कामाचे ‘गड’ उभारणारा माणूस नितिन गडकरी

24

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

देशाच्या राजकारणात सध्या मोदी आणि शहा ही दोन नावे सोडली फक्त नितिन गडकरी यांचेच तिसरे नाव ऐकायला मिळते. एका बाजूने देशातले बहूतेक पक्ष, नेते, जनता मोदी आणि शहांच्या नावे बोटे मोडत असताना त्याच सरकारमधील नितिन गडकरी नावाचा माणूस लोकांना भावतो आहे. खरेतर ही त्यांच्या कामाची ओळख आहे. कमालीचा व्हिजनरी असलेला हा माणूस प्रचंड सर्जनशील आहे. त्याच्या डोक्यात सतत नव-नव्या आयडीया चालू असतात. गडकरी राजकारणाबरोबरच उद्योग-व्यवसायती अग्रेसर आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून पुढे आलेले गडकरी आपल्या कामाने छाप सोडून गेले. भाजपमध्ये संघाच्या मेहरबानीने पुढारी झालेले खुप नेते आहेत. गडकरींनी मात्र कामाच्या माध्यमातून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांनी देशपातळीवर एक वेगळी छाप पाडली आहे. कोरोनाच्या कठीण काळात अवघ्या जगात मोदींना नामुष्की पत्करावी लागली.

देशातही त्यांना लोकांची नाराजी सहन करावी लागत आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेने मोदींच्या लोकप्रियतेची लाट ओसरली आहे पण याच काळात लोकांना मोदींच्या जागी नितीन गडकरी प्रधानमंत्री व्हावेत, त्यांनी देश सांभाळावा, त्यांनी देशाचे नेतृत्व करावे असे वाटणे हेच नितीन गडकरींचे मोठे यश आहे. विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनीही ही भावना व्यक्त केली आहे. भाजपाचे कट्टर वैचारिक वैरीसुध्दा हेच बोलतायत. खरेतर ही नितीन गडकरींच्या कामाची पोचपावती आहे.

नितीन गडकरी सध्या केंद्रात परिवहन मंत्री आहेत. मोदी सरकारची मागची पाच वर्षे आणि आत्ताची दोन वर्षे या काळात काम करणारा एकमेव मंत्री म्हणून गडकरी समोर आले. केंद्रातले बाकी मंत्री फक्त पाटी लावायच्या कामाचे निघाले पण गडकरींनी मोदींच्या प्रभावात स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांनी लोकांच्यात गुडवील निर्माण केले आहे. गडकरींनी केलेल्या कामाच्या जोरावरच मोदींनी दुस-यांदा सत्ता बळकावली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रारंभ केला तेव्हा अख्ख्या भाजपवर प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडेंची छाप होती. हे दोघेच भाजपाचे नेते होते. या दोघांनीच भाजप वाढवली, मोठी केली होती. या दोघांच्या हयातीत भाजपात स्वत:चे स्थान निर्माण करणे म्हणजे सहजशक्य नव्हते.

त्यात गडकरी हे नेहमी विधान परिषदेवर निवडूण येणारे. तब्बल वीस वर्षे ते विधानपरिषदेवर निवडूण आले. त्यांच्यामागे म्हणावे असे लोकबळ नव्हते त्यामुळे त्यांना विधानसभेवर निवडूण येताना अडचण येत होती. २०१४ साली मोदी लाटेत ते पहिल्यांदा लोकांच्यातून निवडूण आले. त्यांना १९९५ च्या युती सरकारमध्ये मंत्री म्हणून संधी मिळाली आणि त्या संधीचे गडकरी यांनी सोने केले. त्यांच्या कामाने प्रभावीत होवून बाळासाहेब ठाकरे यांनी नितिन गडकरींचे जाहिर कौतुक केले होते. महाराष्ट्रातले, देशातले अनेक उड्डाणपुल, महामार्ग हे नितीन गडकरींच्या कार्यकर्तृत्वाचे जींवत पुरावे आहेत.

