५ लाख रुपये पर्यंत कर्ज देणाऱ्या कंपनीच्या कर्ज मेळाव्यात पोलिसांनी धाड

23

🔺२० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.6 मार्च):- आत्मनिर्भर प्रोत्साहन योजनेंतर्गत ५ लाख रुपयेपर्यंत कर्ज देणाऱ्या कंपनीच्या कर्ज मेळाव्यात शहर पोलिसांनी धाड़ मारल्याने कर्ज मेळावाच बारगळला असल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.प्रथम दर्शनी कोविड-१९ नियमांचे उल्लघंन करीत विना परवानगी शेकड़ो लोकांना एकत्र जमा केल्याचे कारणावरुन नायब तहसीलदार समशेर पठाण यांनी २० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली असूनया कंपनीच्या कार्यपद्धतिची पोलिसांतर्फे अधिक चौकशी करण्यात येत आहे.
कंपनीच्या एकूण २१ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशी करीता ताब्यात घेतले असून अवघ्या २ टक्के दराने कर्जपुरवठा करण्यामागे काय गौड़बंगाल आहे? याचा स्थानिक पोलिस शोध घेत आहे.विज़न ऑफ लाइफ फॉउंडेशन या तथाकथित एन.जी.ओ.च्यावतीने त्यांचे स्वयंरोजगार कार्यक्रमाअंतर्गत हिंगणघाट शहराबाहेर कड़ाजना मार्गावरती असलेल्या महाकाली नगरी येथे शुक्रवारी सकाळी कर्जवाटप मेळाव्याचे आयोजन केले होते.

या कर्जमेळाव्यात १० हजार २५० रुपये विमा शुल्क देऊन नोंदणी केलेल्या कर्जदात्यांना जकार्ता (इंडोनेशिया) येथे मुख्यालय असलेल्या विदेशी बँकेचा चेक देण्यात आला.
पोलिस कारवाई पुर्वी जवळपास २०० लाभार्थीकडून १० हजार विमा रकमेच्या नावाखाली या फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी उकळण्याचे उद्दिष्ट होते,परंतु पोलिसांच्या उपस्थितिमुळे फक्त ४२ जणांकडून पैसे घेण्यात आले.

काही लाभार्थीनी हा चेक तात्काळ स्थानिक बँकेत दाखविला असता सदर चेक कॅश होणार नसल्याचे सांगण्यात आले.यावेळी बेरोजगार व गरजु सदस्यांची कंपनीद्वारे फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच याची पोलिसांना कल्पना देण्यात आली.

शुक्रवारी सकाळी ८ पासून मेळाव्यात विदर्भातील चंद्रपुर पासून तर बुलढाणा जिल्ह्यातील शेकड़ो लाभार्थी कर्जाच्या रकमेचा चेक घेण्यासाठी गर्दी केली. काही मंडळी मराठवाडयातील जालना येथून कर्ज मेळाव्यास उपस्थित झाली होती. यापुढे या स्वयंरोजगाराचे स्वप्न दाखविणाऱ्या नागपुर, सातारा येथे कर्जमेळावे भरविण्यात येणार असल्याची माहिती घटनास्थळी मिळाली.पोलिस कारवाईचे वेळी उपविभागीय अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण हे घटना स्थळी दाखल झाले.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे,पपीन रामटेके, अभिषेक बागड़े यांनी कारवाई केली. घटनेचे गांभीर्य पहाता पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी सुद्धा शहरास भेट देऊन माहिती घेतली.