पालकमंत्र्यांनी दिली सूर्योदय महिला गृह उद्योगास भेट

27

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.5जानेवारी):- तेल्हारा शहरातील सूर्योदय महिला गृह उद्योग येथे आज राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी उद्योगाच्या मुख्य प्रवर्तक दिपीका देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी ना.कडू यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तेरानिया उपस्थित होते. या उद्योगातील सहभागी महिला भागीदारांनी मिळून सर्व उत्पादनांची माहिती दिली. या उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश ना.कडू यांनी दिले.

 निमशहरी भागातील महिलांनी अशा प्रकारे स्वयंप्रेरणेने उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे हे एक उत्तम उदाहरण आहे, असेही ना.कडू यांनी सांगितले. या महिलांनी बनवलेले विविध उत्पादने ही पर्यावरण पूरक व सेंद्रिय असून त्यांना अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना काळात ना नफा ना तोटा या तत्वावर या महिलांनी एक लाखाहून अधिक मास्क निर्मिती करून पुरवठा केला,अशी माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी ना.कडू यांनी या महिलांचा सत्कार करून प्रोत्साहन दिले.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र तेल्हाराचे व्यवस्थापक जमीर शेख हे उपस्थित होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या तेल्हारा शाखेतर्फे या उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील इतर मागासवर्ग महामंडळाच्या अर्थसहाय्य योजनेतून दहा लक्ष रुपयांचे कर्ज मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले.