डॉ.आ. ह साळूंखे आणि जयसिंगराव पवारांना महाराष्ट्र भुषण का दिला जात नाही ?

35

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन व साहित्यिक क्षेत्रातील दोन नामवंत नावे, ज्या नावांनी आपल्या कार्याचा अनमोल ठसा उमटवला, ज्या नावांनी इतिहास संशोधनाच्या, समिक्षेच्या क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले ती नावं म्हणजे ख्यातनाम विचारवंत, प्राच्यविद्या पंडीत, संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ आ. ह. साळूंखे आणि इतिहासाचे जेष्ठ अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार. या दोघांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात यावा अशी अनेकांची इच्छा आहे. सदरची इच्छा योग्यच आहे. डॉ आ. ह. साळूंखे आणि डॉ.जयसिंगराव पवार यांनी इतिहास संशोधन क्षेत्रात दिलेले योगदान खुप मोठे आहे.

त्यांच्या संशोधनात्मक आणि समिक्षणात्मक लेखणीने महाराष्ट्राला विपुल साहित्य भांडार दिले आहे. दोघांचेही काम काम अतिशय मौल्यवान आहे. डॉ. आ. ह. साळूंखे यांनी ज्या पध्दतीने समिक्षणात्मक मांडणी करत बहूजन समाजाला आत्मभान देण्याचे काम केले आहे ते खुप मोठे आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या एका छोट्याश्या खेड्यात जन्माला आलेल्या आ. ह साळूंखेंनी पिढ्यान-पिढ्या उरेल असे काम करून ठेवले आहे.

चार्वाक दर्शन, विद्रोही तुकाराम, किर्लोस्कर मासिकात गाजलेला, ज्याची प्रतिक्रीया म्हणून पोत्याने पत्रं आली तो मराठा समाजावरील आत्मिनिरिक्षणात्मक लेख, सर्वोत्तम भूमिपुत्र बुध्द, गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो, विद्रोही तुकाराम, त्यावरील समिक्षा, परशूराम जोडण्याचे प्रतिक की तोडण्याचे, धर्म की धर्मापलिकडे, बळीवंश, तथागत बुध्द आणि संत तुकाराम अशा सुमारे अर्धशतकाहून जास्त पुस्तकांचे लेखन आ. ह. साळूंखेनी केले आहे. त्यांच्या व्याख्यांनानी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. राज्यभरातल्या अनेक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष, उदघाटक राहिले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक धोरण ठरवणा-या समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. डॉ. आ. ह साळूंखेंचे काम म्हणजे मैलाचा दगड आहे.

जेष्ठ इतिहास अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांचेही योगदान खुप मोठे आहे. योगायोगाने ते ही सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातले आहेत. त्यांनी इतिहास संशोधनात जे काम केले आहे ते अतिशय उल्लेखनिय, मोठे आणि महत्वाचे आहे. डॉ. जयसिंगराव पवारांनी राजर्षी शाहू स्मारक ग्रथांचे केलेले काम, ताराराणीच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला प्रकाशझोत, शिवपुत्र छत्रपती राजाराम या पुस्तकातून छत्रपती राजाराम महाराजांचा मांडलेला इतिहास, क्रांतिसिह नाना पाटलांचा इतिहास, संताजी घोरपडेंच्या पराक्रमाचा इतिहास, आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध, संभाजी स्मारक ग्रंथ आणि खास करून शाहू महाराजांच्या जीवन चरित्राचे विविध पैलू, त्याचा इतिहास या बाबी त्यांनी समोर आणल्या आहेत. सुमारे पंचवीसपेक्षा जास्त पुस्तकांची संपदा त्यांनी निर्माण केली आहे.

अखंड हयातभर ते लेखन, वाचन आणि संशोधन करत राहिले आहेत. हे करत असताना इतिहासाची मोडतोड, तोडफोड असला प्रकार न करता किंवा कुणाची तरी बाजू घेवून अवास्तव मांडणी न करता तटस्थपणे इतिहास लेखन केले आहे. त्यांनीही महाराष्ट्रातील अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, उदघाटकपद भुषवले आहे. आपल्या व्याखानांनी इतिहासप्रेमींचे कान तृप्त केले आहेत. छत्रपती शिवरांयाची नेमकी जन्मतारीख ठरवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या समितीत जयसिंगराव सहभागी होतेच. जयसिंगराव पवारांचे हे काम खुप मोठे आहे. खरेतर महाराष्ट्रावर उपकार करणारे काम त्यांनी केले आहे.

