तेजरामभाऊ च्या रूपाने – ग्रामसंरक्षण दलाचा सच्चा प्रहरी हरपला

31

” पवित्र ते कुळ ! पावन तो देश ! जेथे हरीचे दास ! जन्म घेती !!” ….जगदगुरू संत तुकोबाराय यांच्या पावन वचनाप्रमाणे जगणारे फार कमी लोक समाजात दिसतात . पण जी मंडळी निष्काम भावनेने आजच्या धकाधकीच्या काळात वं. राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेप्रमाणे कार्य करून गेलेली आहे , त्यापैकीच एक म्हणजे हरिचा दास ठरलेले – राष्ट्रसंतांच्या विचारांचा अनुयायी तेजरामभाऊ बगमारे. ते दि. १२ डिसेंबर २०२० रोजी ब्रम्हलिन झाले. गेल्या सहा महिन्यापासून ते कँन्सर सारख्या जीवाघेण्या रोगांविरूध्द लढले. ग्रामसंरक्षण कार्यात विजयी झालेले तेजरामभाऊ मात्र ह्या शारीरिक व्याधीच्या लढाईत हरले. ते ६२ वर्षाचे होते . तेजराम मुरारी बगमारे हे त्यांचे पूर्ण नांव . मुळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील चकबोथली (कसार्ला ) . झाडीपट्टीतील हे छोटेसे गाव ब्रम्हपुरी तालुक्याच्या ठिकाणाहून ८ किमी अंतरावर आहे. घरचा व्यवसाय धान शेतीचा. त्यांचे लहान बंधु ही शेती करतात.

थोर कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रेरणेमुळे ते वयाच्या २५ व्या वर्षी अड्याळ टेकडी येथील ” श्रीगुरूदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ ” प्रयोगात समर्पित झाले. ग्राम वनहक्क अधिकार जागृती तसेच ग्रामसंरक्षण दल प्रचाराचे कार्य श्रीतुकारामदादा गीताचार्य यांनी त्यांच्याकडे दिले. पुढे राज्यप्रमुख म्हणून ह्या विचारांचा प्रामाणिकपणे प्रचार प्रसार केला. आपल्या गावाचे संरक्षण शासकीय यंत्रणेवर न सोडता गावातील युवकांनी ग्रामसंरक्षणाचे कार्य संघटितपणे केले पाहिजे , हा ग्रामगीतेचा परिवर्तनवादी विचार जनमनात रूजविण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. पाच वर्षापूर्वी त्यांनी चेन्नई येथे जाऊन निसर्गोपचार तज्ज्ञ निरंजन स्वामी यांच्या मार्गदर्शनात पंचगव्य चिकीत्सा प्रशिक्षण पूर्ण केले होते . त्याचाही प्रचार प्रसार जमेल तसा ते करायचे.

तेजरामभाऊचा माझेशी परिचय १९९३ साली अड्याळ टेकडी येथे एका कार्यक्रमात झाला . तेव्हा मी नोकरीच्या निमित्ताने देसाईगंज जि. गडचिरोली येथे राहात होतो . पुढे त्यांची गाढ मैत्री झाली. त्यांना ओळखत असलेले एक गृहस्थ माझेकडे देसाईगंज ला आले आणि म्हणाले* , ” *गुरूजी…..तुमचा गुरूबंधु तेजरामभाऊ, खूप कष्टाळू आहे, साधे जीवन जगणारा आहे…त्यांना ब-यापैकी शेतीही आहे ….. तुमच्या गुरूबंधुला विचारा , लग्न करता का म्हणून …..माझी मुलगी लग्नाची आहे “. याबाबत तेजरामजीला एकांतात भेटलो आणि विचारले असता ते म्हणाले .” गुरूजी…..लग्न करण्याची माझी मुळीच इच्छा नाही.पूज्य श्रीतुकारामदादा यांच्या प्रेरणेने संसार न थाटता गावासाठी सेवाकार्य करीत राहण्याचे वचन मी दिलेले आहे. त्यानुसारच मी आता जगणार आहे. ” . त्यांनी पूर्ण विचारांती घेतलेल्या संकल्पाप्रमाणे ते आजन्म वागले. ब्रम्हचारी राहून सेवारत राहिले .व्यसनमुक्त जीवन जगले. एकंदरीत ते श्रीगुरूदेव तत्त्वविचारांचे सच्चे आचरणकर्ते होते.

सन २०१० मध्ये भूवैकुंठ समितीचे तत्कालीन अध्यक्ष आणि ग्राम आरोग्यमासिकाचे संपादक डाॕ. नवलाजी मुळे यांच्या सोबत दुचाकीने तेजरामजी च्या जन्मगावी भेटायला गेलो होतो . तेथे त्यांच्या आग्रहाने मुक्काम केला होता. त्यावेळी ते कसारला येथे ” गोशाळा” चालवित होते. या कामाकरीता त्यांना ब्रम्हपुरी च्या नामदेवराव ठाकुर यांनी सहयोग दिलेले होते.त्यांचे गोसंवर्धनाचे कार्य पाहून ग्रामस्थांना त्यांच्या कार्याविषयी मोठे कौतुक वाटे त्यांच्या ह्या अखंड सेवा कार्याची दखल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेने घेऊन त्यांना पिंपळगाव ता. कोरपना येथे भरलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात आदर्श श्रीगुरूदेव सेवा कार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

तेजरामजी आत्मज्ञानाचा कृतीशील अभ्यास करणारे ,गावाच्या उत्थानासाठी सतत झटणारे सज्जन संतसेवक होते.अशी फार कमी मंडळी समाजात आढळतात . शेवटच्या काळात ते गडचिरोली ,अड्याळ टेकडी येथे येऊन सर्वांच्या भेटी घेऊन गेले.भ्रमणध्वनी वरून ते माझ्याशी बोलताना आपल्या आजाराविषयी न बोलता सक्षम ग्रामसभा , ग्रामसंरक्षण दलाच्या कार्याविषयी सांगत होते.

ऐसी ग्रामसेवेची योजना ! जागृत जेथे ग्रामसेना ! तेथे स्वर्गाच्या नंदनवना ! बहर येई सहजची!! या ग्रामगीतेच्या ओवीला समर्पित तेजरामभाऊ झटले ,झिजले आणि आपल्या कार्याने अमर झाले आहे. त्यांच्या कार्यस्मृतींना मी वंदन करतो.

✒️लेखक:-बंडोपंत बोढेकर,गडचिरोली(मो:-9975321682)

(✒️लेखक हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे प्रचारक असून परिवर्तन वादि चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. नवोदित लेखक, कवी व अन्य साहित्यिकांना सम्यक मार्गदर्शन करीत असतात.)