भाजपाचे राजकारण पुन्हा शेठजी आणि भटजीच्या दिशेने

32

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मागची चार वर्षे फडणवीसांनी सत्तेचा हूक आणि पदांची गाजरं दाखवून भाजपात मेगाभरती केली होती. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर फडणवीसांनी बेंबीच्या देठापासून प्रचार केला त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बदनाम असलेले अनेक चेहरे भाजपात घेतले.

त्यांना पक्षाची द्वारं मोकळी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यागी कार्यकर्त्यांनी जीव तोडून नैतिकता, भ्रष्टाचार आदी मुद्दे प्रचारात लोकांना सांगितले पण फडणवीसांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीतली बहूतेक भ्रष्ट लोकं भाजपात घेवून या सगळ्या मुद्द्यांना फाट्यावर मारले. सत्तेसाठी भाजपा कुठल्याही थराला जावू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.

ज्या अजित पवारांना अटक करण्याच्या वल्गना केल्या त्याच अजित पवारांशी सत्तेचे साटेलाटे करत पहाटे पहाटे त्यांच्या सोबत शपथ घेतली. २०१४ च्या निवडणूकीत सर्व भ्रष्ट कॉंग्रेस-राष्ट्रवादीची लोकं तुरूंंगात टाकणार असा प्रचार केलेल्या भाजपाने ही लोकं तुरूंगात टाकण्याऐवजी पक्षात घेतली. त्यांना तिथे पदं, इज्जत दिली. दुस-या बाजूला ज्यांनी हयातभर राब-राब राबून पक्ष उभा केला, तळागाळापर्यंत पोहोचवला ती माणसं अडगळीत टाकली.

ज्या महाराष्ट्रात भाजपाला अस्पृष्य समजले जात होते त्याच महाराष्ट्रात भाजपाला घरोघरी पोहोचवण्याचे काम गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, अण्णा डांगे, तावडे आदी लोकांनी केले. गांधी हत्येनंतर भाजपाला महाराष्ट्रात अस्पृष्यांसारखी वागणूक मिळत होती. भाजपाचा बिल्लाही कुणी हातात घेत नव्हते. “शेठजी आणि भटजींचा” पक्ष अशीच भाजपाची प्रतिमा होती. ब्राम्हणेतर कुणी भाजपाला स्विकारत नव्हते. ब्राम्हणवाडे आणि त्या वाड्या समोरच्या संघ शाखा इतकीच काय ती भाजपाची औकाद होती.

त्या काळात या लोकांनी भाजपाला घरा-घरात पोहोचवले. प्रचंड कष्ट केले, मेहनत केली आणि पक्ष वाढवला. मुंडे, खडसे, तावडे व डांगे ही बहूजन तोंडावळा असलेली माणसं होती. त्यामुळेच भाजपाचा माधवम प्रयोग यशस्वी झाला. त्यात माळी, धनगर, वंजारी आणि मराठा असे सोशल इंजिनियरींग केले गेले होते. अलिकडच्या काळात ते तुटू लागले आहे.

भाजपाच्या सत्ताकांक्षेपोटी त्याला धक्के बसू लागलेत. मुंडे, खडसे, डांगे, तावडे या तोंडावळ्यांनीच भाजपाची शेठजी आणि भटजींचा पक्ष ही ओळख पुसली होती. आज पुन्हा भाजपा त्या चौकटीत स्वत:ला अडकवून घेतो आहे. त्याच्या मुळ ओळखीकडे तो परत निघाला आहे.

खरेतर भाजपा हा पक्ष बहूजनांचा कधीच नव्हता आणि आजही नाही. भाजपाचा मुळ अजेंडा हा शेठजी आणि भटजींच्या उध्दाराचाच राहिला आहे. भाजप देशात पुर्ण बहूमताने सत्तेत आल्यावर तर ते अधिकच स्पष्ट झाले. या देशात सत्तर वर्षे लोकांनी भाजपाला स्विकारले नाही ते उगाच नाही. भाजपवाल्यांची भूमिका नेहमीच समाज तोडणारी राहिली आहे, जोडणारी कधीच नव्हती.

गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे, अण्णा डांगे आणि विनोद तावडे सारख्या नेत्यांच्यामुळे हा पक्ष महाराष्ट्रात रुजला. मुंडेंना-खडसेंना भाजपाने पदं देवून मेहरबानी नाही केली किंवा त्यांच्यावर उपकार केले नाहीत. उपकार-मेहरबानी केली आहे ती दरेकर वगैरे अलिकडच्या कंपनीवर. भाजप नावाचे झाड वाढविण्यासाठी कष्ट उपसले मुंडे, खडसे, डांगेंनी. आता त्या झाडाला फळे लागल्यावर ती चाखायला गडकरी, फडणवीस, गिरीष महाजन, गिरीष कुलकर्णी पुढे आले. पण ख-या अर्थाने हा पक्ष महाराष्ट्राच्या काना-कोप-यात नेला तो याच मुंडे, खडसे, डांगे व तावडे या लोकांनी.

आज सत्ता आल्यावर हे बहूजन चेहरे भाजपाने बेदखल केले आहेत. पक्षात त्यांना फार किमंत नाही. विनोद तावडेंना राजनाथ सिंहाचा ड्रायव्हर कोलतो, त्यांच्या गाडीत बसताना धक्काबुक्की करतो तर त्याचवेळी राजनाथसिंह बघत बसतात. गोपिनाथ मुंडेंच्या अखेरच्या काळात त्यांनीही भाजप सोडायचा विचार केला होता. ते भाजपा सोडून दुस-या पक्षात निघाले होते. तर त्याचवेळी विधानसभेवर थेट कधीच निवडूण न आलेले नितिन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते.

