सोलापूरात कोरोना संदर्भात पालमंत्री दत्ता मामा भरणे यांची बैठक

24

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.24फेब्रुवारी):- शहर व जिल्ह्यातील रुग्णांची संख्या तुर्तास आटोक्‍यात असून कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, यादृष्टीने ठोस नियोजन केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्या दुपारी साडेबारा वाजता नियोजन भवनात बैठक बोलावली आहे.

सोलापूर शहर- जिल्ह्यातील नागरिक सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्कचा वापर आणि स्वच्छता या नियमांचे पालन करीत आहेत. त्यामुळे शहर- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली नाही.

सध्या लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही. पोलिस व महसूल, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासनाने रुग्ण वाढू नयेत म्हणून चांगले नियोजन केले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईदेखील सुरु आहे. नागरिकांनी या संकटाला हद्दपार करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करायला हवे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना स्पष्ट केले.

सोलापूरच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर परजिल्ह्यातून तथा परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करता येईल का, एसटी स्टॅण्डवर येणाऱ्या प्रवाशांचेही थर्मल स्क्रिनिंग करणे, गर्दीच्या ठिकाणी कशाप्रकारे नियोजन करता येईल,

औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे का, रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांच्या राखीव बेडची स्थिती काय आहे, लसीकरणाची स्थिती, लॉकडाउन करण्याबाबत लोकप्रतिनिधींचे मत काय अशा विविध विषयांवर ही बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिका व जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.

तसेच बैठकीसाठी खासदार व आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. पालकमंत्री या बैठकीत काय निर्णय घेणार, प्रशासनाला काय सूचना करणार आणि नागरिकांना काय आवाहन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रत्येक तालुक्‍यांमधील रुग्णांची स्थिती आणि आगामी निर्णयाबाबत लोकप्रतिनिधींचा अभिप्राय घेणे,भाजी मंडई तथा मार्केटमध्ये गर्दी होणार नाही, यादृष्टीने ठरणार नियोजन,सार्वजनिक कार्यक्रम, सभा, आंदोलने, विवाहासाठी 50 पेक्षा अधिक लोक असल्यास होणार थेट गुन्हा दाखल,

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास सक्‍त कारवाईच्या दृष्टीने पोलिसांची तयारी, खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी पुन्हा राखीव बेड उपलब्ध ठेवावेत हे विषयी चर्चिले जातील.