या मोहिमेत सहभागी होवून स्वतःची तपासणी करुन घेणे फार महत्त्वाचे आहे.बऱ्याच अंशी अतीतीव्र बहुविकलांग व मतीमंद यांना समाजात आणले जात नाही.कुटुंबातील एखाद्या कोरोना ग्रस्त व्यक्तींचा त्यांना सहवास आल्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण होवू शकते.पण अतितीव्र दिव्यांगत्व असल्यामुळे त्यांना पुढे आणले जात नाही.तेंव्हा ते तपासणी पासून वंचित राहण्याची दाट शक्यता असते.तेंव्हा अशा दिव्यांग बांधवांची तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी राज्यातील सर्व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येवून अतीतीव्र व सर्वच दिव्यांग प्रकारातील दिव्यांग बांधवांची तपासणी करुन घ्यावी.

विशेष कारण म्हणजे दिव्यांग असल्यामुळे अगोदरच प्रतिकार शक्ती कमी असते.तेंव्हा प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी दिव्यांग बांधवांनी आवश्यक तेवढी काळजी घ्यावी.कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन करावे.

शासनामार्फत आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी,पालक,सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा,संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत यामध्येही दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवावा.शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम “आपले दिव्यांग,आपली माणसं ” याप्रमाणे सर्वांची तपासणी करुन यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी.असेही शेवटी राजेंद्र लाड यांनी आवाहन केले आहे.