स्वतःला कधी समजून घ्याल ?

30

जीवन जगताना बारकाईने विचार केला तर आपण स्वतःपेक्षा नेहमी इतरांचा जास्त विचार करतो. जीवनाच्या अनेक वळणावर वेगवेगळी माणसे भेटतात. त्यांचा सहवास लाभतो. संपर्कात आलेल्या अशा विविध माणसांचे भावविश्व आपण अनुभवलेले असते. आपण स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याची होणारी घुसमट समजते. दुसऱ्याचे दुःख कळते. दुसऱ्याला आलेला रागही कळतो.

एका कटाक्षात दुसर्‍याची नाराजी कळते. सहजच दुसऱ्याचे सुखही लक्षात येते. दुसऱ्याचा स्वार्थ समजतो. पण याच सगळ्या गोष्टी स्वतःच्याही असतात. त्या तेवढ्या प्रखरपणे स्वतःला कळत नाहीत का…? कदाचित कळत असूनही माणूस त्याकडे मुद्दामहुन दुर्लक्ष करतो. हेतू पुरस्कृत कानाडोळा करतो. माणसाने आत्मचिंतन करावे. असे माणसाला वाटते खरे; पण माणूस मनापासून आत्मचिंतन करत नाही.

बोलताना आपण अनेक वेळा सहज बोलून जातो. मी त्याला पुरता ओळखून आहे. मला त्याची संपूर्ण कुंडली माहित आहे. मला त्याच्याबद्दल खडानखडा माहिती आहे. मी त्याला अंतर्बाह्य ओळखतो. यासारखे अनेक विधाने आपण सदोदित ऐकत असतो. आपल्याला माणसे चांगली पारखता येतात. असा अनेक जणांना खूप मोठा भ्रम असतो. याच गोष्टीची ते प्रौढी मिरवतात. प्रत्यक्षात तसे काही नसते.

ज्याअर्थी माणूस स्वतःला समजून घेऊ शकत नाही. स्वतःचे गुणदोष पारखू शकत नाही. खऱ्या अर्थाने माणसाला स्वतःची ओळख होत नाही. तोच माणूस इतरांना परिपूर्ण रित्या समजू शकेल काय…? जो व्यक्ती मी दुसऱ्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. असे म्हणतो. अशा व्यक्तीला एक प्रश्न अवश्य विचारा. तुम्ही कसे आहात…? या एका प्रश्नांचे अगदी अचूक, वस्तुनिष्ठ असे उत्तर देता येईल का…?

खूप विचार करा. पूर्णपणे विचारात हरवून जा. बघा विचार करून… कसा आहे मी…? चांगला आहे ; की वाईट आहे. स्वाभिमानी आहे; की दुराभिमानी आहे. शांत आहे; की रागीट आहे. मनमोकळा आहे; की कुढ्या स्वभावाचा आहे. आनंदी आहे की; दुःखी आहे. खरा आहे ; की खोटा आहे. वस्तुनिष्ठ आहे ; की व्यक्तिनिष्ठ आहे. गुणग्राहक आहे ; की गुणद्वेष्टा आहे. समजूतदार वृत्तीचा आहे ; कि आडमुठ्या वृत्तीचा. थोडक्यात कसा आहे मी…? खरोखरच मी स्वतःला ओळखू शकलोय का…? मी जर स्वतःलाच ओळखले नसेल; तर मी दुसऱ्याला ओळखू शकतो का..? मला इतर माणसे पारखता येतील का…?

स्वतःला ओळखणे एवढे सोपे नसते. ‘स्व’ची ओळख करता-करता मनुष्यजीवन अक्षरशः मार्गी लागते. संपूर्ण आयुष्य संपता संपता माणसाला काही अंशी ‘स्व’ची जाणीव होते. मरणासन्न अवस्थेमध्ये आपण स्वतःला उलगडू लागतो. मरण दारात उभे असताना काही अंशी खरा वस्तुनिष्ठ ‘स्व’ आपल्याला समजायला लागतो. त्यावेळी कळते आयुष्यभर आपण जो ‘मीपणा’ बाळगला तो केवळ गर्व आणि अहंकार होत. खरा ‘स्व’ आपण ओळखलाच नाही. आयुष्यभर आपण जो ‘स्व’ प्रस्तुत केला. सादर केला.

