दिंडोरी तालुक्यात बिबट्याने केल्या सात शेळ्या ठार

82

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.29डिसेंबर):-दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के येथील बनकर वस्तीवर काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तब्बल सात शेळ्या ठार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रोजंदारी करणाऱ्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याने उपासमारीची वेळ आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील शेतकरी प्रकाश बनकर यांच्या शेतावर मोलमजुरी करण्यासाठी दत्तू गायकवाड हे आपल्या कुटुंबिया समवेत राहतात. मोलमजुरी बरोबरच संसाराला आधार म्हणून ते शेळीपालनही करत होते.परंतु,काल मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला केल्याने सहा शेळ्या जागेवर ठार झाल्या तर एक शेळी बिबट्याने अंधाराचा फायदा घेत अडचणीत नेऊन फस्त केली.

एकाच्या दोन,दोनाच्या चार करत गायकवाड यांनी सात शेळ्या सांभाळल्या होत्या.पण बिबट्याने हल्ला केल्याने जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने गायकवाड हे हतबल झाले असून मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर असे संकट ओढावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.बिबट्याच्या हल्ल्याने वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.