शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.16फेब्रुवारी):-तालुक्यातील आरेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी माणिकराव ठेंगे यांचा मुलगा सतीश ठेंगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होऊन तो नुकताच पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण पुसद येथे झाले आहे.बारावीनंतर त्यांनी दारव्हा येथील मुंगसाजी विद्यालयात डी. एङ. केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे .त्यांनी सन २०१२ मध्ये महाराष्ट्र पोलीस शिपायाची परीक्षा दिली होती.
या परीक्षांमध्ये पोलीस शिपाई म्हणून नांदेड येथे रुजू झाले.पोलीस खात्याअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत त्याने हे यश संपादन केले आहे.पोलीस दलामध्ये दैनंदिन कामकाज,कोरोना कालावधी व निवडणूक बंदोबस्त या कठीण काळातही वेळात वेळ काढून परीक्षेसाठी अभ्यास व तयारी करून सतीश ठेंगे यांनी हे यश मिळवले आहे.त्याच्या यशाबद्दल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.

आरेगाव या मूळ गावी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंदोउत्सव साजरा केला. गावकरी व विविध सामाजिक संघटना यांनी सतीश ठेंगे यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला.त्याने आपल्या यशाचे श्रेय आई वडील,शिक्षक व पोलीस खात्यातील वरिष्ठ मार्गदर्शक यांना देत ग्रामीण भागातील तरुणांना ध्येय निश्चित करत प्रयत्नांची जोड दिली की यश नक्की मिळतेच असा मोलाचा संदेश दिला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा मुळे होतकरू तरुणांना प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याची उत्तम संधी प्राप्त करता येते. या परीक्षेतील ध्येय निश्चित असेल आणि दृढ इच्छाशक्ती असेल तर प्रतिकूल परिस्थितीत ही चांगले यश मिळवता येते असे पोलीस उपनिरीक्षक सतिश ठेंगे यांनी सांगितले.