तो केवळ मुखवटा होता. खरा मी तर काही वेगळाच आहे. आजपर्यंत आपण आपल्या चेहऱ्यावर, स्वभावावर आणि शरीरावर सुद्धा अनेक मुखवटे दिखाव्यासाठी लावले. त्याच मुखवट्याकडे संपूर्ण जगाने पाहिले. संपूर्णतः खोटा असला तरी जगाने स्वीकारलेल्या मुखवट्यालाच आपण स्वतःचे नाव दिले. प्रत्यक्षातला खरा मी मात्र तसाच राहिला अंधारात. कायमचा एकटाच स्वतःच्या दुनियेत. ‘स्व’ कसाही असो तो लवकरात लवकर शोधायला लागा. मरण दारात उभे असल्यावर कळलेल्या ‘स्व’ ला काहीही अर्थ नसतो. त्यावेळी आपल्यातले गुण-अवगुण कळून काहीच साध्य होत नाही.

खऱ्या अर्थाने स्वतःला समजून घेण्याची गरज आता आहे. आत्ता जर आपण स्वतःला समजून घेतले तर आपल्यातील वाईट गुण आपण संपवू शकतो. चांगले गुण असतील तर ते वाढवू शकतो. अजिबातच नसतील तर नव्याने चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याची आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये रुजवण करता येईल. आणि खऱ्या अर्थाने मनुष्यजीवन सार्थकी लावता येईल. अध्यात्म ही काही वेगळे सांगत नाही. खऱ्या अर्थाने ‘स्व’ ची ओळख म्हणजेच देवाची ओळख आहे. हेच खरे अध्यात्म आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे आत्मचिंतन करून वस्तुनिष्ठपणे स्वतःला ओळखणे. खऱ्या अर्थाने स्व’ची जाणीव करून घेणे.

खूप गहन विचार करण्याच्या भानगडीत पडू नका. गोष्ट खूप साधी-साधी आणि सरळ-सरळ आहे. माणसाला स्वतःचे स्वतःला ओळखणे कठीण आहे. त्याअर्थी दुसऱ्या व्यक्तीला तो वस्तुनिष्ठ ओळखू शकत नाही. याच गोष्टीची दुसरी बाजू अशीही आहे. सर्वच माणसे, सर्वच वेळी, सर्वांशीच सारखीच वागत नसतात. स्थळ, काळ, वेळ आणि व्यक्ती परत्वे माणसाचे वागणे बदलत जाते. यालाच ‘जशास तसे’ वागणे असेही म्हणतात. खरे पाहता खूप उत्कृष्ट स्वभाव असणाऱ्या माणसाने सुद्धा सर्वांशीच चांगले वागावे असे काही नसते.

चांगल्या माणसानेसुद्धा फक्त चांगल्या माणसासोबत चांगले वागावे. असे अपेक्षित असते. वाईट माणसासोबत सुद्धा आपण चांगल्या माणसाएवढेच चांगले वागू लागलो…. तर चांगल्या आणि वाईट माणसांमध्ये फरक कोणता राहील…? वाईट सोबत चांगले वागणे म्हणजे चांगल्या माणसावर केलेला अन्याय नाही का..‌? म्हणून नेहमी जाणत्या माणसाने कायमस्वरूपी जशास तसे वागावे.

जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण हे खूप उदात्त व्यक्तिमत्व आहे. खर्‍या अर्थाने ते करुणानिधी, दयाघन आहेत. म्हणजेच त्यांनी प्रत्येकावरच करुणा व दयेचा वर्षाव करावा का…? याचा अर्थ…. श्रीकृष्णाने सर्वांचे सर्व गुन्हे माफ करावेत….? तर असे अजिबात करू नये… अर्थात श्रीकृष्णाने असे केलेले नाही. भगवान श्रीकृष्ण कायम धर्माच्या, सत्याच्या बाजूने आणि अधर्माच्या, असत्याच्या विरोधात उभे राहिले. सज्जनांचे रक्षण; तर दुर्जनांचा संहार केला. सहृदयी, योग्य गरजवंतांना मदत केली. अहंकारी गर्विष्ठ माणसाचे गर्वहरण केले.

नेहमी चांगल्याशी चांगले ; तर वाईट अशी वाईट वागले. वाईट माणसासोबत चांगले वागणे हा चांगुलपणा होत नाही. वाईटासोबत चांगले वागणे म्हणजे…. त्याच्या वाईट पणाला कळत-नकळत प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. त्यामुळे व्यक्ती जवळची असो की दूरची…. नेहमी सद्गुणांचा आदर आणि दुर्गुणांचा तिरस्कारच झाला पाहिजे. चांगल्या कामाचे कौतुक तर वाईट कामाचे खंडन झाले पाहिजे.

