सुटीच्या दिवशी कोविड चाचण्या वाढविण्याचे नियोजन करा

63

🔹जिल्हाधिकारी पापळकर यांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.17एप्रिल):- शनिवार, रविवार तसेच येत्या काळातील सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी कोविड चाचण्या वाढविण्याचे नियोजन करुन अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करा,असे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील कोविड स्थिती व करावयाच्या उपाययोजनांबाबत क्षेत्रीय स्तरावरील आढावा घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण तसेच ऑनलाईन पद्धतीने क्षेत्रियस्तरावरील अधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी मृत्यूचे प्रमाण कमी होण्याचा मुद्दा चर्चीला गेला. रुग्ण वेळीच चाचणी करीत नाहीत, तात्पुरते उपचार करीत चालढकल करतात अशावेळी रुग्णांनी वेळीच रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांच्या चाचण्या (आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन) करुन मग कोविड पॉझिटीव्ह असल्यास कोविडचे उपचार सुरु करण्यात यावेत. त्यासाठी खाजगी दवाखान्यात अशापद्धतीने उपचार सुरु असल्याचे आढळल्यास अशा रुग्णांना तात्काळ कोविड रुग्णालयात दाखल करावे. यासाठी स्थानिक पातळीवर पथके गठीत करुन कारवाई करावी. संचारबंदी काळात अकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करावी. मास्क विना फिरणारे, सामाजिक अंतर न राखणाऱ्यांवरही कारवाई करावी. गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवावे.

जिल्ह्यातील रुग्णांची स्थिती, त्यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणी असणाऱ्या खाटांची संख्या याबाबत समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा संपर्क क्रमांक ०७२४-२४२४४४४ हा आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता, या इंजेक्शनच्या गैरवापर होत असल्यास तपासणीसाठी पथके स्थापन करणे आदी निर्देशही देण्यात आले. तसेच जादा रुग्ण संख्या असणाऱ्या भागात जादा चाचण्या कराव्या, जेणे करुन संपर्क साखळी तपासली जाऊन रुग्ण संख़्या आटोक्यात आणता येइल,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.