नामांतरनाचा लढा, साजरीकरणाचा तिढा

25

१४ जानेवारी या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे कारण सोळा वर्षाच्या संघर्षानंतर १४ जानेवारी हा दिवस उगवला आणि १६ वर्षाचा संघर्ष शमला. एखाद्या विद्यापिठाला महापुरूषांचे नाव देण्यासाठी सतत सोळा वर्षे संघर्ष करावा लागतो हे फक्त भारतात घडू शकते. कारण जगाच्या पाठीवर भारतच असा देश आहे जेथे प्रत्येक गोष्ट ही जाती धर्माशी जोडून फक्त गलिच्छ राजकारण केले जाते. राजकीय पोळी भाजून जनतेला होरपळत ठेवण्याचा इतिहास भारतातच सापडतो. विषमतेने होरपळलेल्या आणि जातीची घाण डोक्यात असलेल्या व्यवस्थेला सत्य कहीच दिसत नाही. जाती धर्माला मोठे करून गुणवत्ता, पराक्रम व इतिहास या व्यवस्थेने लपवलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावरील एकमेव युगपुरुष झाले आणि समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार त्यांनी केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या जगाने मान्य केलेल्या ज्ञानाच्या प्रतिकाला अल्प बुद्धीच्या लोकांनी जातीत बंद करून कर्तृत्व झाकण्याचा प्रयत्न केला.

आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब आर्थिकदुर्बल घटकांना शैक्षणिक प्रवाहात आनण्यासाठी औरंगाबाद ला मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून क्रांती केली. संपूर्ण भारताला वेगवेगळ्या माध्यमातून मानुस म्हणून जगायला शिकवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापिठाला द्यायचे तर लढा उभा करून संघर्ष करावा लागला. ज्यांच्या त्याग आणि बलिदानाने लोक सत्तेत बसले होते त्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध केला ही केवढी मोठी शोकांतिका! परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापिठाला मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाची व कार्याची जाणिव असलेल्या समुहाने एकिने लढा उभा करून संघर्षाचा आवाज दिला. तरुणांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा केला आणि तो लढा यशस्वी करून दाखवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापिठाला मिळावे म्हणून फक्त नामांतर या एका एका मुद्यावर सर्वजन एक झाले. ना नेतृत्वाचा गर्व ना कार्यकर्त्याची अवहेलना सर्वांनी मिळून लढा उभारला.

एक नाही दोन नाही तब्बल सोळा वर्षे संघर्ष करून आपली बाजु भक्कम पणे लाऊन धरली आणि जिवाची व जवानीची कोणतीही काळजी न करता नामांतर लढ्याला सर्वस्व समजून त्यामध्ये सहभागी झाले. नामांतर लढा उभा करताना तरुणांची ताकद, एकीचे बळ, व निस्वार्थी नेतृत्वाखाली सलग सोळा वर्षे संघर्ष जगाच्या इतिहासा मधील एकमेव उदाहरण होय. सातत्य आणि एकिच्या बळावर विद्यापीठ नामांतर लढा यशाकडे वाटचाल करीत होता. नामांतर लढा लढताना अनेक संकटाना सामोरे जावं लागले, कित्येक कुटूंबाला आपले सर्वस्व गमवावे लागले, कित्येक कुटुबांवर बहिष्कार टाकण्यात आला, कित्येक कुटूंबांना गावातील सुखसुविधा बंद करण्यात आल्या, कित्येक कुटुंबातील लोकांना आपल्या डोळ्यासमोर आपल्याच जवान मुलाचा मृत्यू बघावा लागला. नामांतर लढा हा सरकार आणि एक संघटना किंवा पक्षाचा लढा नसुन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी जातीय द्वेष समाजात निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचे काम तत्कालीन सरकारने केले.

