सामाजिक क्रांतीची निर्मिती-रमाई

29

भारताचा इतिहास बघितला तर माणसाला माणसाची वागणुक मिळत नव्हती. जनावरांप्रमाणे गुलामीची वागणूक होती. एक वर्ण दुसऱ्या वर्णावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून एकमेकांना दुय्यम वागणूक देऊन विषमतावादी व्यवस्था कायम टिकवण्यासाठी वेगवेगळ्या शक्तींनी आपली जबाबदारी इमानदारीने पार पाडली. माणसाने प्रवाहात येऊन, आपली सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नती होईल हि अपेक्षा कोणाच्या डोक्यात येत नव्हती एवढी विषमतावादी व्यवस्था समाजात रूजली होती. हि व्यवस्था नाकारून समतावादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अनेक क्रांतिकारक यांनी आपापल्या परिने योगदान दिले आणि त्यामधील एकमेव आणि सर्वोत्तम नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण विषमतावादी व अन्याय कारक व्यवस्था उलथून पाडून मानवाच्या जिवनात एक कल्पनाशक्तीच्या बाहेरचा बदल करून दिला. आणि माणसाला माणसात आणले. जगाच्या पाठीवर आपली ओळख निर्माण करण्यासाठी सर्व दारे उघडून ज्ञानाने जिवन प्रकाशमय केले. आणि हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खुप हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या. परिस्थितीवर मात करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती केली आणि ती क्रांती म्हणजे भारताची लोकशाही. लोकांना हक्क अधिकार मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरवातीपासूनच आग्रही होते.

कोणताही भेदभाव मान्य न करता सर्वांना समान संधी व समान सन्मान, समान वागणूक आणि नैसर्गिक साधन संपती व सार्वजनिक संपत्तीवर समान हक्क यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. हे सर्व करताना सर्वात मोठे पाठबळ आवश्यक असते म्हणजे आपल्या पत्नीचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धां रमाईने पाठबळच दिले नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयाचे स्वागत करून तसे जगली म्हणून जी काही सामाजिक क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून झाली त्यामध्ये रमाईचा तेवढाच किंबहुना त्यापेक्षा मोठा वाटा आहे हे विसरून जमणार नाही. त्याग आणि समर्पन काय असते याचे एकमेव उदाहरण म्हणजे फक्त रमाई. काय त्याग केला काय समर्पण केले यावर नजर जरी टाकली तरी डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहत नाही.

रमाईने समाजाला काय दिले आणि रमाईने दिलेल्या योगदानाचे आम्ही काय केले हा संशोधनाचा विषय आहे. संपुर्ण आयुष्य गरिबी मध्ये जगणारी रमाई आज सोन्याच्या ताईत कशी जाऊन बसली तर या साठी तिला स्वतः झिजावं लागलं, तापावं लागलं.
रमाईच्या त्यागाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने शिकलेल्या महिला आपल्या पतीला सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ देत नाहीत, स्वतः काही मेहनत करत नाही परंतू फळाची अपेक्षा करतात हि माणसिकता आजच्या महिलांची आहे. रमाईने शेणाच्या गोवऱ्या थापून त्या विकुन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फुल ना फुलाची पाकळी मदत केली. आपण करतोय त्या परिश्रमाचा, त्या मेहनतिचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही याची माहिती असताना देखील आपल्या पतीला मानसिक बळ देऊन सामाजिक कार्य आणि शिक्षणापासून एकाही शब्दाने दुर करण्याचा प्रयत्न रमाईने केला नाही. आपण आजचा विचार केला तर नवऱ्याला क्षणोक्षणी तुम्हाला काही जमत नाही याची जाणीव करून पतीला सामाजिक कार्यापासून दूर करणाऱ्या महिला कमी नाहीत.

तुम्ही सामाजिक काम केले तर आपला काय फायदा अस बोलुन पतीला नकारात्मक बनवणाऱ्या आजच्या महिला रमाई मुळे सक्षम झाल्या आणि रमाईने केलेल्या त्याग आणि बलिदान यापासून त्या आजही अज्ञानी आहेत. आज शिकलेल्या महीला अज्ञानी आहेत पण अडाणी रमाई अज्ञानी कधीच नव्हती. ती ज्ञानी होती म्हणून तर जगातील एकमेव विद्वानासोबत तिने कोणतीही कुरबुर न करता संसार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कधीच कोणत्याही समस्येची जाणिव होऊ दिली नाही. त्याग किती करावा याचे एकमेव उदाहरण म्हणजे रमाईच. आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे सरकारी नोकरी मिळून दोन पैसे खिशात येतात तर आजच्या महिला तोऱ्याने मिरवतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक विद्वान, यशस्वी प्राध्यापक, कुशल वकिल होते त्यांच्या ज्ञानाची चर्चा जगभर होती.