आता चाळीस वर्षाचे आयुष्य भाजपाला दिलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपा सोडून राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मुहूर्तच जाहिर केला आहे. एकनाथ खडसे ज्या क्षणाला भाजपातून बाहेर पडतील तो दिवस भाजपाच्या ओहोटीची सुरूवात असेल. तिथून महाराष्ट्रातील भाजपाची मुळं उचकटली जातील. आजघडीला भाजपात मासबेस असणारा एकही मासलिडर उरला नाही. जे उरले आहेत ते फडणवीसांचे चेले-चपाटे आणि दरबारी राजकारण करणारे हुजरे. हे सगळे देवेंद्र फडणवीसांच्या बोटावर नाचणारे नेते आहेत.

देवेंद्र फडणवीसांना संघाचा आशिर्वाद आहे. म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. फडणवीस हे मासलिडर नाहीत आणि कधीच नव्हते. त्यांनी आयत्या पिठावर रांगोळ्या काढण्याचे उद्योग केले आहेत. नरेंद्र मोदींच्या करिष्म्याने त्यांना महाराष्ट्रात यश मिळाले आहे अन्यथा ते शक्य नव्हते. कॉंग्रेसची ज्या पध्दतीने दरबारी राजकारणात वाट लागली त्याच दिशेने भाजपाची वाटचाल सध्या सुरू आहे. कॉंग्रेस संरजामी राजकारणास तिलांजली देत होती तर भाजपा महाराष्ट्रात विस्तारली नसती.

कॉंग्रेसने आणि शरद पवारांनी अस्तंगत झालेल्या सरंजामी व संस्थानिकी राजकारणाला जीवंत केले नसते आणि बाळासाहेब ठाकरेंचा आधार मिळाला नसता तर महाराष्ट्रात भाजपा रूजू शकली नसती. पण याचे भान सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या देवेंद्रजींना नाही.

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद मिळताच पक्षातलीच लोकं संपवायला सुरूवात केली. खडसे, तावडे, पंकजा मुंडे यांचे हात-पाय छाटण्यास सुरूवात केली. ज्यांनी भाजपाला बहूजन तोंडावळा दिला त्यांनाच भाजपाने वा-यावर सोडले आहे. महाराष्ट्रात हाच मेसेज गेलाय. लोकभावना हिच आहे. पण भक्तांच्या दलदलीत रूतलेल्या भाजपाला आणि स्तुतीपाठकांच्या गर्दीत हरवलेल्या फडणवीसांना हे लवकर समजणार नाही.

खडसेंना थांबवायचे सोडून त्यांच्यावर दरेकरांसारखी भाडोत्री कुळं सोडली जात आहेत. मनसेतून भाजपात आलेल्या प्रविण दरेकरांनी एकनाथ खडसे यांच्यावर तोंडसुख घेणे म्हणजे अतीच झाले. ज्या खडसेंनी भाजपा उभा केला त्या खडसेंना काल आलेल्या दरेकरांनी टोले मारावेत, त्यांची अवहेलना करावी हे भयंकर आहे. दरेकरांच्या बुडाखाली विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जी गादी आहे ती खडसेंच्या घामातून आली आहे. बापाने मरमर मरून कष्ट करावेत आणि पोरांनी त्याची उधळपट्टी करावी. बापाचे मुस्काट फोडावे, त्याला अपमानीत करावे अशातला हा प्रकार आहे.

पोरांनी केले तर ठिकाय किमान त्यांना जन्म तरी दिलेला असतो पण जे आयत्या घरात घरोबा करायला आले आहेत त्यांनी मालकासारखी भाषा वापरून घर मालकालाच अवमानीत करत हाकलावे हे खुप वाईट आहे. खडसेंचा प्रकार त्यातलाच आहे. देवेंद्र फडणवीसांनी चाणक्यासारख्या राजकीय खेळ्या केल्या आहेत. त्यांचे वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांनी पक्षाच्या मुळावरच घाव घातले आहेत. खडसे, मुंडे, तावडे ही भाजपाची महाराष्ट्रातील मुळं आहेत. फडणवीसांनी ही मुळंच उखाडून काढली.

त्यांनी अशी मुळं कॉंग्रेस-राष्ट्रवादीची उखाडली असती तर तो वेगळा विषय होता. पण त्यांनी तिकडचे इकडे घेवून प्रस्थापित केले आणि स्वकीय लोकांना मात्र विस्थापित केले. देवेंद्र फडणवीसांचे हे दरबारी राजकारण एक दिवस भाजपाला खुप महागात पडेल. “कु-हाडीचा दांडा गोतास काळ !” अशी एक मराठीत म्हण आहे. येणा-या काळात फडणवीस हे भाजपासाठी कु-हाडीचा दांडा ठरतील. मोदींचा करिष्मा संपला की याची जाणीव भाजपाला नक्कीच होईल. सध्या मोदींच्या करिष्म्यालाही ओहोटी लागलीय.

त्यामुळेच भाजपवाल्यांनी परवा डिसलाईकचे बटणही काढून टाकले. सोशल मिडीयातल्या की आणि बटणं काढून टाकता येतील पण लोकांच्या मनातला असंतोष कसा काढणार ? ज्या दिवशी तो करिष्मा संपेल तेव्हा भाजपाला लक्षात येईल की आपण काय गमावलय आणि काय कमावलय ? अजून सत्तेची धुंदी आहे. माणसाला धूंदीत भान नसते.

फार जिकीरीने बहूजन तोंडावळा मिळालेल्या भाजपाने तो स्वत:च भिरकावून दिलाय, त्याची टर उडवलीय, अवहेलना आणि कुचेष्टा केली आहे. सत्तेच्या स्पर्शाने अहंकार आभाळाला भिडलेल्या भाजपाला येणा-या काळात त्याची जाणीव होईल हे नक्की.