डॉ. आ. ह. साळूंखे आणि डॉ जयसिंगराव पवार या जोडगोळीने जे काम उभारलय ते कित्येक पिढ्यांना दिपस्तंभासारखे आहे. येणा-या कित्येक पिढ्या त्यांच्याच संशोधन प्रकाशात आपली वाटचाल करत राहतील. डॉ. आ. ह. साळूंखे यांनी टाळकुटे तुकाराम अशी प्रतिमा झालेल्या संत तुकारांमाच्या चरित्राची मांडणी विद्रोही तुकाराम अशी केल्यानंतर त्या चरित्रातली उंची, ताकद आणि त्यांचा प्रस्थापित व्यवस्थेविरूध्द झालेला दैदिप्यमान संघर्ष समोर आणला. ज्या पध्दतीने संभाजीराजे बदनामीच्या अंधा-या काळकोठडीत बंद होते तसेच तुकाराम परंपरागत पारायण मंडळांच्या चमत्कारांच्या कथा आणि दृष्टांतानी बंदीस्त झाले होते. या चमत्कारांच्या व तथाकथीत दृष्टांताच्या अंध:कारातून ते चरित्र महाराष्ट्रासमोर आणले आणि त्याचा झंजावती प्रकाश दाखवून दिला.

त्याच पध्दतीने जयसिंगराव पवारांनी अनुल्लेखाच्या अंधारकोठडीत बंद असलेल्या व इतिहासकारांच्या दुजाभावाची शिकार झालेल्या ताराराणीचा आणि राजाराम महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणला. काही प्रमाणात छत्रपती संभाजी राजांनाही बदनामीच्या काळ कोठडीतून मुक्त करण्यास मदत केली. या दोघांचेही कार्य अफाट आहे. त्या कामाची उंची खुप मोठी आहे. हे दोघे खरखुरे महाराष्ट्र भुषण आहेत. त्यांना तो पुरस्कार मिळाला तरी आहेत आणि नाही मिळाला तरी ते महाराष्ट्र भुषण आहेत.

डॉ. आ. ह. साळूंखे व डॉ. जयसिंगराव पवारांनी जे योगदान दिले आहे त्याची उतराई म्हणून त्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यायला हवा. खरेतर हे दोघे त्या पुरस्कारापेक्षा मोठे आहेत. या पुरस्काराने त्यांना मोठेपण मिळण्यापेक्षा त्यांना पुरस्कार देवून महाराष्ट्र भुषण या पुरस्काराची उंची वाढेल इतके मोठे त्यांचे कार्य आहे.

या दोघांच्या लेखनीवर इथल्या चळवळी पोसल्या, पिढ्या पोसल्या. बहूजन समाजाला आणि चळवळीला फार मोठी रसद त्यांच्या विपुल साहित्य संपदेतून मिळालेली आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व तमाम पुरोगामी चळवळीला जे वैचारिक खाद्य मिळाले, जी रसद मिळाली त्यात डॉ आ. ह. साळूंखेंच्या व डॉ. जयसिंगराव पवारांच्या लिखानाचा मोठा वाटा आहे. माणसं जीवंत आहेत तोवर त्यांची किमंत केली पाहिजे. त्यांच्या नंतर त्यांचा गौरव करून आणि त्यांच्यासाठी गळे काढून काही उपयोग नाही. सिंधूताई सपकाळ म्हणतात त्या प्रमाणे महाराष्ट्रात माणसाला मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. इथे माणसांना मेल्यावर मोठेपण दिले जाते.

म्हणजे मोठेपण द्यायला माणसं मरायची वाट पहायली जाते. मोठ्या माणसांना मोठेपण द्यायला ती माणसं मरायची वाट का पहावी ? जी माणसं मुळातच मोठी आहेत त्यांना त्यांच्या हयातीत मोठेपण देण्याची दानत आपल्याकडे असायला हवी. या दोघांना मोठेपण देण्याने ते मोठे होत नाहीत, ते आधीच मोठे आहेत. त्यांना त्यासाठी कुठल्या मोठेपणाची गरज नाही पण आपण त्यांचे मोठेपण समजू शकत नसू किंवा ते मान्य करत नसू तर आपणच खुजे आहोत हे यातून सिध्द होते.