लोक एकत्र येऊ नये म्हणून रस्ते बंद करणे, पुल तोडणे, लाठीमार करणे अशा प्रकारे कृत्य सरकार कडून तर घरे जाळणे, बहिष्कार टाकणे अशा प्रकारचे कृत्य जातीवादी लोकांकडून होत होते. तरी एकिचे बळ कुणाच समोर झुकले नाही. तरुण तरुणी जिवाची पर्वा न करता आपले आयुष्य नामांतरनासाठी खर्ची घातले. आपल्या जिवाचे बलिदान देऊन लढा मजबूत केला. महिला तरुण तरुणी यांनी आपल्याला परिने योगदान देऊन नामांतर लढा व्यापक केला. हा लढा यशस्वी होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, एकी, ध्येय आणि सातत्य होय. याच आधारावर सोळा वर्षे संघर्ष करणे शक्य झाले आणि त्याचा फायदा विद्यापिठाचे नामविस्तार होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव कमाणीवर आले हाच तो दिवस म्हणजे १४ जानेवारी होय. जगामध्ये कोणत्याही विद्यापीठाचा नामांकरण सोहळा एवढ्या थाटामाटात साजरा होत नाही तो फक्त औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचाच होतो म्हणून हा दिवस व सोहळा ऐतिहासिक आहे.

एकीने लढल्याचे प्रतिक म्हणजे विद्यापिठाची कमान होय. लाखो लोक आजही एकत्र येऊन नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करून संघर्षातून मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा करतात.सोळा वर्षाचा एकिचा व सातत्याचा अनुभव असलेल्या लोकांना एकीचे महत्वच कळाले नाही. म्हणून आज कोणी एकात नाही आहे. याचा दुसरा अर्थ असाच होतो हा लढा एकिचा नाही तर भावनिक होता आणि भावनेच्या भरात लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. परंतु भावनिक असते तर सोळा वर्षे सातत्य हे लढ्यामध्ये आलेच नसते. थोडक्यात काय तर आजही आम्हाला एकिने लढून एकीचे महत्त्व कळाले नाही. निस्वार्थी नेतृत्व जाऊन नामांतर दिन साजरा करण्यामध्ये स्वार्थ याला. एकीने लढलेल्या लढ्याचा विषय बेकीने साजरा केला जातो तर काय म्हणावे. बेकीने साजरा करतांना नामांतरनाचे श्रेय स्वतः कडे घेण्याची स्पर्धा लागली आहे आणि या स्पर्धेमध्ये नामांतर लढ्यात शहिद झालेले शुरविर तरुणच मागे पडले. मोठमोठे होर्डिंग लावले जातात पण गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे, सुहासिनी, प्रतिभा सारखेज्ञात अज्ञात शहिदांच साध नाव पण नसते याला काय म्हणावं.

नामांतर लढा लढणारा प्रत्येक जग संघर्ष योद्धा आहे. परंतु काही जवानांनी आपले जिवन नामांतरणासाठी अर्पण केले तर खरे हक्क दार तेच आहेत. जे जिवंत आहेत त्यांच्या कार्याला सलाम तेव्हाच होईल जेव्हा ते एका मंचावर येऊन एकत्र साजरा करतील आणि किमान जेवढे माहिती आहे तेव्हढ्याचे नाव आणि फोटो बँनर वर तेव्हाच ते साजरे दिसेल. वेगवेगळे स्टेज आणि कार्यक्रम यावरून शत्रुला नेमका काय संदेश द्यायचा हेच क्लिअर नाही. सोळा वर्षे एकीने लढलेल्या संघर्ष बेकीने सांगुन यशाचे शिलेदार मी आहे हे स्वतः च सांगण्याची नामुष्की आली आहे. नामांतर लढ्यात असलेली एकी, ध्येय आणि सातत्य हल्ली कुठेच दिसत नाही म्हणून नांमातर लढ्यासारखे खडतर मार्गावरून जाणारे आज कुठेच यशस्वी दिसत नाहीत. सामाजिक समस्या आणि सामाजिक न्याया मधिल एकी जाऊन राजकीय पोळी भाजुन स्वतः च्या ताटात थोडेफार पडावे म्हणून समाजात बेकी आणि राजकारणात लाचारी केली. लाचार लोकांना काहीच मिळत नाही याची जाणीव असून सुद्धा बेकीने जगण्यात आनंद मानतात. एकीने राहीले तर खासदार आमदार निवडणूक यायचे परंतु बेकीने स्वतः चे डीपॉझिट जप्त होते.

