निर्मिती प्रकाशनच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

32

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.17जानेवारी):-पुस्तक माणसाचे मस्तक घडवते, आणि घडलेले मस्तक कुणासमोरही नतमस्तक होत नाही! अशी नतमस्तक न होणारी मस्तके प्रत्येक घराघरात निर्माण करायची असतील तर प्रत्येकाच्या घरात स्वतः चे ग्रंथालय हवेच! ही भूमिका घेऊन तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, रुजवण्यासाठी महाराष्ट्रातील नावाजलेल्या दखलपात्र कवी, लेखक, समीक्षक, साहित्यिक व विचारवंत यांच्या वैचारिक व सैद्धांतिक ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

निर्मिती व संवाद प्रकाशन, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती विचारमंच आणि सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट यांच्या वतीने भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरात प्रथमच कोणत्याही पुस्तक खरेदीवर 50% सूट असे या ग्रंथ प्रदर्शनाचे आकर्षण आहे. या भव्य ग्रंथ प्रदर्शनाचा कालावधी दि. 17 जानेवारी ते 14 मार्च 2021 पर्यंत रोज सकाळी 11:00 ते सायंकाळी 8:00 वाजेपर्यंत असून प्रदर्शन स्थळ निर्मिती विचारमंच, कोल्हापूर, तळमजला, 873, क/2, सी वॉर्ड, सिद्धीश्री प्लाझा, उमा टॉकीज चौकाजवळ, सिद्धिविनायक मंदिरासमोर, राजाराम रोड, कोल्हापूर येथे आहे.

या प्रदर्शनात सिद्धार्थ गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा बसवण्णा, संत तुकाराम, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत गाडगेबाबा, शहीद भगतसिंग, संत नामदेव, सावित्रीबाई फुले यांच्यासह भारतीय संविधान, स्पर्धा परीक्षा विषयक, शेती, कामगारविषयक आणि विविध सामाजिक चळवळी, विचार प्रवाहातील व क्षेत्रातील कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, कथासंग्रह, संशोधक ग्रंथ आधी पुस्तके उपलब्ध असणार आहेत.

त्याचबरोबर विविध मान्यवर लेखकांची नावाजलेली पुस्तकेही या प्रदर्शनामध्ये उपलब्ध केली गेली आहेत. कोल्हापूरात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनिल म्हमाने, प्रा. शोभा चाळके, मंदार पाटील, सुरेश केसरकर, प्रा. करुणा मिणचेकर, डॉ. दयानंद ठाणेकर, ऍड. अधिक चाळके, विमल पोखर्णीकर, गंगाधर म्हमाने, विजय कोरे, रेश्मा गायकवाड आदींनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कोल्हापूरसह विविध भागातील व जिल्ह्यातील वाचक प्रेमींनी या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.