राहुरी कृषि विद्यापीठाचा ऊसाचा फुले 10001 वाणाची राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस

25

✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

राहुरी(दि.29ऑक्टोबर):-अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्पाची 33 वी राष्ट्रीय कार्यशाळा ऑनलाईन दि. 19-20 ऑक्टोबर, 2020 रोजी पार पडली. या कार्यशाळेत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे निर्माण केलेला.फुले 10001 हा लवकर पक्व होणारा ऊस वाण राष्ट्रीय पातळीवर केरळ, तामिळनाडू, अांध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेला आहे.

हा वाण फुले 265 आणि एम.एस. 602 या दोन वाणांचा संकर करून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथेच निर्माण केलेला पहिलाच ऊसवाण असून तो द्विपकल्पिय विभागातील 34 चाचण्यांमध्ये को.सी. 671 आणि को. 86032 पेक्षा ऊस आणि साखर उत्पादनात सरस ठरलेला आहे.

व्दिपकल्पिय विभागातील 14 वेगवेगळया संशोधन केंद्रावर घेण्यात आलेल्या एकूण 34 प्रयोगात (प्रथम पीक, व्दितीय पीक आणि खोडवा) फुले 10001 या वाणाचे हेक्टरी ऊस आणि साखर उत्पादन अनुक्रमे 118.51 मे.टनआणि 16.84 मे.टन मिळालेले असून ते को.सी. 671 पेक्षा अनुक्रमे 22.82 टक्के आणि 18.39 टक्के अधिक आहे. तसेच को. 86032 पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अनुक्रमे 7.41 टक्के आणि 11.58 टक्के अधिक मिळालेले आहे. या वाणामध्ये रसातील साखरेचे प्रमाण (सुक्रोज %) सरासरी 19.78 टक्के असून ते को. 86032 पेक्षा 2.71 टक्के अधिक आहे.

फुले 10001 च्या खोडवा पिकाचे सरासरी हेक्टरी ऊस आणि साखर उत्पादन को.सी. 671 पेक्षा 23.92 टक्के आणि 22.72 टक्के अधिक मिळालेले आहे. तसेच को. 86032 पेक्षा खोडवा पिकाचे ऊस आणि साखर उत्पादन अनुक्रमे 1.09 आणि 7.57 टक्के अधिक मिळालेले आहे.फुले 10001च्या ऊसाची पाने रूंद आणि गर्द हिरीव असून पानांच्या देठावर कुस नाही. ऊस जाड, मऊ आणि कांडया सरळ आहेत. तुर्याचे प्रमाण अल्प आहे.

हा वाण खोडकीड, कांडी कीड, पिठया ढेकुण, शेंडे कीड यांना मध्यम प्रतिकारक आहेे. हा वाण तांबेरा, तपकिरी ठिपके आणि काणी या रोगास प्रतिकारक असुन मर आणि लालकुज रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. या वाणाची निर्मिती आणि प्रसारित करण्यामध्ये डॉ. एस.एम पवार, माजी ऊस विशेषज्ञ व ऊस पैदासकार, डॉ. बी.एस. रासकर, ऊस विशेषज्ञ, डॉ. आर.एम. गारकर, ऊस पैदासकार, डॉ. डी.ई. कदम, माजी ऊस पैदासकार, तसेच कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. डी.एस. थोरवे, श्रीमती डॉ. एम.एम. केसकर, श्री. डी.डी गायकवाड, श्री. पी.पी. खंडागळे आणि डॉ. टी.जे. भोर, सहाय्यक प्राध्यापक, श्री. एम.एम. भुसे, कृषि सहाय्यक आणि श्री. ए.बी. भोसले, कृषि सहाय्यक यांचे विशेष योगदान आहे.

सदर नवीन वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करणेसाठी कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा, आणि संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळालेले आहे.