त्यांच्या सानिध्यात आलेल्या विदेशी लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी गर्व होता पण डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी अर्थात रमाई या माऊलीच्या मनात कोणत्याही प्रकारची जास्तीची भावना कधीचनिर्माण झाली नाही. रमाईने मिळेल तेवढ्या सुविधेवर आपले जिवन जगून आपल्या पतीला माणसिक पाठबळ वेळोवेळी दिले. एवढ्या मोठ्या मनाची रमाई. स्वतः च्या लेकराला साधी सर्दी झाली तर सर्व घर डोक्यावर घेणाऱ्या महिला कधीच रमाईकडे बघत नाहीत. रमाईने स्वतः चे चार मुले स्वतःच्या हाताने मातीत गाडले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे कोणतीच तक्रार केली. कारण रमाईला याची जाणीव होती पोटच्या गोळ्या पेक्षा माझा पती जे काम करतो ते काम जास्त महत्त्वाचे आहे. कुठे असेल त्या माऊलीचे काळीज. एवढी हिंमत कशी निर्माण झाली असेल. चार मुल स्वतः च्या हाताने मातीत गाडून समाजासाठी नवरा काम करतो तर त्याला कोणतीही अडचण निर्माण न करता आपण सहकार्य करावे.

खरचं आजच्या महिलांमध्ये एवढी हिंमत निर्माण होईल? सामाजिक चळवळ व सामाजिक परिवर्तन आजच्या शिकलेल्या महिलांना कळेल? आपल्या पतीला सामाजिक कार्यासाठी महिला मदत करतील याचे उत्तर आज जास्तीत जास्त नाहीच येईल. कारण आज महिला सामाजिक चळवळ, सामाजिक परिवर्तन यांच्या पासून दुर होऊन भौतिक जिवन जगण्यामध्ये मग्न आहेत. रमाईने स्वतः मेहनत केली स्वतः ची मुलं मातीत गाडली पण सामाजिक क्रांतीची मशाल तेवत ठेवली. कधीच कोणताही हट्ट नाही, कोणतीही तक्रार नाही उलट तुमच्या आमच्या साठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत उभी राहली तेव्हा कुठे आज आमची इमारत, गाडी आणि महागाची साडी तयार झाली. मोठमोठ्या कपाटामध्ये खुप काही कपडे आहेत पण रमाईच्या त्यागाची, बलिदानाची जाणीव नाही.

मोठमोठ्या कपाटामध्ये रमाईचे विचार नाहीत, फक्त फोटो लाऊन औपचारिकता पुर्ण करण्यात येते पण रमाई होऊन कोणी जगण्याचा प्रयत्न करत नाही. रमाई सारखे जिवन जगायचे म्हणजे आज महिलांच्या डोळ्यासमोर अंधारी आल्या शिवाय राहणार नाही. त्याग आणि समर्पण कोणालाही करता येणारी बाब नाही म्हणून त्यासाठी खुप मोठे मन असावे लागते.
आम्हाला मोठमोठ्या सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या पत्नीला कोणत्याही सुख सुविधा देऊ शकले नाही याची खंत आणि जाणिव आज महिलांच्या मनात दिसत नाही. आज आम्ही थोडेकाही झाले तर मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती होतो. लाखो रुपये खर्च करतो. रमाई आजाराने फणफण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेळेवर उपचार करू शकले नाही, रमाईला वेळ देऊ शकले नाही. तरीही रमाई ने कोणतीही खंत तुमच्या आमच्या कल्याणासाठी व्यक्ती केली नाही.

जास्त श्रम आजारपण, पोटच्या गोळ्याचा मृत्यू अस बरचं काही सहन करणारी रमाई मनाने जरी धिट होती तरी शरिराने जर जर झाली होती. केवळ काळजी अभावी रमाईला बाबासाहेब आंबेडकर यांचा संसार अर्ध्यावर सोडून जावे लागले. परंतु रमाईने सामाजिक क्रांतीचा पाया एवढा मजबूत बांधला कि तो पाया कोणीच तोडू शकले नाही आणि सामाजिक क्रांती होऊन सामाजिक परिवर्तन झाले. आपण आज थोडा जरी विचार केला लहानपणी आई वडीलांचे मरण. लग्नानंतर नवऱ्याचा विरह आणि त्यातही काबाडकष्ट, नवरा कमवता झाला आणि सामाजिक कार्यामध्ये झोकून दिले त्या दरम्यान स्वतःचा सासरा दगावला, मुले दगावली, पण याचा परिणाम रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर होऊ दिला नाही. उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणा देऊन हाती घेतलेले काम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहीत केले. जगामधील सर्व ज्ञान घेतलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांना रमाईने जिवन कसे जगायचे हे शिकवले. खऱ्या अर्थाने रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच नव्हे तर समाजाला जिवन पद्धती शिकवून सामाजिक क्रांतीसाठी लढा उभा करणारी प्रेरणा देणारी एकमेव माता आहे. रमाई एक नाव नसुन एक संघर्ष आहे, त्याग आहे आणि समर्पन आहे. मानव कल्याणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी रमाई रांत्रदिवस झिजली तेव्हा कुठे सामाजिक क्रांतीची आणि परिवर्तनाची मशाल पेटत राहली..
*मानवाचे कल्याण करणारी आई रमाई जयंती च्या मंगलमय सदिच्छा*
*************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************