इतकेच नाही तर याच्याही पुढचा विचार करून असे म्हणता येईल. चांगली आणि वाईट यांचा फक्त दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करू नये. सगळ्यात अगोदर चांगल्या-वाईट या दोन्ही गोष्टीचा स्वतःच्या बाबतीमध्ये विचार झाला पाहिजे. आपल्यात काय चांगले आहे…? काय वाईट आहे…? कोणते गुण आहेत. …? कोणते अवगुण आहेत. …? कोणती बलस्थाने आहेत. …? कोणत्या उणिवा आहेत. …? काय बरोबर आहे. …? काय चुकत आहे. …? हे शोधले पाहिजे.

सगळ्या गोष्टीचा स्वतःच्या बाबतीत बारकाईने विचार केला पाहिजे. कोणतीही संकल्पना प्रथम आपल्यासोबत पडताळून पाहिली पाहिजे. एक अतिशय साधे सोपे उदाहरण देतो. या जगात प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. फरक एवढाच त्याचे प्रमाण कमी जास्त असेल. पण प्रत्येकात स्वार्थ मात्र नक्कीच असतो.

सबंध जगाच्या पाठीवर, पृथ्वीवरल्या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये अनेक जीव आहेत. या सर्व जीवांमध्ये मनुष्यप्राणी हा सर्वात बुद्धिमान आहे. निरागस मुले आणि निरागस प्राणी यांना गरजा असतात. परंतु मतलब नसतो. निरीक्षण करून पहा… प्राणी आपल्या गरजा भागवतात. पण वर्षानुवर्षासाठी कधीही साठा करताना दिसत नाहीत. आजचा दिवस भागवणे, आजची वेळ भागवणे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाची असते.

निरागस मुले म्हणजे मतलबी होण्याएवढे बुद्धी न आलेली बालके सुद्धा आपल्याला खूप चांगली वागतांना दिसून येतात. परंतु बुद्धीने परिपूर्ण झालेला माणूस मात्र स्वार्थाने वागतांना दिसतो. या जगात कोण स्वार्थी नाही…? याचा विचार केला तर फार उदार अंतःकरणाची माणसे सोडली तर सर्वसामान्य सर्वच माणसे स्वार्थी असल्याचे दिसून येते.

असे असले तरी प्रत्यक्षात आपल्यामध्ये असणारा स्वार्थीपणा सहजासहजी आपल्याला जाणवत नाही. आपण अगदी सहजपणे दुसऱ्याला स्वार्थी म्हणून मोकळे होतो. खरे पाहता तो एकटाच स्वार्थी नसतो. त्याच्या एवढाच स्वार्थ प्रत्येकातच असतो. या स्वार्थीपणावर आधारित मी केलेली एक कविता आहे.

▪️स्वार्थ▪️

कोण म्हणते स्वार्थी…?

फक्त दुसराच असतो

स्वतःला स्वार्थीपणा

आपण सहज झाकतो

 

आपलाच खिसा भरला तरी

त्याला म्हणायचे परमार्थ

दुसऱ्याने हित पाहिले तर

तो झाला स्वार्थ

 

आपला स्वार्थी विचार

आपल्याला हितावह वाटतो

दुसऱ्या मधला स्वार्थ

अप्पलपोटेपणा ठरतो

 

प्रत्येक जण पहिल्यांदा

आपलाच करतो विचार

म्हणूनच स्वार्थीपणा

सगळीकडे असतो सारासार

 

अजिबात स्वार्थी नसलेला

माणूस सापडत नाही

स्वार्थाशिवाय आपण तर

मंदिरात ही जात नाही

 

काहीतरी मागण्या साठीच

देवाच्या पाया पडायचे

“देवा माझे कल्याण कर”

असे हात जोडून म्हणायचे

 

आपल्याकडे येणारा भक्त

खूप स्वार्थी असतो

नुसता चेहरा पाहिला तरी

स्वार्थ देवाला दिसतो

 

स्वार्थ पूर्णत: वाईट आहे

असे होत नाही

त्याचे प्रमाण मात्र प्रत्येकाने

समजून घ्यावे काही

 

खरेच वाईट नसतो

प्रत्येक वेळेचा स्वार्थ

आपले हित समजल्याचा

तोच खरा अर्थ

 

स्वार्थाला सुद्धा अनेक वेळा

खुप असतो अर्थ

तो अजिबात नसेल तर

संसार होतो व्यर्थ

 

लक्षात ठेवा येवढेच

प्रमाणात ठेवा स्वार्थ

आपले हित करत करत

कधीकधी करा परमार्थ

 

कविता वाचून आपल्या सहज लक्षात आले असेल. खरोखर कवितेत जसे सांगितले तसे असते. फक्त आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. अंत:करणातून सगळ्या गोष्टी मान्य केल्या; तर मात्र वस्तुस्थिती पटते.