या खुज्या प्रवृत्तीमुळे आजवर आपण आपलीच माणसं दाबून ठेवली, दडपून ठेवली. माणसाचे मोठेपण मोजताना आम्ही तो लाचार आहे का ? आपला सांगकाम्या आहे का ? आपल्याच जातीचा आहे का ? जातीचा असला तर आपल्या वर्तुळातला आहे का ? त्याचा आपल्याला काय राजकीय, आर्थिक उपयोग आहे का ? त्याचा आपल्याला काय फायदा आहे का ? अशा अनेक फुटपट्ट्या आणि निकष लावतो. जे लोक या निकषात बसत नाहीत त्यांना डावलले जाते. त्यांची अवहेलना केली जाते. आ. ह आणि जयसिंगराव ही दोन माणसं पुरस्कारासाठी सरकारचे तळवे चाटणा-यातली किंवा आपला आत्मसन्मान गहाण टाकणा-यातली नाहीत. त्यामुळे त्यांचा विचार पुरस्कारासाठी होत नसावा.

गतवेळी ब. मो. पुरंदरेना महाराष्ट्र भुषण दिला गेला. त्यांना पुरस्कार देताना प्रचंड विरोधही झाला पण तो सगळा विरोध मोडीत काढून फडणवीस सरकारने त्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिलाच. खरेतर त्या ठिकाणी स्वाभिमानी माणूस असता तर त्याने तो घेतला नसता पण पुरंदरेंनी तो घेतला. पुरंदरेंनी तो घेतला कारण त्यांना त्या पुरस्काराचे मुल्य माहित आहे.

तसेच त्यांना ज्यांनी पुरस्कार दिला त्यांनाही त्यांच्यासाठी पुरंदरेंनी केलेल्या कामाचे मुल्य माहित आहे. ते त्यांच्यासाठी असलेली पुरंदरेंची किंमत जाणून आहेत, म्हणूनच सगळा विरोध मोडीत काढून त्यांनी पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण दिला. विरोध करणारांच्या नाकावर टिच्चून दिला. राज्यात उजव्या विचाराचे सरकार होते आणि उजवा विचार मोठा करण्यात पुरंदरेंनी हयात घालवली आहे.

त्यांनी त्यासाठी जे योगदान दिले त्याची उतराई त्यांना महाराष्ट्र भुषण देवून फडणवीस सरकारने केली आहे. सध्या महाराष्ट्रात पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणारे सरकार आहे. या सरकारमधल्या जितेंद्र आव्हाड यांनी पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण देताना कडाडून विरोध केला होता. या मोहीमेत त्यांच्यासोबत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, चित्रलेखाचे संपादक द्नानेश महाराव आणि प्रतिमा परदेशी होत्या. शिवसन्मान जागर परिषदा घेवून या लोकांनी महाराष्ट्र ढवळून काढला.

त्यांनी पुरंदरेंना केलेला विरोध आणि आक्षेप योग्यच होता पण आता या लोकांनी डॉ जयसिंगराव पवार आणि डॉ. आ. ह. साळूंखे यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आव्हाड तर सरकारातच आहेत. त्यांना या दोघांचेही काम चांगले माहित आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रीमंडळात या दोघांची महाराष्ट्र भुषण पुरस्कारासाठी शिफारस करावी. या सरकारसाठी पितामह भिष्म असलेल्या शरद पवारांनाही या दोघांच्या कामाचे मुल्य कळते. त्यामुळे सध्याच्या सरकारने या दोघांनाही महाराष्ट्र भुषण पुरस्कार देवून त्यांच्या कामाचा यथोचित गौरव करावा. भाजपाचे सरकार हे काम करेल असे वाटत नाही.

विनोद तावडे पुरंदरेसाठी छातीचा कोट करून पुढे आले होते, आता जितेंद्र आव्हाडांनी ही दोन नावे सरकारला सुचवावीत कारण आव्हाडांचा इतिहासाचा अभ्यास चांगला आहे. ते या दोघांच्या कामाचे महत्व ओळखू शकतात. इतरांना दुषणे न देता हातात सत्ता आल्यावर आपल्या चांगल्या माणसांचा सन्मान का करू नये ? त्यांचे मुल्य, महत्व आणि मोठेपण का मोकळेपणाने स्विकारू नये ? निव्वळ पुरोगामीत्वाचे सोहळे आणि टेंभे मिरवण्यापेक्षा त्यासाठी मरणारांशी आणि राबणारांशी इमानही ठेवायला हवे.