इतिहासातून, संघर्षातून नेमके आपण शिकलो तरी काय तर काहीच नाही. कारण तुकडे तुकडे प्रत्येक जण स्वतः चे दूकान थाटून बसले आहे. दुकानात ना ध्येय आहे ना संघटन. मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वतः ची पाठ स्वतः थोपटून घेऊन लाचारीतुन मिळवलेल्या पैशातून कार्यकर्त्यांना चहा पाजून स्वाभिमान शिकवू शकत नाहीत. गल्लीत कोणी ओळखत नसले तरी राष्ट्रीय नेते लाऊन घेण्याची भलतीच सवय काही लोकांना असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, नामांतर लढ्यातून घेतलेला धडा सगळं काही विसरून फक्त स्वतः च्या ताटात पडेल ते खाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. एकी स्वाभिमान कुणाच्या तरी दावणीला बांधुन लाचारीचा पट्टा गळ्यात टाकून ना घर का ना घाट का अशी अवस्था आज चळवळ व आंदोलनाची करून ठेवली आहे. स्वतः च्या नावासमोर कंस करून आपल्या गटाचा उल्लेख करून अनेक दुकाने तयार केले, स्वाभिमान काय असतो विसरून गेले, चळवळ विकुन खाल्ली, राजकारणात समाज विकला, आणि स्वतः ची नितीमत्ता तर अगोदरच ढासाळली होती म्हणजे जनतेने पुन्हा खुर्चीवर बसण्यापासुन दुर ठेवले. कोणता उत्सव कसा आणि का साजरा करायचा याचे भान जर नसेल तर आपण नेमके समाजाचे नेते आहोत कि इतर कोणाचे हस्तक याचे आत्मपरीक्षण थोड्यावेळासाठी तरी करणे आवश्यक आहे. कारण चिंतन केल्याने सकारात्मक नकारात्मक गोष्टी बाहेर येऊन आपण यशस्वी होण्याचे नियोजन करू शकतो. १४ जानेवारी अर्थात नांमातर उत्सव साजरा करताना बेकी असेल तर नामांतर दिवस साजरा करण्याचे सार्थक होईल का?

वेळेनुसार राजकीय परिभाषा, राजकीय डावपेच बदलत असतात आणि ते नक्कीच बदलावे परंतु राजकीय डावपेच आणि राजकारणाची भाषा मुळ चळवळ व मुळ विचार धारेमध्ये फुट पाडून चळवळ उध्वस्त करत असेल तर आणि स्वाभिमानी समाजाला लाचार बनवून पुन्हा सामाजिक न्याय आणि हक्का पाहून दुर करून ते मिळविण्यासाठी नवीन ताकद निर्माण होत नसेल तर लक्षात ठेवायला पाहिजे, स्वार्थ, राजकारण आणी बेगडी नेतृत्वाने आपला आणि समाजाचा घात केला आहे. नामांतर दिवस एक असा दिवस आहे जेथे आपण चळवळ, संघर्ष, एकी, सातत्य, प्रामाणिक पणा आणि श्रेयहीन नेतृत्व याची महती समाजाला सांगुन समाजाची मजबूत बांधनी करू शकतो. पण यापैकी कोणताच संदेश हल्ली न देता आपापल्या दुकानातून मीच श्रेष्ठ आहे हे ओरडून सांगण्याची वेळ आली आहे. सर्वच जण एकत्र आले तर कोण श्रेष्ठ आहे हे ओरडून सांगण्याची गरज पडणार नाही परंतु श्रेष्ठत्व नक्की ठरेल. समाजाला न्याय देण्यासाठी आणि समाजात स्वाभिमान जागृत ठेऊन चळवळीला चालना देण्यासाठी नामांतर दिवस साजरा करताना एकीने लढलो तर एकीनेच साजरा केला तर अर्धे प्रश्न तिथेच सुटतात पण तसे होताना दिसत नाही. याकडे नेते, कार्यकर्ते आणि जाणकार यांनी लक्ष दिले तर पुन्हा आपण चळवळ उभी करून एकसंघ करू शकतो. नामांतर दिवस साजरा तेव्हाच होईल जेव्हा नामांतर लढ्यासाठी उभा केलेला संघर्ष डोळ्यासमोर उभा असेल आणि त्याची प्रत्येकाला जाणीव असेल.
नामविस्तार दिनांच्या मंगलमय व एकीमय सदिच्छा..
*************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************