कोणतीच व्यक्ती चांगली किंवा वाईट नसते. कोणतीच व्यक्ती खरी किंवा खोटी नसते. कोणतीच व्यक्ती अबोल किंवा बोलकी नसते. कोणतीच व्यक्ती लोभी किंवा निर्लोभी नसते. कोणतीच व्यक्ती पूर्णतः सद्गुणी अथवा पूर्णतः निर्गुणी, दुर्गुणी नसते. प्रत्येकातच अनेक गुणदोष असतात. प्रत्येक जणच परिस्थितीनुसार व व्यक्तीनुसार वागत असते. याचा अर्थ व्यक्ती चांगल्या किंवा वाईट नसून व्यक्तीचे वागणे, प्रवृत्ती आणि दृष्टिकोन चांगले किंवा वाईट असतात. विध्वंसक किंवा उपयुक्त असतात.

अगदी असेच स्वतःच्या बाबतीतही असते. कोणतीही गोष्ट घडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने वस्तुनिष्ठ पद्धतीने त्याचे विवेचन करावे. कोणत्याही घटनेनंतर, भांडणानंतर यात आपले काय चुकले…? याचाही सारासार विचार व्हावा. थोडक्यात खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कोणत्याही बदलाची सुरुवात ही स्वतःपासून होत असते. आपण बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. म्हणजे बदलाची वाटचाल आपोआप सुरू होते. आपण बदललो ; की जग अपोआप बदलायला लागते.

आत्मचिंतन करून आपल्यातले चांगले-वाईट शोधले. म्हणजे केवळ दुसऱ्यातील वाईटावर आपण हसणार नाही. याउलट कळत नकळत दुसऱ्या व्यक्तीचे गुण आपल्याला दिसायला लागतील. माणूस बदलायला लागेल. आजच्या काळात खऱ्या अर्थाने कशाची गरज असेल; तर ती आहे प्रत्येक व्यक्तीने वस्तुनिष्ठ पद्धतीने स्वतःला समजून घेण्याची… स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघण्याची… स्वतःसाठी आत्मचिंतन करण्याची… यावर आधारित असणाऱ्या माझ्या आत्मचिंतन नावाच्या कवितेने या लेखाचा शेवट करतो….

▪️आत्मचिंतन▪️

आपल्यातला गर्व आणि अहंकार

शोधून सापडत नाही

दुसऱ्या मधला गर्व मात्र

सहन होत नाही

 

अहंकारी माणसालाच नेहमी

दुसऱ्यातला अहंकार दिसतो

इतरांना मात्र तोच

त्या व्यक्तीचा मोठेपणा वाटतो

 

सन्मान सांभाळीत जगणे

म्हणजे असतो स्वाभिमान

दुसऱ्याने मान जपला की

म्हणायचे त्याला अभिमान

 

आपण रागात बोलतानासुद्धा

दुसऱ्याला बोट दाखवत म्हणतो

रागात यायचे नाही

असे पोटतिडकीने सांगतो

 

दुसऱ्याला दाखवलेली बोटे

आपल्याकडेही वळतात

फरक फक्त एवढाच

ती आपल्याला कुठे कळतात..?

 

कोणी संशय घेतला तर

आपण चिडून उठतो

हेच दुसऱ्याच्या बाबतीत घडले तर

पार शेवटचे टोक गाठतो

 

हे सगळे करताना आपण

एक विचार सोडतो

नेहमी संशयाने संशय

तर विश्वासाने विश्वास वाढतो

 

राग, लोभ, गर्व, द्वेष

इतरांसोबत आपल्यातही असतो

आपल्यातले दोष काढायचे सोडून

आपण इतरांना हसत बसतो

 

गुण आणि दोष

प्रत्येकातच असतात

लोक मात्र नेहमी

दोषच काढत बसतात

 

कधी कधी समजून घ्यायचे

दुसऱ्या मधले गुण

तर कधी आत्मचिंतन करून

शोधा स्वतःतले दुर्गुण

✒️लेखक:-श्री. मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जि. परभणी.)मो:-9767733560,7972344128