मरण स्वस्त होत आहे…

102

मागील १० ते १२ दिवसांपासून धरणगाव शहरात मृत्यूचे तांडव सुरू आहे. ज्ञात – अज्ञात, परिचित – अपरिचित, अनेक दिग्गज मान्यवर आपल्याला सोडून कायमचे निघून गेलेत कधीही न परतण्यासाठी. अंत्ययात्रेत सहभागी होतांना देखील अंगावर शहारे यावेत, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे हे सर्व मृत्यू होत आहेत की अजून काही कारण आहे? आपल्या जवळच्या व्यक्तीचं अचानक निघून जाणं, या भीतीने लोक जास्त दगावत आहेत. धरणगाव शहरात चारही बाजूंना स्मशानभूमी आहेत. अनेक लोक म्हणतात की हे योग्य नाही परंतु आजची परिस्थिती पाहता या चारही स्मशानभूमीत सुध्दा नंबर लागत आहेत. बऱ्याचदा एका स्मशानभूमीत जागा नाही म्हणून त्या मृत व्यक्तीला दुसऱ्या स्मशानभूमीत नेलं जातंय. जगण्याची स्पर्धा आधीच एव्हढी जीवघेणी असतांना आज मरण्याची सुध्दा स्पर्धा लागावी यापेक्षा विकृत दुसरं काही असूच शकत नाही. तरुण – म्हातारे असा कुठलाही भाग आता राहिलेला नाही.

सकाळ झाली की अंगावर काटा येतो आज कोणती वाईट बातमी कानावर पडणार…दिवसाला एक – दोन नाही तर तब्बल आठ ते दहा दुःखद निधनाच्या वार्ता ऐकण्यात आणि वाचण्यात येत आहेत. मेलेल्या माणसाला खांदा देणं चांगलं काम आहे हा समज आता पार दूर झालाय. अनेक अंत्ययात्रा पाहिल्या ज्यात मेलेल्या व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी घरातील सदस्य (पुरेशी दक्षता घेऊन) व मोजके पाच – दहा लोकं तेही थोड्या अंतरावर. काळ कठीण आहे या कालावधीत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मोठमोठे लग्न समारंभ, वाढदिवस, साखरपुड्याचे कार्यक्रम, गंधमुक्ती व उत्तरकार्याचे कार्यक्रम अगदी थाटात संपन्न झाले.

ज्या कार्यक्रमांना मरणाची गर्दी पहायला मिळाली तेच कार्यक्रम आज या मरणासन्न परिस्थितीला कारणीभूत ठरलेले अनेक लोक सांगत आहेत. तोंडावर मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर या शासन निर्देशांचे पालन आपण केलंच पाहिजे यात शंका नाहीच परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायक ठरू शकतो. तोंडाला सातत्याने लावलेल्या मास्कमुळे ऑक्सिजन लेव्हल डाउन होते आणि लगेच त्या व्यक्तीला कृत्रिम ऑक्सिजन आणि सुसज्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. दिवसाला १० ते २० हजार रुपये आपल्याला परवडणार नाहीत या धास्तीने लोकं मरत आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आपल्या गावात असतांना आजपर्यंत इथे ५० ते १०० बेड सुविधा असलेलं सुसज्ज हॉस्पिटल का उभं राहू शकत नाही? हा खरा यक्षप्रश्न आहे. ज्याची परिस्थिती आहे तो व्यक्ती जळगाव, नाशिक, औरंगाबाद, मुंबई अशा शहरात जाऊन उपचार घेतोय परंतु हातावर पोट असलेल्या लोकांनी काय करावे.

सामान्य माणसाला जिवंत असतांना देखील किंमत नाही आणि तो अशा परिस्थितीत मरणाला सामोरे जात असतांना देखील कोणाला सोयरं सुतक नसावे हे किती अवघड आहे. काम करण्यासाठी इच्छाशक्ती असली पाहिजे. ग्रामीण रुग्णालयात पुरेसा स्टाफ नसल्याने रुग्णांना उपचार मिळत नाही. इथे कायमस्वरूपी डॉक्टर थांबायला तयार नाही, त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. आज गावात दुषित पाण्यामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत परंतु ते सर्व कोरोनाच्या लाटेत दाबलं जातंय. आज कोरोनाच्या कहर वाढलाय म्हणून नाही पण धरणगाव खरंच शहर आहे का? हा प्रश्न अंतर्मुख होऊन विचारला असता दुर्दैवाने त्याच उत्तर नाही असंच येतं. साधी सोनोग्राफी करण्यासाठी देखील एरंडोल जावे लागत असेल तर मग काय फायदा या शहरीकरणाचा. रात्री – अपरात्री कोणावर जीवघेणा प्रसंग ओढवला तर इथे २४ तास अत्यावश्यक सुविधा देणारं एकही हॉस्पिटल नाही. त्याच – त्याच समस्यांचा कित्ता गिरवत राहावा आणि मरणाला कवटाळत राहावं असंच सुरू आहे. बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे असं मला वाटतं. सगळंच जर आलबेल सुरू असेल तर आज गावाची जी परिस्थिती आहे याला नेमकं जबाबदार कोण? सर्व परिस्थितीचा सारासार विचार करणं आणि मार्ग काढणं हाच एकमेव पर्याय आता शिल्लक आहे.

आज धरणगाव शहरात जे काही सुरू आहे ते जर काही दिवस असंच सुरू राहिलं तर माणूस मेला यापेक्षा ‘आपण जिवंत आहोत’ यात जास्त असुरक्षित वाटायला लागेल. सध्याची परिस्थिती पाहता अंत्ययात्रेत सहभागी व्हायला लोक तयार नाहीयेत मग अशा अवस्थेत त्यांचे शोक संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी कळले पाहिजेत जेणेकरून त्या लोकांना आदरांजली अर्पण करता येईल. हळवं मन असलेले, ज्यांची अवस्था अगदीच बिकट आहे, ज्यांना अनेक निधन वार्ता ऐकून अस्वस्थ होतंय अशा व्यक्तींनी काही दिवस सोशल मीडियापासून थोडं लांब रहावं जेणेकरून त्यांना होणारा त्रास टाळता येईल. शासन निर्देशांचे काटेकोर पालन करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. अफवांवर विश्वास न ठेवता स्वतः खात्री करून मगच विश्वास ठेवावा. योग्य वेळी योग्य खबरदारी घेऊन आपल्या जवळच्या लोकांना धीर द्यावा. आजारी व्यक्तीला योग्य समुपदेशन आणि पुरेसा आधार दिल्यानंतर व्यक्ती लवकर बरा होऊ शकतो.

सकस आहार आणि योग्य व्यायाम करणं आरोग्यासाठी योग्य आहे. काळ संघर्षांचा आहे परंतु या महाराष्ट्राच्या मातीचा वारसा शौर्याचा आहे म्हणून तग धरून ठामपणे उभं राहावंच लागेल. आपल्या माणसांना आपला आधाराचा शब्द आणि प्रेमळ साथ वाचवू शकते म्हणून घरीच रहा, सुरक्षित रहा हेच नम्र आवाहन करतो. ज्यांचं ज्यांचं या परिस्थितीत दुःखद निधन झालं त्या सर्वांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो.

✒️लेखक:-लक्ष्मण पाटील सर(कार्याध्यक्ष
विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव)