वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला मंजुरी

27

🔸कोरोनाचा वाढत प्रधुर्भाव लक्षात घेता माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केली होती मागणी

🔹माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मागणीला यश

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१०मे):-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भविष्याच्या दृष्टिकोनातून वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्यसेवेच्या कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन १५ एप्रिल २०२१ व रिमाइंडर पत्र ०५ मे २०२१ ला दिले होते.त्या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली असून वर्धा जिल्ह्यातच नवे तर संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पद भरती होणार असून माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मागणीला यश आले आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाली आहे तर विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी सांगीतले आहे.राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या अंदाजामुळे रुग्णसेवेसाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. सध्या रुग्णसेवेशी निगडीत ५० टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्याबाबत आग्रहपूर्वक मागणी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.

१०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याने आता गट क आणि ड संवर्गाची १२ हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी २००० पदे अशी एकूण १६ हजार पदे भरण्याची शासनस्तरावरील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.विशेषज्ञ असलेल्या अ संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदे आरोग्य विभागाच्या निवड मंडळामार्फत भरली जातील. क आणि ड संवर्गाची पदे भरण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येईल.

संपूर्ण देशात कोरोनाने कहर घातला असून सरकारी आरोग्यसेवा कमी पडत आहे. जिल्हा रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी आरोग्य सेवेवर जिल्ह्यात व तालुक्यात करोडो रुपये खर्च करून सरकारने दवाखाने उभे केले आहे. प्रत्येक ठिकाणी भव्य वास्तू ,उपकरणे ,डॉक्टर ,नर्सेस ॲम्बुलन्स इत्यादी सेवा सरकारतर्फे केली जाते.
असे असताना डॉक्टर, नर्सेस (महिला व जेन्ट्स), औषधी निर्माता इत्यादी मानवी सेवेचे पद रिक्त आहेत. त्यामुळे सरकारी दवाखान्यात रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यात कोरोनामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक सरकारी दवाखान्यात ऑक्सीजन प्लांट उघडणे आवश्यक आहे. सरकारी दवाखान्यात वेंटिलेटर, एक्स-रे मशीन इत्यादी उपकरणे उपलब्ध असताना तज्ञ डॉक्टर, टेक्निशियन नसल्यामुळे मशीन बंद पडल्या आहे.अश्या सूचना माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केल्या होत्या.

तरी भविष्याच्या दृष्टिकोनातून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वर्धा जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवाची पदे भरण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केली होती त्या मागणीला यश आले असून. लवकरच सर्व पदे भरण्यात येणार आहे व जनतेला याचा दिलासा मिळणार आहे.मागणी पूर्ण केल्याबद्दल माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सुनील केदार यांचे आभार मानले आहे.
—————————————-
प्रतिक्रिया:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भविष्याच्या दृष्टिकोनातून वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्याची रिक्त पदे भरण्याबाबत मागणी केली होती. त्या मागणीची राज्य सरकारने दखल घेतली व सर्व पदे लवकरच भरण्यात येणार आहे या मागणीला यश आले असून सर्व आरोगय विभागाची पदे भरल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम रुग्ण सेवेवर निश्चितच जाणवेल.
– माजी आमदार प्रा.राजु तिमांडे