स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत : सावित्रीमाई फुले !

26

(सावित्रीमाई फुलें स्मृती दिवस)

महात्मा जोतीबा फुले स्वत: एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञ, संपादक तथा क्रांतिकारक होते. सावित्रीमाई या शिक्षित नव्हत्या. लग्नानंतर पतींनी त्यांना लिहायला, वाचायला शिकवले. नंतर याच सावित्रीमाईंनी दलित समाजातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून गौरव प्राप्त केला. त्यावेळी मुलींची अवस्था अत्यंत दयनीय होती व त्यांना वाचन-लेखन करण्यासही परवानगी नव्हती. ही पद्धत मोडण्यासाठी शिक्षणसम्राट महात्मा फुले दांपत्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी देशातील पहिली शाळा स्थापन केली. सावित्रीमाई लिहितात – “जोतीबांचे बोल । मनात परसा ।। जीवाचा आरसा । पाहते मी ।। सेवेच्या भावाने । सेवा जे करती ।। धन्यता पावती । मानवात ।।” (जोतीबांचा बोध) अशा या सावित्रीमाई फुलेंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे लग्न सन १८४०मध्ये वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी बारा वर्षांच्या जोतीराव फुले यांच्याशी झाले.

स्वत: सावित्रीमाई मुलींना शिकवण्यासाठी या शाळेत जात असत. पण हे इतके सोपे नव्हते. त्यांना लोकांच्या कडक विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी केवळ लोकांकडून होणारा अपमानच सहन केला नाही तर लोकांनी फेकलेल्या दगड, विटा, माती, शेण, मानवी विष्ठा आदींचा माराही सहन करावा लागला. त्या शाळेत जात असताना धर्माचे कंत्राटदार, मनू स्मृतीच्या विचारांनी बुरसटलेले, समाजसुधारणेतील समाजकंटक व स्त्रीशिक्षणाचे विरोधी हे त्यात सहभागी होते. यामुळे त्यांचे कपडे खूप घाणेरडे व्हायचे. म्हणून त्या आणखी एक साडी आपल्याबरोबर आणून शाळेत आल्यावर बदलत असत. इतके असूनही त्यांनी हार मानली नाही. महिलांचे शिक्षण, सामाजिक कार्य आणि सामाजिक उत्थानाचे कार्य अविरत चालू ठेवले. महिलांच्या शिक्षणासह विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता त्यांनी विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि सन १८५४मध्ये विधवांसाठी आश्रम बांधले.

त्या म्हणत, “विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून ! तिचा साठा जयापाशी, तो ज्ञानी मानिती जन !!” स्त्री-बालहत्या रोखण्यास त्यांनी नवजात मुलांसाठी एक आश्रमही उघडला. आज देशात स्त्री भ्रूणहत्येचा वाढता कल पाहता त्या काळात स्त्री-बालहत्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे व ते थांबवण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे होते? हे समजून येईल.
विधवांची अवस्था सुधारण्यासाठी तसेच विधवांची सती प्रथा रोखण्यासाठी, पुनर्विवाह साठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी पतीसमवेत काशिबाई नावाच्या गरोदर विधवा महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखलेच नाही तर तिला आपल्या घरीच ठेवले आणि तिची काळजी घेतली आणि वेळेवर तिची प्रसुती केली. नंतर त्यांनी तिचा मुलगा यशवंत यांना दत्तक म्हणून घेतले आणि त्याला चांगले शिक्षण दिले जो नंतर एक प्रसिद्ध डॉक्टर बनला. “उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा ! परंपरेची गुलामगिरी ही तोडणेसाठी !! उठा बंधूंनो, शिकण्यासाठी उठा !!” (शिकण्यासाठी जागे व्हा)

माईंनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पुण्यातच १८ महिलांच्या शाळा उघडल्या. सन १८५४ साली शिक्षणमहर्षी फुले दांपत्यानी अनाथाश्रम उघडले, एका व्यक्तीद्वारे भारतात सुरु होणारे हे पहिले अनाथाश्रम होते. यासह अवांछित गर्भधारणेमुळे होणाऱ्या बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहही उभारले. त्यांच्या समाजोत्थान कार्यात काम करीत महात्मा जोतीबांनी आपल्या अनुयायांसह दि.२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. राष्ट्रपिता जोतीबा हे स्वतः अध्यक्ष होते व सावित्रीमाई महिला विभागाच्या प्रमुख होत्या. या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे शूद्र आणि अतीशूद्रांना उच्च जातीच्या शोषणापासून मुक्त करणे. क्रांतिसूर्य जोतीबांच्या कार्यात माईनींही मोलाचे योगदान दिले. शिक्षणप्रेमी फुले दांपत्यांनी आयुष्यभर निम्न जाती, महिला व दलित यांच्या उद्धारासाठी काम केले. कधीकधी म.फुले स्वतः माईंचे मार्गदर्शन घेत असत. त्या लिहितात – “शूद्र जन्म घेती, पूर्वीची पापे ती ।। जन्मी या फेडती, शूद्र सारे विषम रचती ।। समाजाची रीती, धूर्ताची ही नीती ।। अमानव…” (मनू म्हणे)

महात्मा फुलेंच्या निधनांती सन १८९७ मध्ये पुण्यात एक भयानक प्लेगची साथ पसरली. प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले स्वत: देखील प्लेगच्या जबड्यात सांपडल्या व दि.१० मार्च १८९७ रोजी त्याही सर्वांना पारख्या झाल्या. त्यावेळी ही सर्व कामे करणे इतके सोपे नव्हते जितके ते आज वाटते. समाजातील अनेक अडचणी व तीव्र विरोध असूनही त्यांनी महिलांचे जीवनमान उंचाविले. शिक्षण सुधारण्यासाठी व रूढीवादी प्रथा सुधारण्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारत देशवासी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलेंचे सदैव ऋणी आहोत!
!! माईंना व त्यांच्या अविस्मरणीय कार्यकर्तृत्वास स्मृतीदिनी पुरोगामी संदेश परिवारातर्फे विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व लेखन:-श्री कृष्णकुमार लक्ष्मी-गोविंदा निकोडे गुरुजी.(साहित्यिक व संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.)
मु. पिसेवडधा, ता. आरमोरी,जि. गडचिरोली (७७७५०४१०८६).
इमेल – Krishnadas.nirankari@gmail.com