खाई नदी परिसर सौंदर्यीकरण प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे निर्देश

27

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.6जानेवारी):- अकोट शहरातील सांडपाणी हे खाई नदीत जाते. त्याऐवजी ते पाईपलाईनद्वारे शहराबाहेर न्यावे, त्यावर प्रक्रिया करावी तसेच नदी व परिसराचे सौंदर्यीकरण व विकास करण्यासाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

यासंदर्भात आज पालकमंत्री ना.कडू यांनी अकोट शहरातील खाई नदी परिसराची पाहणी केली. यावेळी अकोटचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, नपा मुख्याधिकारी एस.एन.वाघूरवाघ तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

शहरातील खाई नदीचे आवश्यक तेथे खोलीकरण, रुंदीकरण करून सौंदर्यीकरण करता येण्याबाबत आज ही पाहणी करण्यात आली. त्यासाठी सांडपाणी हे बंदिस्त पाईपलाईनद्वारे शहराबाहेर नेऊन त्यावर प्रक्रिया करणे, नदी पात्राचे रुंदीकरण, तेथे वृक्ष लागवड करून सौंदर्यीकरण करणे याबाबत यंत्रणांनी लवकरात सर्व्हे करून अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश ना.कडू यांनी यावेळी दिले.