नितीन गडकरींना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात संधी मिळाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. त्यानंतर ते सर्वात कमी वयाचे भाजपाचे अध्यक्ष झाले. केस पिकल्याशिवाय भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा कुणाला मिळालेली नव्हती पण गडकरी वयाच्या बावन्नाव्या वर्षी भाजपाचे अध्यक्ष झाले. या निमित्ताने त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. आज त्यांनी देशभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातून भविष्यात देशाचा प्रधानमंत्री होणारा मराठी माणूस म्हणून लोक त्यांच्याकडे पहात आहेत. अनेकांना भाजप आणि भाजपाची विचारधारा आवडत नाही पण नितीन गडकरी आवडतात. असे खुप लोक आहेत ते भाजपाचा तिरस्कार करतात पण गडकरींच्या प्रेमात पडलेले आहेत. मोदी-शहांच्या काळात भाजपात लोकांना आश्वासक वाटणारा हा एकमेव चेहरा आहे. त्या जोडगोळीपेक्षा नितिन गडकरी बरे ! असे अनेकांचे मत आहे. नितीन गडकरींचा परवा वाढदिवस झाला.

त्याचवेळी हे लिहायचे होते पण राहून गेले. मनमोकळं बोलणारा, मनात असेल ते बेधडक सांगणारा हा माणूस आपल्या वक्तृत्वाने सतत चर्चेत असतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षिय विद्वेष मोठ्या प्रमाणात पसरला आहे. राजकारणातला निकोपपणा संपून राजकारणात सुडाची आणि द्वेषाची भावना वाढत चालली आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टिमने या राजकीय मोकळेपणाची वाट लावली आहे. आठवी-नववीच्या पोरासारखे राजकीय आरोप-प्रत्यारोप चालू असतात. सतत विद्वेषी राजकारण केले जाते. याच काळात नितीन गडकरी नावाचा माणूस सर्व पक्षियांच्यात मैत्री पेरताना दिसतो. चांगल्या कामाचे खुलेपणाने कौतुक करतो. हे कौतुक करताना कुठे राजकीय विद्वेष न ठेवता ते व्यक्त होतात. प्रसंगी नाव न घेता कधी फडणवीसांना तर कधी मोदींनाही ते कानपिचक्या देतात.

“खुर्ची आज आहे उद्या नाही !” हे शाश्वत सत्य डोक्यात ठेवून वागायला हवे ! असे अनुभवाचे सल्लेही ते स्वपक्षियांना देतात. वक्तृत्वाची अमोघ देणगी लाभलेला हा माणूस शरिराने धिप्पाड आहे तसाच तो कामानेही धिप्पाड झाला आहे. त्यांनी मिळालेल्या संधीतून विकास कामाचे जणू गड उभारले आहेत. हे काम करताना कुठेही छाती न आपटता, आकांडतांडव न करता त्यांचे काम चालू आहे. गडकरी प्रधानमंत्री झाले तर त्यांच्या रूपाने एक मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर गेल्याचा आनंद होईल. कोणी अडाणचोट व गुंड प्रवृत्तीची माणसं तिथं जाण्यापेक्षा गडकरींसारखा व्हीजनरी माणूस प्रधानमंत्री झाला तर स्वागतच आहे.

माझे मोदी विरोधातले, संघ विचारधारेच्या विरोधातले लेख वाचून मोदीभक्तांना नेहमीच राग येतो. हा लेख वाचून पुरोगामी मंडळींनाही राग येणार पण व्यक्तीगत राग-लोभाच्या वर उठून जे चांगलं आहे त्याला चांगले म्हणायलाच हवे. जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणायला हवे. चांगल्याला चांगले म्हणतानाही संकोच न करता, स्वार्थ न दाखवता म्हणायला हवे, मग तो शत्रू का असेना. तसेच वाईटाला वाईट म्हणताना भय बाळगायचीही गरज नाही. निधड्या छातीने वाईटाचा विरोध करायलाच हवा. शेवटी विचार माणसांसाठी आहेत. माणसं मारून कुठलाच विचार जिंकत नाही. कदाचित माणसं मारून विचार जिंकत असतील पण माणूस आणि मानवता मात्र पराभूत होते. म्हणूनतर संघ प्रवृत्तीला विरोध असतो. संघातल्या व भाजपातल्या चांगल्या लोकांचे कौतुक करताना संघाच्या विचारांचा विरोध तेवढ्याच तीव्रतेने नेहमीच राहिल यात शंका नाही.