अवैध रेतीचा उपसा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.20डिसेंबर):-जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी या नदीपात्राच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा होत असल्याचे आढळून येत आहे. हा उपसा परराज्यातून स्थलांतरीत झालेल्या मजुरांच्या सहाय्याने काही स्थानिक करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अवैधरित्या वाळुचा होणारा उपसा रोखण्यासाठी व हा उपसा मोठी अवजड वाहने जसे ट्रक (टिपर), हायवा, ट्रॅक्टर आदी मार्फत केला जात आहे.

या अवैध रेती उत्खननाला आळा बसावा व जे लोक या अवैध व्यवसायात गुंतले आहेत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करता यावी यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

हा अवैध उपसा नदीपात्रातून तराफे / बोट इत्यादीच्या सहाय्याने होऊ नये, त्याची साठवणूक व वाहतूक करु नये यादृष्टिने हे कलम 14 डिसेंबर 2020 पासून 13 जानेवारी 2021 या कालावधीपर्यंत सद्यस्थितीत लागू करण्यात आले आहे. नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांनी व इतरांनी रेतीचा अवैधरित्या साठा करु नये. याचबरोबर याच्या वाहतुकीसाठी कोणत्याही वाहनाचा उपयोग करु नये. सद्यपरिस्थितीत यातील संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकुण घेणे शक्य नसल्याने व तशी खात्री झाली असल्याने 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली असल्याचेही जिल्हादंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

सदर बाब लक्षात घेता नदीलगत असलेल्या शेतकऱ्यांनी, परराज्यातील अथवा स्थानिक अथवा कोणत्याही व्यक्तींनी अवैधरेती उपसा, त्याची साठवणूक, त्यांची वाहतूक करण्यास दिनांक 14 डिसेंबर 2020 पासून 13 जानेवारी 2021 पर्यंत ट्रॅक्टर मालक, त्यांची नोकर, ट्रॅक्टर चालक यांना उक्त ठिकाणी रेती उत्खनन, वाहतूक, साठा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.