आगीत अभिलेख नष्ट होण्याची झळ गरीब माणसाला बसेल

🔹नागरिकांनी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावीत- पालकमंत्री सुनील केदार

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

वर्धा(दि.15मे):- निबंधक कार्यालयात गाव खेड्यातील माणसांच्या जमिनी, शेती व मालमत्तेच्या नोंदी असतात. ते अभिलेख या आगीत नष्ट झाले आहेत. याची खरी झळ गरीब माणसाला बसेल. त्यामुळे नागरिकांकडे जी काही कागदपत्रे असतील, ती नागरिकांनी तातडीने दुय्यम निबंधक व तहसील कार्यालयाला उपलब्ध करून द्यावी. त्याच्या आधारे अभिलेख पुनर्स्थापित करण्याचे काम तातडीने मार्गी लावता येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

आर्वी येथील तहसील कार्यालयात 13 मे रोजी सकाळी 3 वाजता लागलेल्या आगीत दुय्यम निबंधक कार्यालय संपूर्णतः जळून खाक झाले आहे. याची पाहणी आज पालकमंत्री सुनील केदार यांनी केली यावेळी ते बोलत होते.

इथे लागलेली आग ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या आगीत पूर्णतः नुकसान झालेली इमारत आणि फर्निचर नव्याने उभारता येईल, मात्र यात नष्ट झालेला रेकॉर्ड मिळवताना अतिशय त्रास होणार आहे. हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या इमारतीत सुरू करण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य व संगणक तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.
तहसील कार्यालय दोन महिन्याच्या आत नवीन इमारतीत हलविण्यात येईल, नवीन इमारतीचे 90 टक्के काम झाले असून उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यात.

आर्वी तहसील कार्यालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आणि विद्युत विभागाला दिलेत. तसेच नुकसानीच्या मूल्यांकनाबाबत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांना सूचना देण्यात आल्यात.

या कार्यालयाला लागलेल्या आगीत दुय्यम निबंधक कार्यालय संपूर्ण जळाले असून निवासी नायब तहसीलदार आस्थापना, रोजगार हमी शाखा, पुनर्वसन शाखेतील अभिलेख आगीमध्ये पूर्णत: नष्ट झाले. तर नैसर्गिक आपत्ती, अभिलेखागार, नायब नाझर शाखा, तहसीलदार यांचेकडील कार्यवाहीची प्रकरणे, पुरवठा शाखा व इतर शाखेतील काही अभिलेख या आगीत अंशतः नष्ट झाले आहेत. या आगीत तहसील कार्यालयाचे अंदाजे 22 ते 25 लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी दिली. यावेळी आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे, प्रभारी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जे एम चतुर, तहसीलदार विद्याधर चव्हाण, तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED