रेतीघाट लिलाव प्रक्रियात अनियमितता व रेती चोरांचा सुळसुळाट, मोठ्या भ्रष्ट्राचाराची शंका

37

🔸आम आदमी पार्टी तर्फे पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.5एप्रिल):- तालुक्यातील अनेक रेतीघाट हे लिलाव प्रक्रियेतून पार पडले असून त्यातून रेती उपसा चालू आहे. प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचे आढळून आलेले आहे. आम आदमी पार्टी तर्फे पत्रकारांना सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये प्रथमदर्शी राज्यघटनेच्या ७३ व्या घटनादुरुस्ती नुसार जमीन महसूल संहिता १९९६ कलम ६० ते ६७ निस्तार हक्क कायद्याचे उल्लंघन झालेले आढळते. रेती/वाळू निर्गती धोरण ०३/०९/२०१९ नुसार रेती लिलाव प्रक्रियेत ग्रामसभा, वार्डसभा किंवा नगरपरिषदेची समंती घेने आवश्यक असते परंतु एक महिन्याच्या आत ग्रामसभेकडून संमती न आल्यामुळे ‘माणीव संमती’ समजून लिलाव प्रक्रिया पूर्ण केलेली आढळते. या मुद्द्यावर ग्रामसभा किंवा वार्डसभेची समंती घेण्याकरिता जनमानसात कोणतीही जागृती केलेली दिसत नाही.

लिलावाची जाहिरात वृत्तपत्रात देवून स्थानिक तलाठी, महसूल, तहसील, उपविभागीय कार्यालयात त्याबद्दलचा जाहीरनामा लावने आवश्यक असते परंतु अश्या संदर्भातील जाहीरनामा हा स्थानिक तलाठी, महसूल, तहसील, उपविभागीय कार्यालयात उपलब्ध करून दिला जात नाही. जुने दस्तावेज दाखवून २०२१ या वर्षातील लिलावाची परवानगी देण्यात आलेली आहे. रेतीघाट लिलाव घेतांना परिसरातील कंत्राटदार आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने रेतीघाट घेत असल्याचे आढळते, खरी ओळख लपवून दुसऱ्याच्या नावाने रेतीघाट घेण्याच्या पद्धतीमुळे आर्थिक ‘विल्हेवाट’ व कर चोरीची प्रकरण आढळून येत आहे.

तसेच ज्या रेती घाटांची लिलाव प्रक्रिया झालेली नाही अश्या रेतीघाटांवर सर्रास रेती चोरी चालू आहे. बिना नंबर चे अनेक ट्रेक्टर रात्रभर रेती चोरी करीत रस्त्याने सपाट्याने जात असतात, यातूनच अनेक अपघात घडले आहेत. रेती चोरट्यांची माहिती जनमानसात उघड असतांना प्रशासकीय व पोलीस अधिकारी उदासीन का? चोरट्यांना राजकीय वरदहस्त का? असे अनेक प्रश्न जनमानसात चर्चिले जात असून या सर्व प्रकरणाची रीतसर चौकशी व्हावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.

आम आदमी पार्टी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री सुनीलजी मुसळे, कोषाध्यक्ष श्री भिवरावजी सोनी यांच्या मार्गदर्शनात, आप चे चिमूर विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर येथील काग-सोनेगाव रेतीघातावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वरील मुद्दे उपस्थित करण्यात आले. समाजसेवक श्री सारंग दाभेकर, डार्विन कोब्रा, टेरेन्स कोब्रा व आप चे तालुका उपाध्यक्ष श्री कैलाश भोयर यांनी यासंदर्भातील दस्तावेज प्रसारमाध्यमांना सादर केले. याप्रसंगी आप चे तालुका प्रमुख आदित्य पिसे, सचिव विशाल इंदोरकर, बंडू बावणे, विकी मेश्राम, विशाल भासारकर, रितेश रामटेके, रुपेश दहुळे, रोहित भोयर, विशाल बारस्कर, शैलेश भोयर, पुरुषोत्तम गजभिये उपस्थित होते.