सशस्त्र क्रांतिकारक प्रभाकर देशपांडे यांचे 100 व्या वर्षात पदार्पण

27

🔹जिल्हा प्रशासनाकडून सत्कार

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.5डिसेंबर):- भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात सशस्त्र युद्धाचा सशक्त पर्याय निर्माण करणाऱ्या एका पिढीचे अग्रणी स्वातंत्र्यसैनिक राजा उपाख्य प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांनी 4 डिसेंबर रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. या स्वातंत्र्यसैनिकांचा सहृदय सत्कार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शनिवारी केला.

धंतोली परिसरातील त्यांच्या राहत्या घरी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्वतः उपस्थित राहून शाल व श्रीफळ देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार केला. यावेळी त्यांचे चिरंजीव उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अजित देशपांडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक मनोज कऱ्हे, विकास रानडे व देशपांडे, तहसीलदार निलेश काळे तसेच परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्वातंत्र्य काळातील एका पिढीच्या सर्वोच्च बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्य आम्हाला मिळाले आहेत. याची जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. जुन्या पिढीच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी आपण जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रभाकर देशपांडे यांचा सत्कार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिशय विपरीत परिस्थितीत स्वातंत्र्यपूर्व काळातील एका पिढीने आजचे हे दिवस आणण्यासाठी लढा दिला आहे. प्रभाकर देशपांडे यांच्यासारख्या ज्येष्ठांचा आम्हाला आदर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देशपांडे परिवाराशी संवाद साधला. देशपांडे यांना त्यांच्या हयातीत मिळालेल्या विविध पुरस्कारांची पाहणी केली.क्रांतिकारक राजा उपाध्यक्ष प्रभाकर लक्ष्मण देशपांडे यांनी 1942 मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. नागपूरच्या इतिहासामध्ये तेलंगखेडी बॉम्ब खटला म्हणून ही घटना अधोरेखित आहे.

यासाठी त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास झाला होता. सध्या ते धंतोली परिसरात राहतात. विशेष म्हणजे त्यांचा जन्म देखील याच घरात झाला आहे. त्यांचे एक चिरंजीव उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. तर दुसरे चिरंजीव अनिल हे माजी रणजीपटू आहेत. तिसरा मुलगा संजय हे व्यावसायिक आहेत. त्यांना स्वातंत्र्य युद्धातील सक्रिय सहभागासाठी भारत सरकारतर्फे ताम्रपट व प्रशस्तीपत्र देऊन गौरान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी सौ. सुधा त्यांच्याच प्रमाणे सक्रिय असून त्या 95 वर्षांच्या आहेत.